एन.एम.एम.एस.परीक्षेत टाकळसिंगच्या जिल्हा परिषद शाळेचे २२ विद्यार्थी उत्तीर्ण

29

🔸तहसिलदार श्रीम.शारदा दळवी व गटविकासअधिकारी सुधाकर मुंडे यांनी दिली प्रशालेस भेट

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.27जुलै):-महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे अंतर्गत घेण्यात येत असलेल्या राष्ट्रीय आर्थिक दृष्टया (NMMS) शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्हा परिषद माध्यमिक शाळा टाकळसिंग या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मध्ये या शाळेचे २७ विद्यार्थी परिक्षेस बसले होते.त्यापैकी २२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.आष्टीच्या तहसिलदार श्रीम.शारदा दळवी,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप यांनी शाळेस प्रत्यक्ष भेट दिली.यावेळी कोरोना नियमांचे पालन करुन उत्तीर्ण विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक हसन सय्यद व सर्व शिक्षकांचे तहसिलदार श्रीम.शारदा दळवी यांनी अभिनंदन केले.

जिल्हा परिषद टाकळसिंग शाळेतुन २००७ पासुन आजपर्यंत ११५ विद्यार्थी पात्र ठरले असून प्रतिवर्षी १२ हजार रुपये या प्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांना ४८ हजार प्रमाणे ५५ लाख २० हजार रुपयांची शिष्यवृत्ती या शाळेतील विद्यार्थ्यांना मिळत आहे.बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत सर्वात जास्त शिष्यवृत्ती मिळवून देण्याचा टाकळसिंग जिल्हा परिषद शाळेने मान मिळवला आहे.अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक महेशकुमार शिंदे यांनी दिली आहे.शाळेची गुणवत्ता व विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी यामुळे परिसरातील टाकळसिंग,हिंगणी,दैठणा,हनुमंतगाव,खानापुर,चिखली,वाळुंज,पारगाव,सांगवी या नऊ गावांचे पालक,विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी लागावी या करीता इयत्ता १ ली पासुन वेगवेगळया स्पर्धा परिक्षेचे प्रशालेत आयोजन करण्यात येते.१२ ते १३ वर्षापासुन या शाळेने निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन करतात तसेच विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे उपक्रम राबवून घेतात.

गावातील सर्व ग्रामस्थ व पालकांचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे असे ही मुख्याध्यापक महेशकुमार शिंदे यांनी शेवटी सांगीतले.यावेळी तहसिलदार श्रीम.शारदा दळवी,गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे,आष्टी पंचायत समिती सभापती बद्रीनाथ जगताप,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगताप,टाकळसिंग ग्रा.प.चे सरपंच कांतीलाल जोगदंड,टाकळसिंगचे ग्रामसेवक विठ्ठल राऊत,नवनाथ लोंढे,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.