सा.बां.अंबाजोगाई विभागांतर्गत कामकाजात गैरकार्यालयीन हस्तक्षेप बंद करून पक्षपाती, मनमानी व अनागोंदी कारभार थांबविण्यासाठी लाक्षणिक उपोषण

28

✒️नवनाथ पौळ(बीड,अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी,बीड जिल्हा)मो-8080942185

अंबाजोगाई(दि.9ऑगस्ट):-सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई कार्यालयीन कामकाजात होत असलेला गैरकार्यालयीन हस्तक्षेप बंद करून विभागांतर्गत कामकाजात पक्षपाती, मनमानी व अनागोंदी कारभार थांबविण्यासाठी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर सर्वपक्षीय एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कार्यकारी अभियंता येथील कार्यालयाचा पदभार स्विकारल्या पासून कार्यालयात नियमित हजर रहात नाही, हितसंबंधी कंत्राटदार, कर्मचारी यांना परस्पर भेटून कामे उरकतात, त्यामुळे सर्वसामान्यांना भेटणे तर दूरापस्त झाले आहे. कार्यालयीन कामसंबंधी सर्वसामान्य कंत्राटदार, सहकंत्राटदार यांची ससेहोलपट होत आहे. कार्यकारी अभियंता यांच्याशी हितसंबंधी कंत्राटदार, कर्मचारी यांना परस्पर भेटून मुबलक प्रमाणात कामे दिली जातात परंतु प्रामाणिक काम करणाऱ्या कंत्राटदार यांना कामे देण्यासंबंधी सतत टाळाटाळ व टोलवाटोलवी होत असुन हितसंबंधी ठराविक कंत्राटदार कार्यकारी अभियंता यांच्या मेहरबाणीत मजेत आहे.

तर सर्वसामान्य कंत्राटदार यांच्यावर प्रचंड अन्याय होत आहे ही बाब निंदनीय आहे असा ठपका ठेवण्यात आला आहे. आँगस्ट क्रांतीदिनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले यात सत्ताधारी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आणि बहुजन समाज पार्टी च्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

कार्यकारी अभियंता यांना देण्यात आलेल्या निवेदनात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर काँग्रेस पक्षाचे राज्य समन्वयक संजय वाघमारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बीड जिल्हाउपाध्यक्ष सुनिल जगताप, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बीड जिल्हाउपाध्यक्ष दिपक कांबळे, बहुजन समाज पार्टीचे बीड जिल्हा सचिव स.का. पाटेकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या आंदोलनाला विविध पक्षसंघटना च्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला.