विद्युत वाहनांचे सर्वात मोठे चार्जिंग केंद्र नवी मुंबईत

56

✒️नवी मुंबई,विशेष प्रतिनिधी(अतुल उनवणे)

नवी मुंबई(दि.20जुलै):-विद्युत वाहनांच्या चार्जिंगसाठी नवी मुंबईतील तुर्भे येथे मजेंटा कंपनीने सुरू केलेल्या देशातील सर्वात मोठ्या चार्जिंग केंद्राचे उदघाट्न उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.

दिवसें दिवस इंधनाचे दर गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडत नाही. याला पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याचे शासनाने धोरण ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी चार्जिंग केंद्राची गरज भासणार आहे. ही गरज मजेंटा कंपनी नक्कीच पूर्ण करील, असे सुभाष देसाई म्हणाले

नवी मुंबई येथे सुरू झालेले हे देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन असल्याचा कंपनीने दावा केला आहे.

या ठिकाणी एकूण २१ चार्जर असून यातील चार डीसी  चार्जर १५ ते ५० किलोवॅट क्षमतेचे आहेत. तर १७ एसी चार्जर ३.५ ते ७.५ किलोवॅट क्षमतेचे आहेत. यातील एसी चार्जर पूर्णपणे भारतात तयार केले आहेत. हे चार्जर एकत्रित ४० केव्ही सौर ऊर्जेसह स्थानिक ग्रिडला जोडले आहे. या ठिकाणी २४ तास सेवा दिली जाणार असून त्याचा वापर चार्जग्रिड अ‍ॅपद्वारे केला जाऊ शकतो.