जगी गुरुविणा नाही : मानव विकास काही !

22

(गुरुपौर्णिमा- आषाढी पौर्णिमा विशेष)

मनुष्य जन्माला आल्यापासून त्याच्यावर नानाप्रकारचे संस्कार घडतात. ते संस्कार कोण टाकतो? आईवडील किंवा पालक, होय ना? कसे खावे, प्यावे, बसावे, उठावे, हसावे, रडावे, आनंदी-दुःखी व्हावे, कपडे नेसावे, मलमूत्र विसर्जन कोठे व कसे करावे? आदी सर्व प्राथमिक स्वरुपातील क्रियाकलापाचे ते धडे देतात. कधी हसतखेळत, कधी रागाने दाटून धमकावून तर कधी मारझोड करूनही! मग ते कोण? पालनपोषण व सुसंस्कारीत करणारे जीवनातील आद्य गुरु ज्यांना म्हणतात ते आईवडील व पालकच नाहीत का? ‘खोटे बोलेल तो मुडदे खाईल, यापेक्षा आणखी समजावून देता येत नाही. तुमच्या मताशी आपण सहमत, हे फक्त माझ्या देखत बोलता.’ असे सिख धर्मसंस्थापक तथा ग्रंथकार श्रीगुरु नानकदेवजी महाराजांनी समजावले आहे-

“कूड़ बोलि मुरदारु खाइ।। अवरि नौ समझावणि जाइ।। मुठा आपि मुहाए साथै।। नानक ऐसा आगु जापै।।१।।”

आपण समाजात नेहमी मानतो, म्हणतो, ऐकतो की लेखन वाचन शिकविणारे गुरु आहेत. मानवाला अतिशय महत्वाचा, संकटातून सुटण्या-सावरण्याचा अथवा उत्कर्ष साधण्याचा सल्ला देणारे मार्गदर्शक हे गुरूच ठरतात. त्यात आपले प्रियाप्रिय मित्र, शेजारी, नातलग किंवा अनोळखी व्यक्तींचा सुद्धा समावेश असतो. शरीराचा आजार दूर करणारे डॉक्टर व वैद्य हेही गुरूच आहेत. गुण, कलाकौशल्य व जीवनविद्या शिकविणारे सर्व मार्गदर्शक हे गुरूच! संतांनी सांगितले आहे- “मंत्र गुरू, तंत्र गुरू! विद्या गुरू, अविद्या गुरू!! ऐसे असती अनेक गुरू! परि मोक्षदाता सद्गुरू वेगळाचि!!” एकाच गुरूच्या सहवासात सारीच कामे पूर्ण करणे शक्य होत नाहीत. तत्वज्ञांकडून गुरूंचे प्रकार अनेक सांगण्यात येतात. जसे- वाचक, बोधक, साधक, धर्म, आध्यात्मिक, योगी आदी. समर्थ सद्गुरू चौऱ्यांशी लक्ष जीवयोनी म्हणजेच वारंवार जन्म घेणे व मरणे अर्थात संतोक्तीप्रमाणे “पुनरपि जननम् पुनरपि मरणम्! जननी जठराग्नि शयनम्!!” ही शृंखला तोडण्यास सक्षम असतो. जीवनात अशा मोक्षदात्या सद्गुरूची खुप गरज असते. मृत्यूपश्चात सद्गुरूच्या ब्रह्मज्ञानाने निराकारात- निरंकारात विलीन होऊन निरंकारच बनून जाणे, यालाच मोक्षप्राप्ती म्हटले जाते. ही मोक्षप्राप्ती इतर गुरूंच्या सहवासात मिळणे शक्य होईल का? किंवा सद्गुरूकडून किराणा सामानाची अपेक्षा वा मागणी करणे योग्य राहिल का? संतश्रेष्ठ व ग्रंथकार युगदृष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराज सत्यकथन करतात-

“सत्गुरु उसको जानिये जो सच का बोध कराता है। तत्व ज्ञान देकर जो मन के सारे भ्रम मिटाता है। नित्य कराये अलख की लखता मन से वैर मिटाता है। कहे ‘हरदेव’ सत्गुरु ही प्यार का जहाँ बसाता है।”

इतर कोणी गुरूंना विसरून कृतघ्न होत असतील ते होवोत, मात्र ब्रह्मज्ञानींना ते वर्तण शोभा देत नाही. कारण देव, गुरू व संत हे वेगळाले नाहीतच! प्रत्यक्षात निर्गुण-निराकार असलेला परमात्मा परमेश्वर निर्बुद्ध नवजात बालकाला समजूतदार माणसात परावर्तित करण्यासाठी तो स्वतः मार्गदर्शक, गुरू, संदेशवाहक, प्रेषित, सद्गुरू आदी रुपाने अर्थात आत्मा या देहधारी रूपाने वावरत असतो. परब्रह्म परमात्मा सर्वेश्वर याला आदि, अंत वा पारावार काहीच नाही. तोच आत्मा, तोच परमात्मा आणि तोच गुरू व सद्गुरूही तोच असतो. हे साराचेही सार समर्थ सद्गुरूच समजावून सांगू शकतो. पवित्र बायबलमध्ये सुद्धा म्हटले आहे- “आय अम अल्फा अॅण्ड ऑमेगा, दी बिगीनिन्ग, दी एण्डिन्ग साइथ दी लॉर्ड, विच इज, अॅण्ड विच वज, अॅण्ड विच इज टु कम दी आल्माइटी!” या दिवसाला वर्षातील पहिला सण म्हणत काही लोक पशूहत्या करून मांसाहार घेतात. हे कृत्य गुरुपौर्णिमेचे महत्त्व न कळाल्याने घडत असावे, असे वाटते. हे पाप आहे, याबद्दल विश्वशांतीचे अग्रदूत महामानव तथागत गौतम बुद्ध म्हणतात-

“सुकरानि असाधूनि अत्तनो अहितानि च। यं वे हितञ्च साधुञ्च तं वे परमदुक्करं।।” (पवित्र धम्मपद: अत्तवग्गो: कथा- १६३ : गाथा- १२.७) ‘अर्थ- वाईट करणे सोपे आहे. तसेच आपले अहित करणे त्याहून सोपे आहे. परंतु जे हितकर व कल्याणकारी आहे ते करणे फार कठीण आहे.’

मानवाला शिक्षण, प्रशिक्षण, मार्गदर्शन, वळण, सल्ला आणि संस्कार द्यावे लागतात. तरीही तो रुळावर येत नाही. त्याचे पाय नको नको त्या दिशेने घसरून तो पथभ्रष्ट होतो व वाममार्गावर मौजमस्तीने चालत असतो. प्राण्यांचे तसे नाही. त्यांच्या अंगी काही उपजत जे सद्गुण असतात ते माणसात नसतात. म्हणून त्याला मार्गदर्शकाच्या हस्ते सक्तीचे शिक्षण द्यावे लागते. सद्गुण वा दुर्गुण शिकवतो तोही गुरुच नसतो का? दासाने एक नरमांजर पाळले आहे. आम्ही त्याचे नाव ठेवले मिण्टू! अगदी जन्मल्यापासून तो आजवर माणसांच्या सहवासात वावरत असतो. मात्र तो स्वतःचे मलमूत्र न चुकता स्वतःच रेती-मातीने झाकून टाकतो. आम्ही हा असला चांगुलपणा काही त्याला अजिबात शिकवलेला नाही. माणूस मात्र सर्वकाही समजून उमजूनही कोठेही कचरा, घाण, प्रातःविधी उरकून टाकतो. ही त्याची दुर्बुद्धीच ना? मग तो उपकारकर्त्याचे उपकार विसरून कृतघ्न का नसेल होत? याचा विचार आपण वाचकांनीच करावा. सल्लाल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुहम्मद पैगंबर साहेबांनी फर्मावले आहे-

“और हे नबी, हमने तो तुम्हें सभी मनष्यों के लिए सुचना देने वाला और सचेत करने वाला बनाकर भेजा हैं, परन्तु अधिकतर लोग जानते नही हैं।” (पवित्र कुराण : ३४/२८).

मातेने जन्म देताच त्याला एकट्याला रानात टाकून दिले असेल. त्या अर्भकास मानवाचा सहवासच मिळाला नसेल. तेव्हाच तो छातीठोकपणे सांगू शकेल की तो निगुऱ्या- गुरु नसलेला अर्थात रानटी आहे, अन्यथा कदापिही नाही! संत तुकारामजी महाराज म्हणूनच म्हणतात- “आम्हा नाही नाम रुप! आम्ही हो आकाश स्वरुप!! अणू रेणू या तोकडा! तुका आकाशा एवढा!!” म्हणून मार्गदर्शक, गुरू अथवा सद्गुरू यांना अंतरू वा विस्मरू नये. त्या सर्वांच्या उपकाराची जाणिव व स्मरण नित्यनेमाने आजीवन ठेवणे मनुष्याचे आद्य व परम कर्तव्य आहे. निदान गुरुपौर्णिमा या सणाच्या दिवशी मनोमन नमन करावे. प्रत्यक्ष पाद्यपुजा वा पादुकापूजन नाही केले तरी चालेल.

श्रीगुरवे नमः!
!! चरणस्पर्श धन निरंकार जी !!

✒️चरणधूळ -श्री निकोडे कृष्णकुमार गुरूजी[आध्यात्मिक विचारवंत व संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.]मु. पो. ता. जि. गडचिरोली, व्हा.नं. ७४१४९८३३३९.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com