आपण अन्न खातो कि अन्न आपल्याला खाते?

23

देशाच्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा करण्यामध्ये शासन स्तरावर खूप मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये क्रांती होऊन संकरित अन्नधान्याच्या जातीचे संशोधन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ होत असल्याने शासनाला या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्नधान्य पुरवठा करणे अगत्याचे असल्यामुळे अनेक कृषी संशोधनातून अन्नधान्य पिकांच्या विविध संकरित वाणाची निर्मिती आपल्या कृषी शास्त्रज्ञांनी केली. व आपण बऱ्याच अन्नधान्य पिकांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो. यामध्ये प्रामुख्याने गहू व तांदूळ या दोन अन्नधान्य पिकांचा समावेश होतो. तसेच त्याखालोखाल ज्वारी, कापूस व ऊस यांचाही क्रमांक लागतो. याबरोबरच पुढे जाऊन भाजीपाला व फळे तसेच दूध मांस, मासे,अंडी यांच्या उत्पादनात आपल्या देशाने मोठी क्रांती घडवून आणली आहे.
वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील कृषी उत्पादने खूपच कमी प्रमाणात निर्माण होत होती.

त्यामुळे 1972 साली अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागला. लोकांनी अक्षरश: झाडाची पाने खाऊन दिवस काढले. याच काळात अमेरिकेसारख्या बलाढ्य देशातून जनावरे ही खाऊ शकत नाहीत असे मिलो सारखे धान्य आयात करावे लागले व जनतेची भूक भागवावी लागली. यातून धडा घेऊन शासनाने अन्नधान्य पिकांत क्रांती करून हायब्रीड वाणांची निर्मिती केली व हरितक्रांती झाली.
याचबरोबर पारंपारिक शेतीत पूर्वी मोठ्या प्रमाणात खत म्हणून गोठ्यातील गायी बैलांचे शेण वापरले जायचे. त्यामुळे पिकांना मिळणारे पोषक मूलद्रव्ये विपुल प्रमाणात असायचे व जमिनीची प्रतही सुधारली जायची. पण हळूहळू यांत्रिक शेतीच्या नावाखाली गोठ्यातून गाई-बैल हद्दपार होत गेले व खतांचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे अन्नधान्य उत्पादनात घट येऊ लागली. याला पर्याय म्हणून रासायनिक खतांची निर्मिती झाली. अनेक सरकारी व खाजगी कंपन्यातून मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचे उत्पादन होऊ लागले व सर्व शेतकऱ्यांना पुरविले जाऊ लागले.

सेंद्रिय शेतीतून पिकविले जाणारे अन्नधान्य आता रासायनिक खतांच्या जोरावर पिकविले जाऊ लागले. यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ झाली. पण त्याची चव व पोषक तत्वे याची प्रत मात्र ढासळली. शेतकरी अधिकाधिक उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करू लागले. याचा परिणाम पिकांवर होत आहे. त्यातून निघणारे अन्नधान्य,भाज्या, फळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरत आहेत. परिणामी धान्य,भाज्या, फळे खाण्यालायक राहत नाहीत. भारतामध्ये अन्नधान्य,भाजीपाला,फळे यांच्या उत्पादनासाठी ठराविक प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतात. हे लक्षात आल्यामुळेच युरोपीय देशात भारतातील उत्पादनाची कडक परीक्षा केली जाते. त्या चाचणीत योग्य असलेलाच शेतमाल स्वीकारला जातो. म्हणजे निव्वळ नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती केली असेल त्याच शेतमालाला युरोपीय देशात मागणी असते.

आता तर रासायनिक खतांबरोबर कीटकनाशके व औषधे मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. त्यामुळे अन्न प्रदूषित झाले आहे. खतांतील व औषधांतील रसायने खाद्यपदार्थाच्या माध्यमातून सरळ आपल्या रक्तात पोहोचत आहेत. याबाबत आपणांसमोर पंजाबमधील अनुभव मांडता येतील.पंजाब मध्ये सर्वत्र समृद्धी असल्यामुळे तेथे शेतात राबायला माणसे कमी आहेत. त्यामुळे तेथील शेतकरी पिकांतील तण काढण्यासाठी तणनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या विषारी तणनाशकांचे अंश तांदूळ व गव्हामध्ये उतरतात. व अन्नाच्या माध्यमातून अनेकांच्या रक्तात ही उतरले आहेत. लाखो लोक कॅन्सर पीडित झाले आहेत. पंजाब मधील केवळ अन्नधान्यात नाही तर पाणी, जमीन सुद्धा विषारी बनले आहे. व त्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येत आहे. सांगावयास खेद वाटतो की, पंजाब मधून एक रेल्वे जी कॅन्सर ट्रेन या नावाने चालवली जाते. त्या ट्रेन मध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण उपचारासाठी इतर मोठ्या शहरांमध्ये जाताना दिसतात. ही सर्व मानव जातीला शरमेने मान खाली घालायला लावणारी बाब आहे. एवढे मोठे दुष्परिणाम दिसून येताना शासन स्तरावरुन तात्काळ यावर उपाय योजना करणे अगत्याचे आहे.

आता सर्व जबाबदार व्यक्तींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण बाहेर सर्वत्र विषयुक्त अन्नधान्यच उपलब्ध आहे.
तेव्हा आपण शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा वापर करून जैविक व नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. शेतीमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून. *अमृत जल, बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत, गोकृपा अमृत, कंपोस्ट खत,गांडूळखत, शेणखत यांचा वापर वाढवला पाहिजे. तसेच रासायनिक कीटकनाशकांऐवजी दशपर्णी अर्क ,नीमास्त्र, ब्रम्हास्त्र, अग्नी अस्त्र,नीम मलम,बुरशीनाशके यांचा वापर करून शेती केली पाहिजे.* जेणेकरून जमिनीची गुणवत्ता व पिकांचा दर्जा दोन्ही मध्ये ही सुधारणा होईल.
अन्यथा भावी पिढी अतिशय रोगग्रस्त निर्माण होईल. यात शंका नाही. आज आपण खातो ते खाद्यतेल मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त आहे. ते तेल कमीआणि रसायनच मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे विपरीत परिणाम सर्वांना भोगावे लागत आहेत.याकडेही आपण कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे.
आपण खातो ते दूध, तूप किंवा डेअरी प्रोडक्ट्स हे ही रासायनिक पदार्थांच्या मिश्रणातून टिकवली जातात.
एवढेच काय दुधाला चांगला भाव लागावा म्हणून दूध उत्पादक आपल्या दुधामध्ये युरियासारखे रासायनिक खत टाकताहेत. दूध खराब होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात खाण्याचा सोडा दुधात वापरला जातो. दुभत्या जनावरां ची दूध देण्याची क्षमता वाढावी म्हणून विविध रासायनिक औषधे त्या जनावरांना दिली जातात.

अशा अनेक प्रकारे आपल्या आरोग्याशी खेळ केला जातो. असे विषारी दूध पिऊन कसे देशाचे भविष्य घडणार आहे माहित नाही. यामुळे देशी गायीचे दूध ते ही योग्यप्रकारे काढलेले व सकस असे वापरणे आवश्यक आहे. देशी गाईंची पैदास व संवर्धन होणे गरजेचे आहे. तसेच सुग्रास चारा त्या दुभत्या जनावरांना मिळाला तरच आपणास शुद्ध व सकस दूध मिळेल. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागले तरी ते आपणास फायदेशीर ठरेल. कारण दूषित दूध पिऊन दवाखान्यावर खर्च करण्यापेक्षा पौष्टिक दुधासाठी चार पैसे जास्त गेलेले कधीही चांगले.वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविताना मांस उत्पादनात ही क्रांती झालेली आहे विविध प्रकारच्या संकरित कोंबड्या व माशांच्या विविध जाती विकसित केल्या आहेत.त्यांच्या जलद वाढीसाठी अनेक रासायनिक इंजेक्शन्स दिली जातात. विविध प्रकारच्या लसी दिल्या जातात. याचा परिणाम नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.

तेव्हा नॉनव्हेज खाताना गावरान किंवा नैसर्गिक प्रकारे उपलब्ध होणारे घटक खाल्ले पाहिजेत जेणेकरून आपले शारीरिक आरोग्य चांगले राहील.तसेच भाजीपाल्याचे आहे. आपण रोज पाहतो, हिरवागार दिसणारा भाजीपाला चवीला मात्र पांचट लागतो, व त्याची टिकण्याची क्षमता ही खूप कमी असते. याचे कारण मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर हे आहे. आम्ही बाजारात असे लोक पाहतो जे जाणीवपूर्वक किड लागलेला भाजीपाला घेण्यावर जोर देतात. त्यांना विचारले असता ते सांगतात की, या भाजीपाल्यावर रासायनिक फवारणी नाही तेव्हा हा खाल्लेला बरा. मी तर म्हणतो की, बाजारात भाजीपाला घेताना खेड्यातील शेतकरी शोधा.

त्यांच्या जवळच भाजीपाला खरेदी करा तसेच जास्तीत जास्त रानभाज्या खा. यामध्ये *करटुले, काठमाठ, तांदुळजा, चिवळ, घोळ, चुका, अंबाडी, गोखरू ,तरोटा, पाथरी, चंदन बटवा ,हादग्याची फुले, शेवगा, मायाळू,करडू टेकोळे,बांबू केना, तोंडले* यासारख्या भाज्या आवर्जून खा. या नैसर्गिक वाढलेल्या विषमुक्त असतात. तसेच चवदार व आरोग्यवर्धक असतात. जेणेकरून त्या भाज्या खाण्याचा आपल्या आरोग्याला उत्तम फायदा होतो. शक्य झाल्यास जैविक व सेंद्रिय भाजीपाला खाण्यासाठी स्वतःच्या घरी परसात दोन गादी वाफे करा, त्यात कोथिंबीर,मेथी, शेपू, पालक टमाटे ,आवरा यासारख्या भाज्या घरच्याघरी पिकवा व आपले आरोग्य चांगले ठेवा. तसेच अंगणात जागा नसल्यास टेरेसवर ही तुम्ही भाजीपाल्यासाठी वाफे बनवू शकता. व यातून मिळणारा ताजा व आरोग्यवर्धक भाजीपाला खाऊ शकता. आज-काल पॅकिंग फूड खाण्यावर मोठ्या प्रमाणात जोर दिला जातो. पण ते अन्नपदार्थ टिकविण्यासाठी विविध रासायनिक घटकांचा वापर केला जातो. तसेच चवीसाठी टेस्टिंग पावडर सारखे रसायन वापरले जाते. त्याचाही मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तेव्हा पॅकिंग फूड खाणे शक्यतो टाळलेच पाहिजे.

✒️लेखक:-जगदिश सु.जाधव (प्र. मुख्याध्यापक )
जि. प. उच्च प्राथमिक शाळा, जगापुर पं. स. पुसद जि. प. यवतमाळ