धक्कादायक! बीडमध्ये १५ महिन्यात तब्बल ६५१ महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या

31

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)

बीड(दि.8ऑगस्ट):-जिल्ह्यात पुन्हा एकदा महिलांच्या गर्भ पिशव्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. केवळ १५ महिन्यात तब्बल ६५१ महिलांच्या, गर्भ पिशव्या काढण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे सरकारी हॉस्पिटलपेक्षा, खाजगी हॉस्पिटलमध्ये आकडेवारी दुप्पट असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यानी दिली आहे.यापूर्वी देखील बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर महिलांच्या गर्भपिशवी काढण्याचे प्रकरण राज्यभर गाजले होते.

तर आता पुन्हा एकदा मागील १५ महिन्यात, तब्बल ६५१ महिलांनी परवानगी घेऊन गर्भपिशव्या काढल्याची बाब समोर आली आहे. त्याचबरोबर खाजगी डॉक्टर आवश्यकता नसतानाही, गर्भपिशव्या काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे वैद्यकीय अहवालात निदर्शनास आले आहे.

आतापर्यंत बीड जिल्हा रूग्णालयात कोरोना काळात केवळ ४ शस्त्रक्रिया झाल्या आहेत. तर एकट्या बीड तालुक्यात खाजगी हॉस्पिटलमध्ये तब्बल १८९ गर्भपिशव्या काढण्यात आल्या आहेत. दरम्यान, रुग्णाची तपासणी करूनच गर्भपिशव्या काढण्यासाठी परवानगी दिली जाते. तपासणीविना त्यांना परवानगी दिली जात नाही. तर गतवर्षीपेक्षा यंदाचा आकडा कमी असल्याचा दावा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी केला आहे.