न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ

76

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.2जुलै):-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेचा अमृत महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन माध्यमाद्वारे साजरा झाला.रमणबाग प्रशालेचे पुढील नामवंत माजी विद्यार्थी – भारत सरकारचे विद्यमान केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, प्रसिद्ध जैवइंधन उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दीपक टिळक, रमणबाग माजी विद्यार्थी नियोजित महासंघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप देवधर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यामुळे रमणबाग शालाईच्या अमृत महोत्सवी उद्घाटन कार्यक्रमाची शोभा द्विगुणीत झाली होती.

कार्यक्रमाचा शुभारंभ प्रशालेचा विद्यार्थी तनय नाझीरकर याने सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताच्या पार्श्वभूमीवर डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांच्या प्रतिमा पूजनाने झाला.
प्रकाश जावडेकर यांनी शाळेतील गरीब परंतु अपार बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी निधी संकलन करण्याचे कार्य रमणबाग माजी विद्यार्थी महासंघ करेल असे आश्वासन याप्रसंगी दिले. तसेच खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी रमणबाग शाळेच्या विकासकार्यासाठी दिला असल्याचे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले.

डॉ. प्रमोद चौधरी यांनी त्यांनी प्रशालेस दिलेल्या पन्नास लाख रुपयांच्या निधीतून प्रशालेत सुरू झालेल्या विविध उपक्रमांबाबत आनंद व समाधान व्यक्त केले. अमृत महोत्सवानिमित्त प्रशालेस 75 लाख रुपयांची देणगी प्रदान करण्याचा मानस सांगितला.
डॉ. दीपक टिळक यांनी कौशल्याधिष्ठित, समाजाभिमुख व राष्ट्राभिमान असलेले विद्यार्थी घडवण्याची शाळेचे संस्थापक लोकमान्य टिळकांची परंपरा आजतागायत जोपासली आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे असे सांगितले.खासदार गिरीश बापट यांनी शाळेची व्यायाम शाळा अद्ययावत करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले.

माजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सांस्कृतिक परंपरेबरोबरच तंत्रज्ञानाधिष्टीत शिक्षण देण्यासाठी प्रशालेला सर्व प्रकारच्या विकासासाठी नियोजित रमणबाग माजी विद्यार्थी महासंघ सर्वशक्तीनिशी मदत करेल असे या प्रसंगी सांगितले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह माननीय श्री.धनंजय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रमणबाग शाळेच्या 75 वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीचा मागोवा घेतला.माजी विद्यार्थ्यांना त्यांनी शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या प्रबंधक डॉ.सविता केळकर तसेच प्रशालेचे पर्यवेक्षक सुरेश वरगंटीवार यांनी अतिथींचा परिचय करून दिला. प्रमुख अतिथींना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन प्रशालेचे मुख्याध्यापक दिलीप रावडे यांनी केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी अध्यक्षीय भाषणातून परिस्थितीत अनुकूल व कालानुरूप बदल घडवण्याचे सामर्थ्य असणारे विद्यार्थी रमणबाग प्रशाला घडवत आहे.

प्रशालेचे विद्यार्थी व्यावसायिक कौशल्याने विकसित केले जातील. जेणेकरून एकही विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर बेकार राहणार नाही. करोना काळात शिक्षकांनी केलेल्या सेवाभावी कार्याचा उल्लेख त्यांनी अभिमानपूर्वक केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शेटे यांनी केले तर शाळा समितीचे अध्यक्ष ॲड. अशोक पलांडे यांनी ऋणनिर्देश व्यक्त केले.कार्यक्रमास डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सदस्य श्रीमती सीमा पुराणिक तसेच संस्थेच्या नियामक मंडळाचे सन्माननीय सदस्य, रमणबाग प्रशालेचे हितचिंतक, रमणबाग शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक त्र्यंबक आपटे, रमणबाग प्रशालेचे आजी व माजी विद्यार्थी रवींद्र इनामदार ,नारायण गरुड, अजित संभुस, छोटूराम शिंदे ,आजी व माजी शिक्षक व शिक्षकेतर वर्ग ऑनलाइन माध्यमाद्वारे उपस्थित होते.