आपलेच घर खायला उठतं तेव्हा !

    41

    ✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो.9561551006

    कोरोना पॉझीटीव्ह आलो आणि सक्तीची सोळा-सतरा दिवसाची विश्रांती वाट्याला आली. खरेतर दोन हजार पाच नंतर इतक्या दिवसाची सुट्टी कधी वाट्याला आलीच नव्हती. २००५ साली वज्रधारी सुरू करायच्या आधी तब्बल सात ते आठ महिने काहीच काम केले नाही. निवांत असायचो. सकाळी लवकर उठायचे, नाष्टा करायचा आणि सुळकाईच्या डोंगरावर सुळकाई मंदिरात जावून बसायचे. दिवसभर ते मंदिर आणि मी दोघेच. दिवसभर डोळे मिटून बसायच. तिथून सायंकाळीच घरी परत यायचे. त्यानंतर इतका निवांत वेळ कधीच भेटला नाही. एखादा दिवस घरी थांबायला मिळणेही मुश्किल होते. आई आजारी असताना दोन महिने घरी होतो पण काम करत करत, अधून मधून ऑफीसला जात होतो. कोरोना झाला आणि घरात सक्तीने थांबावेच लागले.

    घरात माझ्यासह चौघांना कोरोना झाला होता. भाऊ, एक पुतण्या आणि माझी दोन मुले निगेटीव्ह होती. आम्ही बाधीत असल्याने पुतण्या व भाऊ घरी थांबत नव्हते तर दोन्ही मुले बहिणीकडे होती. एक पुतण्या, बायको आणि वहिणी हे तिघे दवाखान्यात अँडमिट होते. मी एकटाच घरी होतो. आई गेल्या नंतर घरात थांबायची ही पहिलीच वेळ. आज आईला जावून बरोबर तीन महिने झाले. कोरोना झाला होता पण मला काहीच त्रास नव्हता. ना ताप, ना सर्दी, ना अंगदुखी. अगदी ठणठणीत होतो. कोरोनाचा कसलाही त्रास झाला नाही पण घरात आई नसल्याचा जीवघेणा त्रास झाला. आई शिवाय घर किती भयानक आहे ? याची जाणीव क्षणाक्षणाला होत होती. चार खोल्यात मी एकटाच. आईची आठवण तीव्रतेने यायची. आई सोबतचे सगळे प्रसंग आठवायचे, आई डोळ्यासमोरून हटायची नाही आणि घर खायला उठायचे. मी नेहमी जिथे झोपतो त्याच्या आतल्या खोलीमध्ये आई झोपायची. या दोन खोल्यांच्यामध्ये दरवाजा नाही त्यामुळे थेट आईशी बोलता यायचं, रात्री उठून आई जवळ जाता यायच. मी झोपल्याशिवाय किंवा घरी आल्याशिवाय तिला कधीच पुर्ण झोप लागायची नाही.

    आई आत झोपलेली असली की मला कसलाच ताण यायचा नाही. दिवसभर कुणी शिव्या दिल्या, कुणी धमकी दिली, थकलो-दमलो, आजारी पडलो, आणखी काय झाले, कुठलाही, कसलाही प्रॉब्लेम असला तरी आई आतल्या खोलीत असली की निवांत झोप लागायची. पडल्या पडल्या डोळे मिटायचे. “आई आत आहे !” ही गोष्टच इतकी मोठी ताकद देणारी होती की त्याचे शब्दात वर्णन नाही करू शकत. आईचं आत असणं हा सर्वात मोठा दिलासा होता. त्यातली ताकद फार मोठी होती. त्यामुळे कधीच कशाचा ताण नाही आला. मन नेहमीच खंबीर रहायचे. घरात आलं, आईला पाहिले, आईशी बोललं की संपला विषय. पण आता आई नसताना घरी थांबायची वेळ आली आणि आईशिवाय घर आणि मन किती रितं असतं ? याची जाणिव झाली. आई आठवायची आणि डोळे भरून यायचे. आईची आठवण असह्य व्हायची. काहीच सुचायचे नाही. घर उचलून फेकतय की काय असे वाटायचे. लहानपणापासूनचे अख्खे जीवन डोळ्यासमोर उभे रहायचे. मन अस्वस्थ व्हायचे. आईच्या नसण्याने मोकळं झालेलं घर मात्र खायला उठत होत. आपलच घर इतक परकं कसं काय वाटू शकतं ?

    आई इतक्या लवकर जाईल अस कधी वाटलच नाही. ती अतिशय धडधाकट होती. प्रचंड कष्ट उपसल्याने कणखर होती. तिला ना साखर होती ना रक्तदाब होता. कुठलीही गोळी चालू नव्हती पण कँन्सरने घात केला. खरेतर लहानपणी आईला वेळ नव्हता, मी मोठा झाल्यावर मला वेळ नव्हता. रोज वेड्यासारखे पळायचे. आई जायच्या आधी आठ दिवस तीला कर्नाटकात आयुर्वेदीक औषध आणायला गेलो होतो. गेलो आदल्या रात्री आणि दुस-या दिवशी संध्याकाळी परत येताना वाटेतच आईचा फोन आला, ती जाम वैतागली होती. त्या स्थितीत तिला असं वाटत होते की मी चार-पाच दिवस झाले गेलोय ते आलोच नाही. त्यामुळे झिटलेल्या आईने फोन करून शिव्या दिल्या. “आयुष्यभर तुझी वाटच बघायची का ? असे म्हणत आईने चांगलाच दम दिला. मी लहान असताना आईला सकाळी साडेसातला रोजगाराला जाव लागायच. कधी कुणाच्या शेतावर तर कधी विहीरीवर, तळ्यावर, तर कधी रस्त्यावर कामाला जावं लागायचं. ब-याचवेळा दुस-या गावात जावून रोजगार करावा लागायचा त्यामुळे लवकर घर सोडावं लागायच.

    आई घरी आली की घरातल्या कामाची लगबग सुरू व्हायची. तिने काम केल्याशिवाय चुल पेटायची नाही आणि आमच्या पोटात पेटलेला भुकेचा वणवा विझायचा नाही. त्यामुळे तिला आम्हाला द्यायला पुरेसा वेळ नव्हता. लहान असताना मला मुडदूस झाला होता. मी जगतोय की मरतोय ? अशी स्थिती होती. त्यावेळी आई पेडच्या तलावावर कामाला जायची. काम सुरू असताना गावाकडून कुणी आले की आईला वाटायचं आपलं पोरगं गेलेच. पोरगं गेले आणि गावातून निरोप द्यायला आलेत असं वाटून आई घाबरून हातातलं टिकाव टाकून कंबर धरायची. आपलं पोरगं संपलं या भितीने ती घाबरून जायची. पण माझ्या आयुष्याची दोरी बळकट होती. मी त्या आजारातून वाचलो, धडधाकट झालो. त्या अडचणीच्या परस्थितीमुळे आईचा पुरेसा वेळ मिळाला नाही. आईलाही तो देता आला नाही. कसा देणार होती ? ती आम्हाला घेवून बसली असती तर हाता-तोंडाची गाठ कशी पडली असती ? पाच पोरं कशी जगली असती ? आता तर आईच उरली नाही. त्यामुळे आईच्या प्रेमाला भुकेलेले मन आजही तृप्त झाले नाही. आई अजून हवी असताना निघून गेली. याची खंत कधीच संपणार नाही. कवी फ मु शिंदेंनी त्यांच्या कवितेत जे मांडलय ते शब्दश: खरे आहे.
    आई एक नाव असतं

    घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं !
    सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
    आता नसली कुठं तरीही नाही म्हणवत नाही
    जत्रा पांगते पालं उठतात
    पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
    आई मनामनात तशीच ठेवून जाते काही
    जीवाच जीवालाच कळावं असं जाते देवून काही
    आई असतो एक धागा
    वातीला उजेड दावणारी समईतली जागा
    घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान
    विझून गेली की अंधारात सैरावैरा धावायलाही कमी पडते रान