शिंदेंचा आपला शब्द, एक भ्रम..!

30

कॉंग्रेस ही न मिटणारी संस्कृती, वैचारिक परंपरा अशा वास्तवात नसलेले अनेक गुण वैशिष्ट्ये जोडून सद्यस्थितीत कॉंग्रेस पक्षाच्या उसवलेल्या उशीत हवा भरण्याचा केविलवा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नेमलेले सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.इंदापूर येथे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांच्या अमृतमहोत्सवी समारंभात सलग दोन निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आपण अडगळीत पडलो याची नकळत त्यांनी कबुलीच दिली आहे. आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना त्यांनी म्हटले की,’पूर्वी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती’. होती म्हणजेच आता नाही हे सत्य त्यांनी स्वतःच उघड केले आहे.पुढे जाऊन ते म्हणतात की,१९७४-७५ घ्या काळात पक्षाची वैचारिक शिबिरे भरवली जायची आणि त्यात चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा सुचविल्या जात असत.
साधारण ७४-७५ चा काळ म्हणजे राजकारणात शिंदें तसे नवखे होते.अजून त्यांना कॉंग्रेसमधील छक्के पंजे माहित व्हायचे होते. हा त्यांच्या राजकारणाचा सुरुवातीचा काळ होता.

त्यावेळी कालपर्यंत जिथून शिंदे प्रतिनिधित्व करत होते त्या सोलापूरवर शरद पवारांची चांगली पकड होती. साधारण १९७८ नंतर शिंदे सगळीकडे लक्ष घालू लागले. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यानी तयार केलेल्या प्रतिमेनुसार आणि त्यांच्या डोक्यावर हायकमांडचा हात आहे असा समज पसरवला गेल्यामुळे सामान्य लोकांना ते एक पॉवर फुल नेता वाटू लागले. आणि त्यांच्या सार्वजनिक दिनचर्येवरुनही त्याची प्रचिती येऊ लागली.पण वास्तवात तसे नव्हते.काही तरी पद होतं म्हणून लोक सभोवताली असायची कॉंग्रेस पक्ष हा जातीचे समीकरण बांधल्याशिवाय कधीच कुणालाही मोकळीक देत नाही आणि मोठं तर कुणालाच होऊ देत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे.

तरिही शिंदे कॉंग्रेसला समजू शकले नाहीत आणि “काॅंग्रेस संपली असे म्हणणारे संपून जातील पण काॅंग्रेस संपणार नाही”.याची टाळ कुटतच राहिले. हे वाक्य निष्ठावंत (?) कार्यकर्त्यांसमोर बोलून टाळ्या मिळविण्यापर्यंत ठीक आहे.परंतु वस्तुस्थिती आज तरी राजकीय दृष्ट्या स्वतः शिंदे आणि काॅंग्रेस संपली अशीच आहे.एके काळी म्हणण्यापेक्षा अगदी कालपर्यंत गांधी घराण्याचा करिष्मा होता.म्हणून तर राजीव गांधींच्या हत्येनंतर संपलेल्या, ढासळलेल्या काॅंग्रेसचा डोलारा सांभाळून सोनिया गांधींनी काॅंग्रेसमध्ये अक्षरश: जान आणली. नव्हे, मृतवत कॉंग्रेस पक्षाला संजीवनी देऊन सलग दहा वर्षे केंद्रात सत्ताही मिळवून दिली.

परंतु लाचार,कर्तृत्वहीन आणि केवळ भाटगिरी करणा-यांचे नेतृत्व कुणालाही कधीही अधिक काळपर्यंत करता येत नाही हे एक वास्तव आहे. आता काही केल्या काॅंग्रेस उभारी घेणं अशक्य आहे ही गोष्ट गांधी कुटुंबातील चाणाक्ष माय-लेकांनी हेरूनच नेतृत्व करायचं नाकारले आहे. कदाचित तो त्यांचा भावनिक दबाव तंत्रही असू शकतो.असो !काॅंग्रेस ज्या ज्या वेळी संकटात असते तेव्हां दलित आणि अल्पसंख्याकांचे कार्ड खेळते हा आजवरचा इतिहास आहे.आणि या गोष्टींना भुलून,अल्पसंतुष्ट दलित आणि मुस्लिम पुढारी,(नेते नव्हे !) कु-हाडीचे दांडे होऊन आपापल्या समाजाच्या महावृक्षाचे फांद्या छाटायच्या कामात त्यांच्या मदतीला जातात.

अशा लोकांच्या झोळीत मोठमोठी ‘पदं’ टाकली जातात पण ‘पाॅवर’चे काय ? पॉवर शून्य (0). धोरणात्मक निर्णय घेण्याच्या कामात तर त्यांना कधीही सामावून घेतले जात नाही. केवळ मोठमोठे पद आणि माया जमविण्याच्या कामात अडथळा निर्माण न करण्यालाच हे अल्पसंतुष्ट पुढारी आपली ‘पाॅवर’ समजून पक्षाची चाकरी करायला लागतात.भाजप हा जातीयवादी पक्ष आहे यात वादच नाही.त्यांचे पत्ते उघड आहेत.परंतु स्वतः कॉंग्रेस पक्ष देखील जातीयवादी असूनही आपले पत्ते शिताफीने दडवून भाजपाचा जातीयवाद या एकाच भीतीचा गोळा दाखवून वर्षानुवर्षे दलित आणि मुस्लिमांना दावणीला बांधण्यात काॅंग्रेस यशस्वी होत ली आहे.

तसा इतिहासच तपासायचा झाला तर खरा जातीयवादी पक्ष काॅंग्रेसच आहे.तसे नसते तर अख्या जगाने बुद्धीवंत म्हणून गौरविलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना काॅंग्रेसने निवडणुकीत दोन वेळा पराभूत केलेच नसते.आणि जाणिवपूर्वक त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कारापासून वंचित ठेवले नसते.अशारितीने डॉ.आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देणा-या दलित पुढा-यांची किमान भूक ओळखून आजपर्यंत काॅंग्रेसने त्यांना सतत प्रसिद्धीच्या झोतात ठेवायची काळजी घेतली आहे.राजकारणात आपली स्वतःची अशी एक विशिष्ट ओळख निर्माण करायची असेल तर बहुजनातील शिक्षीतांनी पक्षाच्या चुकीच्या धोरणांविरुद्ध ब्र ही न काढता त्यांच्या हां ला हां मिळवून लाचारी पत्करायला भाग पाडणा-या पक्षप्रमुखांच्या पायात लोळण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत होऊन राहणे केव्हांही योग्यच.आणि नेमकं हेच शिंदेंना करता आले नाही.मोजकी दहा बारा डोकी सोडली तर त्यांची आणि सामान्य सोलापुरातील नाळ कधी जुळली नाही.

डॉ बाबासाहेब आंबेडकर दोन वेळा लोकसभा निवडणुकीला उभे राहीले आणि दोन्हीही वेळा कॉंग्रेस कडून पराजित झाले. इथे कुणालाही कमी लेखण्याचा अथवा अपमर्द करायचा प्रश्न नाही आणि हेतू ही नाही. तर, कॉंग्रेस कडून दलीत आणि मुस्लिमांचा मतांसाठी वापर तर करायचा परंतु त्यांची जनमानसात जी छबी उभी करायची कॉंग्रेसची नीती आहे यावर प्रकाश टाकायचा प्रयत्न आहे. थोडासा विचार करा जगजीवनराम आठ वेळा लोकसभेला उभे राहिले आणि आठही वेळेस निवडून आले. इतकेच काय ते कायम म्हणजे अखेरपर्यंत मंत्रीमंडळात राहिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि जगजीवनराम दोघेही बहुजनांचे नेते.पण आज उपेक्षित, वंचित, भटके,दलित, अल्पसंख्याक आणि बहुजनांसाठी सर्वमान्य प्रेरणा स्थान म्हणून डॉ.आंबेडकरांना मानले जाते जगजीवनराम यांना नाही.हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. कारण वरवर जरी दिसत नसले तरी पक्षांतर्गत अशा नेत्यांना देण्यात येणारी दुय्यम वागणूक आणि महत्व हेच याचे कारण आहे.

आंबेडकरांनी स्वाभिमानाला कधीच दुय्यम स्थान दिले नाही म्हणून निवडणुकीत दोन वेळा हारूनही बाबासाहेब घरा घरात विराजमान आहेत.मात्र जगजीवनरामांचा एक साधा फोटोही कॉंग्रेस कार्यालयात लागत नाही हेच कॉंग्रेसचे खरं रूप आहे. इतकंच काय निवडून येणार नाही हे ढळढळीत सत्य असतानाही उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीत उमेदवारी देऊन शिंदेंची नाचक्की करण्यात आली.आणि निवडून येण्याची पक्की शास्वती असतांना मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही.याचा अर्थ काय घ्यायचा ? शिंदे आज जरी हताश होऊन ‘पूर्वी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती’ असे म्हणत असले तरी ते लोकमानसातले कधीच नेते नव्हते आणि नाहीत.ते तब्बल चाळीस वर्षे राजकारणात आहेत.

मोठमोठी पदंही भूषविली आहेत पण आपल्या शहराच्या विकासासाठी भरीव असे काहीच न केल्यामुळे काही मोजकी डोकी वगळता मनापासून आपल्या हक्काचा असा जनाधार ते आपल्या मतदारसंघात नव्हे,तर आपल्या सोलापूर शहरात निर्माण करु शकले नाहीत. ते हायकमांडने सोयीनुसार वापरायचे दलित कार्ड आहेत हे वेळोवेळी समोर आले आहे.तसे नसते तर त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात निवडणूक जिंकूनही पक्षात वरचढ असलेल्या प्रस्थापितांची मर्जी राखण्यासाठी त्यांना पुन्हा मुख्यमंत्री न करता सोयीनुसार आंध्रप्रदेश चे राज्यपाल म्हणून पाठविण्यात आले नसते. कॉंग्रेसचे हेच खरं रूप शिंदे ओळखून राहिले असते तर आज एवढं हताश होण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती हे एक वास्तव आहे.इतकंच.

✒️लेखक:-विठ्ठलराव वठारे(अध्यक्ष,भारतीय जन लेखक संघ, महाराष्ट्)