न्याय हक्कासाठी सकल ओबीसी समाजाचे धरणे आंदोलन

24

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका,प्रतिनिधी उमरखेड)

उमरखेड(दि.28जून): – ओबीसी समाजाची जनगणना , सामाजिक स्थीती व व्याप्त पदांची स्थिती सुधारण्या बाबत तसेच ७३व ७४ व्या घटना दुरुस्ती नुसार न्यायालयास आवश्यक इंम्पेरिकल डाटा सादर करावा, गत २५ वर्षापासून सुरू असलेले राजकिय व सर्वच आरक्षण पुर्ववत सुरु करावे , ओबीसी कर्मचाऱ्यांची क्रिमीलेअरची अट रद्द करून त्यांना पदोन्नती मध्ये आरक्षण द्यावे अशा न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी दि. २८ जून रोजी स्थानिक म. गांधी चौकात उमरखेड तालुका सकल ओबीसी समाजाचे धरणे आंदोलन करण्यात आले .

ओबीसी समाजाच्या मतदानावर सत्ता उपभोगणाऱ्या राजकिय पक्षांनी शासन , प्रशासन यांनी असंघटीत ओबीसी समाजाचा फायदा घेत आजवर केवळ वापरच केलेला आहे. त्यांचे राजकिय व इतर आरक्षण उठल्यानंतर केवळ सहानुभूतीचा पुळका दाखवून ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केन्द्र व राज्यातील सत्ताधारी आपली जबाबदारी झटकून देत आहेत ही ओबीसींसाठी शुद्ध धुळफेक असून शासनकर्त्यांना जागे करण्यासाठी ‘ उठ ओबीसी जागा हो. सत्तेचा तू धागा हो ‘ अशी हाक सकल ओबीसी समाजातील नेत्यांनी दिल्यानुसार स्थानिक म. गांधी चौकात विविध राजकिय पक्षातील सकल ओबीसी समाजाच्या नेते व कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केले.

यावेळी अनिल राठोड, रमेश चव्हाण, सचिन साखरे. पुंडलीक कुबडे, संदिप हिंगमिरे , गजानन कदम, नरेन्द्र पाटील , जाधव सर, प्रकाश दुधेवार सर, बाळासाहेब ओझलवार , दिलीप सुरते, डॉ. जयशंकर जवणे , कविता मारोडकर , बबलू जाधव , विष्णू शेळके रमेश रावजी चव्हाण , बाळासाहेब चंद्रे , महेश काळेश्वरकर , बळवंतराव नाईक , भास्करराव पंडागळे व आमदार नामदेव ससाणे यांची भाषणे झाली. ओबीसी समाजावर झालेल्या अन्यायाला सर्व शासनकर्तेच जबाबदार असल्याची खरमरीत टिका यावेळी करण्यात आली.
संघटक बाळासाहेब ओझलवार यांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत भास्करराव पंडागळे, बाळासाहेब चंद्रे (कृ.उ.बाजार समितीचे सभापती), माजी नगराध्यक्ष राजूभैया जयस्वाल, नप.सभापती दिलीप सुरते, बाळासाहेब नाईक, राजेश खामनेकर, पुंडलीक कुबडे, सतिष नाईक, रविकांत रूडे, राहुल सोनुने, गोविंद चटलेवाड ,निळकंठ धोबे, संजय पळसकर, सविता चंद्रे, आदिनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

*ओबीसींवरील अन्यायाला विधान सभेत वाचा फोडणार – आ. ससाणे*

ओबीसींचे रद्द झालेले आरक्षण पूर्ववत कायम करण्यात आल्याशिवाय निवडणूका घेण्यात येऊ नये, या सकल ओबीसी समाजाच्या मागणीला आपला संपूर्ण पाठिंबा असून हा प्रश्न विधान सभेत पूर्ण ताकदीने मांडणार असल्याची ग्वाही आमदार नामदेव ससाणे यांनी यावेळी आंदोलन स्थळी दिली. त्यानंतर उपविभागिय अधिकारी स्वप्नील कापडनिस यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले.

*जयंत पाटील यांची ओबीसी आंदोलनाला पाठ*

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जल संपदा मंत्री जयंत पाटील हे विधान सभेचा आढावा घेण्यासाठी आले असता पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांना ओबीसी धरणे आंदोलनाला भेट देण्याची विनंती केली व भेट देणार असल्याचा निरोपही आंदोलनस्थळी देण्यात आला. मात्र वेळेवर मार्ग बदलून
त्यांना नेण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली.