समस्येचे निराकरण : तडजोडीचे धोरण !

27

(वसंतराव नाईक जयंती- महाराष्ट्र कृषिदिन विशेष)

वसंतराव फुलसिंग नाईक हे मराठी राजकारणी होते. ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ होत. त्यानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला. वसंतराव नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात दि.०१ जुलै १९१३ रोजी झाला. त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होते. हरित क्रांतीचे प्रणेते अशी त्यांची ओळख होती. म्हणूनच महाराष्ट्र शासनाने ‘राज्य कृषिदिन’ हा दरवर्षी १ जुलै रोजी नाईक साहेबांच्या सन्मानार्थ त्यांच्या जयंतीनिमित्त घोषित केला आहे. राज्यभरात हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, हे विशेष!

कुटूंब परिचय : नाईकांचे मूळ आडनाव राठोड असे होते; परंतु गहुली हे खेडे चतुरसिंग राठोड यांनी वसविले होते. त्यांनी जमीन जुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजे पुढारी झाले. त्यावरून पुढे त्यांचे आडनाव नाईक असे रूढ झाले. चतुरसिंगाचा मुलगा फुलसिंग हा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्यांच्या पत्नी होनूबाई यांना दोन मुले झाली- राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले व वसंतराव नाईक म्हणून ओळखले जाऊ लागले.

शैक्षणिक अर्हता : वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे विविध खेड्यांमध्ये झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली व नंतर एल.एल.बी ही पदवीही मिळविली. विद्यार्थिदशेत त्यांच्यावर राष्ट्रपितामह शिक्षणसम्राट महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी यांच्या विचारांची छाप पडली होती. तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. या स्नेहातूनच पुढे त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह सन १९४१ मध्ये वत्सलाबाई यांच्याशी झाला. या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयतांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे भाग पडले होते; पण वसंतरावांनी पूर्ण विचारांती हे लग्न केले होते. त्यांची वकिलीही ठिक चालली होती. वत्सलाबाई बी.ए.असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभाग घेत असत. त्यांना दोनही मुलेच निरंजन व अविनाश असून दोघेही सुविद्य आहेत.

कार्यप्रणाली : वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच त्यांची हळूहळू प्रतिष्ठाही वाढली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. यांशिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृह दिग्रसचे ते अध्यक्ष होते. सन १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्यप्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पहिल्या निवडणुकीत ते मध्यप्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. इ.स.१९५६मध्ये राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाले. त्यानंतर ते यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले. पुढे सन १९६०मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. इ.स.१९६२च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. याच काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.

प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल? याकडे लक्ष दिले. “दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः गळफास घेईन” असे त्यांनी सन १९६५मध्ये निक्षून सांगितले होते. त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक असे. काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असतानासुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध करून दिली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला होता. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत असत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः महाराष्ट्रातील पाझर तलाव व वसंत बंधारा निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. दि.२० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली आणि मार्च १९७७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले होते.

दुःखद निधन : वसंतराव नाईक यांचे दुःखद निधन दि.१८ ऑगस्ट १९७९ रोजी सिंगापूर येथे झाले. त्यावेळी अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. पुढे त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक हेसुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इ.स.१९७०च्या दशकात मुंबईतील कम्युनिस्ट-नेतृत्वात कामगार संघटनांचे प्रत्योत्तर म्हणून शिवसेना उभी केली गेली. त्यांच्या धोरणाला अनेक पत्रकार, राजकीय अभ्यासक, तज्ज्ञ आदींकडून उजव्या विचारपक्षाच्या शिवसेना उदयाचे श्रेय आजही दिले जात आहे.
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे त्यांना जयंतीनिमित्त लक्षावधी विनम्र अभिवादन व महाराष्ट्रीयन जनतेला कृषिदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलक व शब्दांकन:-श्री कृ. गो. निकोडे गुरुजी. मु. एकता चौक- रामनगर, गडचिरोली.पो. तह. जि. गडचिरोली.व्हा. नं. ७४१४९८३३३९.