प्रभू भक्ती : संत सानिध्यात जीवन मुक्ती !

27

(आत्मानुभूतीच्या चष्म्यातून…)

संतांच्या पावन सानिध्यात सन्मार्गावरून भरकटलेली व्यक्ती किंवा महापातकीसुद्धा सुज्ञ व सरळमार्गी होतो. महाकारुणीक महामानव तथागत गौतम बुद्धांच्या सहवास व हितोपदेशाने हत्यारा अंगुलीमाल पुण्यप्रतापी श्रमण झाला. देवर्षी नारद मुनींच्या सहवासाने डाकू वाल्याचा रामायणकार वाल्मिक ऋषी निबजला. अनंत काळापासून आजपावेतो संतसंगतीचा महिमा अगाधच अनुभवास येत आहे. शूद्र प्राणीमात्रही या अशा संतसानिध्याने पुढे मनुष्यजन्म प्राप्त करून आत्मकल्याणाचा मार्ग सुकर करतात, प्रभूभक्तीचा निजध्यास घेतात व जीवन मुक्ती प्राप्त करतात, हे काही खोटे नाहीच! कर्मयोगी संत सावताजी माळी महाराज सांगतात-

“मागणें तें आम्हा नाहीं हो कोणासी। आठवावें संतासी हेंचि खरें॥१॥पूर्ण भक्त आम्हां ते भक्ती दाविती। घडावी संगती तयाशींच॥२॥सावता म्हणे कृपा करी नारायणा। देव तोचि जाणा असे मग॥३॥”

यथोचित परिवर्तनीय संतसहवास मिळण्यासही भाग्योदय व्हावा लागतो. हेही तितकेच सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट आहे. यामुळे विदीर्ण झालेले, भंगलेले व रसातळी गेलेले संसार सावरून सुखोपभोग घेताना दिसून येतात. संतसानिध्याला लाथाडून दूर पळून गेलेले मातीमोलही होताना दिसत आहेत. म्हणून जगद्गुरू संत तुकारामजी महाराज देवाला साकडे घालतात- “न लगे मुक्ती धन संपदा। संतसंग देई सदा।। तुका म्हणे गर्भवासी। सुखे घालावे आम्हाशी।।” एखादी व्यक्ती अकाली निधन पावली तर जनमानसात नाना तर्कवितर्क लढविले जातात. कोणी म्हणतात कि महापापी होती म्हणून मेली, तर कोणी म्हणतात कि महा पुण्यवान होती म्हणून… ती पुण्यवान वा पापी होती अशातला भाग नाहीच. तिला मागील जन्माचे संचित भोग भोगून देणे क्रमप्राप्त होते. अर्थात तेवढेच तिचे आयुष्य ठरलेले होते. हे मत दास संतोक्तीच्या आधारावर व्यक्त करीत आहे. संतशिरोमणी युगदृष्टा निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज सांगतात- सम्पूर्ण हरदेव’ बाणी : पद क्र.२८९-

“भक्त प्रभु का इस दुनिया में सुख दुख से उठकर रहे।
शुकराने का भाव ही साधो नित उसके भीतर रहे।
तन जाता तो जाता है या धन जाता तो जाता हैं।
कहे ‘हरदेव’ भगत ईश्वर की भक्ति छोड़ न पाता है।”

परमपिता परमेश्वर आपल्या सृष्टी संचलनात मुळीच गफलत, कसर, गल्लत किंवा धोकाघडी करत नाही. दुःखद घटनेने ब्रह्मनिष्ठ संत वा ज्याला नित्य संतांचा शेजार आहे तो सदा स्थितप्रज्ञ असतो. यंदाच्या निरंकारी वार्षिक संतसमागात सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवसिंहजी महाराज यांनी ब्रह्मज्ञानींच्या जीवनात अत्यावश्यक ‘स्थिरता’ उद्बोधित केली अगदी तशीच! दि.२१ जुलै २०२१ रोजी आमचा दोन वर्षाचा मिण्टू- पाळीव मांजर तीन कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला. त्याच्या अकाली जाण्याने आम्ही दोघेही बापलेक दुःखी झालो होतो. चार दिवसांनंतर दासाला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात शुभ्र पोषाखात एक संत महात्मा आले. आम्ही दोघेही एकमेकांना चरणस्पर्श धन निरंकार केले. महात्मा म्हणाले कि महाराज, आपण महान स्थिरता साधलेले, स्थितप्रज्ञ व नितसमाधानी म्हणून आपल्या दर्शनास आलो खरा… पण आपण तर नाराज दिसता. कारण काय? संतश्रेष्ठ श्रीगुरु नानकदेवजी महाराज म्हणतात- पवित्र गुरूग्रंथ साहिब : सलोकु गउड़ी सुखमनी महला-५ : असटपदी : पृ. क्र.२९३-

“संतसंगि अंतरि प्रभु डीठा। नामु प्रभु का लागा मीठा।।
सगल समिग्री एकसु घट माहि। अनिक रंग नाना द्रिसटाहि।।
तिनि देखिआ जिसु आपि दिखाए। नानक तिसु जन सोझी पाए।।”

दासाची प्रेमळ पत्नी सेवादार भगिनी संत आशाताई कृष्णकुमार निकोडे या दि.६ एप्रिल २०२१ला अल्पायुषीच ब्रह्मलीन झाल्या. त्यानंतर अवघ्या चार महिन्यातच आमचा लाडाचा लाडोबा मिण्टू आम्हाला पारखा झाला हो! आमच्यासोबत तो प्रार्थना, धुनी व सुमिरणाच्या वेळी शांत बसत होता. दासाला विरह सहन करीत बसण्यास सोडून प्रभूने त्यांनाच आधी उचलले, ते सर्वप्रिय झाले होते हो! महाराज, दास किती महापातकी व हतभागी? काय करणार? अशी रडकथा दासाने व्यक्त केली. तेव्हा महात्म्यांनी समजाविले की कर्मयोगी भगिनी संत आशाताईं जीवन मुक्त होऊन त्यांचे अवतार कार्य पूर्णत्वास गेले म्हणून ब्रह्मलीन झाल्या. आपले कार्य अजूनही शिल्लक आहेत. आता राहिला मिण्टुचा प्रश्न… त्याला त्याच्या जन्मापासून आपला संपूर्ण ब्रह्मज्ञानी संत परिवार लाभला. आपल्या तो पावन संतसानिध्यात वावरला, जीवन मुक्त ठरला. त्याचा पुण्यसंचय वाढला. म्हणून निरंकार प्रभूने त्याच्या प्राणीजन्माची श्रुंखला खंडित करून त्यास नरजन्मास धाडले, हे नक्कीच! अन्यथा भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे-

“अनंत जन्मांच्या शेवटी। मनुष्य जन्म पावे पाठी।। त्याउपरी उत्तम किरटी म्या रचिली नाही।।”

आपण महापातकी नाहीत, तर जीवांचे कल्याणकर्ते व जीवोद्धारक ठरत आहात. धन्य धन्य आपण व आपला संतपरिवार! असे म्हणताच स्वप्न भंगले व जाग आली.
असे असले तरीही आपण राहून राहून त्यांच्या वियोगाने दुःखीकष्टी होतच असतो. कारण या महामायेच्या दुनियेत वावरूनच माया, ममता, दया, प्रेम, नम्रता, बंधुभाव, अहिंसा, सहनशीलता, परोपकार, सेवा, प्रभू भक्ती, आदी दैवी गुण प्राप्त करता येतील, अन्यथा कदापिही नाही! यासाठीच संतकवी नामदेवजी महाराज प्रार्थना करतात-

“वदनी तुझें मंगल नाम। हृदयी अखंडित प्रेम।।
नामा म्हणे केशवराजा। केला नेम चालवी माझा।।”

अशीच संतसंगती सकल मानवमात्रांस लाभून सर्वांचे कल्याण होवो! धन निरंकार जी!!

✒️संत चरणरज -श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(लेख विभाग प्रमुख व जिल्हा प्रतिनिधी- म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारी तथा संत-लोक साहित्याचे गाढे अभ्यासक.)मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा.नं.९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com