भारतीय जनतेच्या संतापाची तीव्र लाट!

27

(भारत छोडो दिन व ऑगस्ट क्रांती दिन)

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचे आंदोलन. अगोदरच्या म्हणजे १९२०-२१ आणि १९३०-३३च्या स्वातंत्र्य आंदोलनाशी तुलना करता सन १९४२चा छोडो भारत लढा हा आगळाच होता. आझाद हिंद सेनेने दिलेला लढा वगळता स्वातंत्र्यासाठी ते शेवटचेच आंदोलन होते. इतर कोणत्याही संग्रामापेक्षा अत्यंत उग्र स्वरूपाचा हा लढा होता. आधीच्या सर्व जनआंदोलनांना पुढाऱ्यांचे मार्गदर्शन दीर्घकाळ लाभले. हा लढा सर्व नेत्यांची धरपकड झाल्यानंतर जनतेने उत्स्फूर्तपणे लढविला. अर्थात अगोदरच्या दीर्घकालीन लढ्यांच्या मानाने हे आंदोलन फारच थोडा काळ म्हणजे फक्त चार-पाच महिनेच टिकून राहिले. याला अपवाद फक्त महाराष्ट्रातील प्रतिसरकार होते. हे प्रतिसरकार मात्र ३ वर्षे व्यवस्थित कार्य करीत होते व ज्या भागात ते स्थापन झाले होते त्या भागात सरकारी राज्ययंत्रणा रखडतच काम करीत होती. बाकीची आंदोलने निव्वळ स्वराज्य मिळविण्यासाठी होती. या ९ ऑगस्ट लढ्याच्या उद्देशात देशाचे अखंडत्वही अंतर्भूत होते. म्हणून या दिवसास भारत छोडो दिन किंवा ऑगस्ट क्रांती दिन म्हटले जाते.

गांधीजींनी ब्रिटिशांनी या देशातून ताबडतोब चालते व्हावे, अशी मागणी करावयास सुरुवात केली. जुलैमध्ये काँग्रेसच्या कार्यकारी मंडळाने स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकण्याचे निश्चित करणारा ठराव केला. तो ७ व ८ ऑगष्टला मुंबईस भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीसमोर मांडण्यात आला व तो मान्य झाला. त्यान्वये भारताचे राजकीय स्वातंत्र्याचे उद्दिष्ट ताबडतोब सिद्ध करण्यासाठी म.गांधीजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जनआंदोलनाची हाक दिली. आपल्या भाषणात ते म्हणाले की, आपण परकीय सत्तेचे गुलाम आहोत ही भावना मनातून काढून टाका आणि देश स्वतंत्र करू वा मरू, या भावनेने या लढ्यात सहभागी व्हा. ज्येष्ठ नेत्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सूचित केले. जर तसे झाले आणि काँग्रेस नेत्यांचे मार्गदर्शन मिळाले नाही, तरी लोकांनी आपल्या कुवतीप्रमाणे व बुद्धीप्रमाणे आंदोलन चालू ठेवावे, असा आदेश दिला. त्या रात्रीच सर्व पुढाऱ्यांना अटक झाली व लोकांत संतापाची इतकी तीव्र लाट उसळली की, ९ ऑगस्टला देशभर राजकीय आंदोलनाचा वणवा पेटला.

अनेक दिवस उत्स्फूर्तपणे हरताळ पाळण्यात आले. जागोजागी निषेध मोर्चे निघाले. अनेक ठिकाणी सरकारी कचेऱ्यांवर हल्ले झाले आणि युनियन जॅक खाली उतरवून राष्ट्रीय झेंडा त्या ठिकाणी उभारण्याचे प्रयत्न झाले. अनेक ठिकाणी दूरध्वनी, तारयंत्रे इ. दळणवळणाची साधने उद्‌ध्वस्त करण्यात आली आणि रस्ते व रेल्वेवाहतुकीत जागोजागी अडथळे निर्माण केले गेले. परंतु धरपकड, लाठीमार आणि गोळीबार यांपुढे नि:शस्त्र जनता फार काळ टिकाव धरू शकली नाही. अनेक शहरे मुक्त करण्यात आली परंतु २४ तासांतच सरकारने पुन्हा ती ताब्यात घेतली. बंगाल आणि बिहारमध्ये अनेक खेडी मुक्त केली गेली. तेथे तीन-चार महिन्यांपर्यंत सरकारी यंत्रणा बंद पडली आणि जनतेनेच कारभार हाती घेऊन चालविला. याला अपवाद फक्त महाराष्ट्रातील सांगली-सातारा विभाग होता. तेथे यशवंतराव चव्हाण, नाना पाटील, किसन वीर, लाडबंधू, वसंतराव पाटील यांसारख्या नव्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली व ती १९४५ पर्यंत व्यवस्थितपणे कार्य करीत होती.

या आंदोलनात यशवंतराव चव्हाणांनी कारागृहवास लवकर पत्करला परंतु इतर कित्येकजण भूमिगत होऊन आंदोलन चालवीत राहिले. ठिकठिकाणी गावठी बाँबचे कारखाने निघाले. १९४४ अखेरीस तर वाळव्याच्या नागनाथ नायकवडींनी सशस्त्र फौज उभारण्याचा मोठा प्रयत्न केला. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली. चळवळीची कारणे- क्रिपस योजनेला अपयश, राज्यकर्त्यांची कृत्ये, जपानी आक्रमणे, इंग्रजांचा विरोधाभास आणि म.गांधी यांचे वास्तव धोरण, ही होत. या छोडो भारत चळवळीला अपयश का आले? त्या अपयशाची कारणे- १) नियोजनाचा अभाव, २) सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले, ३) दडपशाही धोरण, ४) राष्ट्रसभेच्या नेत्यांना कैद आणि ५) इतर कारणे अशी सांगितली जातात.या लढ्यास फक्त फॉर्वर्ड ब्लॉकने पाठिंबा दिला होता. देशातील इतर सर्व पक्ष काही ना काही कारण काढून लढ्यापासून दूर राहिले. काँग्रेस समाजवादी पक्षाचे बहुतेक नेते भूमिगत झाले आणि त्यांनी लढ्यास एकसूत्रता आणण्यासाठी मार्गदर्शन केले.

!! पुरोगामी संदेश परिवाराच्या सर्व भारतीयांना अन्यायाविरुद्ध क्रांतिमय शुभेच्छा !!

✒️ संकलन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
मराठी साहित्यिक व इतिहासाचे गाढे अभ्यासक.)
मु. पोटेगावरोड, पॉवर हाऊसच्या मागे, गडचिरोली.
पो. ता. जि. गडचिरोली.भ्रमणध्वनी- ७४१४९८३३३९.