सण नागपंचमी खरा : अंधश्रद्धेवर उतारा!

27

(नागपंचमी सण विशेष)

नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. तो खरेतर मानवास भूतदया अंगी बाणविण्याकरीता प्रण करण्याची आठवण दरवर्षी करून देत असतो. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. नागपंचमीला नागोबाची पूजा महिला आणि पुरुषही करतात. दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी अर्थात अहिल्या-गौतमी संगमावर स्नान करतात. महिला नागोबाला आपला भाऊ मानतात. त्याला पुजून आपल्या भावाचे संरक्षण करण्याची गळ घालतात-

“नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी| नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी|| नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा| नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा|| तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा| नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा|| नागा रे भाऊराया तुला वाहिल्या मी लाह्या| तुझ्या दर्शना आल्या शेजारी आया बाया|| नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा| आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा||”

आख्यायिका : एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली. तिने बदला घेण्याच्या उद्देशाने शेतकऱ्याच्या मुलांवर अरिष्ट आणले. मुले आजारी पडून पाठोपाठ दगावली. त्यामुळे नागदेवता प्रसन्न रहावी, तिचा कोप होऊ नये. अशी समजूत प्रचलित आहे. म्हणूनच या दिवशी शेतकरी आपले शेत नांगरत नाही. कोणीही जमीन खणत नाही. घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, केस विंचरायचे नाही. तवा वापरायचा नाही व काही कांडायचे वा कुटायचे नाही, असे काही नियम पालन करण्याची प्रथा रूढ झाली आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात. आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. नागमूर्तीची पूजा केली जाते ते ठीक आहे, परंतु जिवंत नाग पकडून त्याला दूध पाजणे चुकीचे आहे. हा शुद्ध बावळटपणा आहे. नागोबा पुजेदरम्यान नाग दिसताक्षणी त्याला यमसदनी धाडणारेही पोकळभक्त काही कमी नाहीत. संतशिरोमणी कबीर महाराज म्हणूनच अशाना अडाणी म्हणतात-

“तांबे का जब नाग बनाया पूजते यें दिन भाई! असली नाग निकल गया तो दें डण्डा लवलाई!! अनाड़ी दुनिया प्रभु जी कैसें तरियों?”

या सणाच्या अनुषंगाने सर्वच प्राणी व पक्षी यांवर मानवाची दयादृष्टी सदैव असावी, असा प्रण-शपथ घेण्याची ही वेळ आहे. त्याला आधार संपूर्ण श्रावण मास आहे. काया, वाचा व मनाने पवित्र राहून ईश्वरभक्ती कशी करावी? याची उत्तम शिकवण हा पवित्र सण व पवित्र श्रावण महिना देऊन जातो. अनंत म्हणजेच शेष, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते. मात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे वेगळेच नाग सांगितले आहेत-

“वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः। ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ॥ (पवित्र भविष्योत्तरपुराण : ३२-२-७)

सांस्कृतिक महत्त्व: भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फण्यावर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते. नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन पूजेचा मान दिला, हेही योग्यच म्हणा! विवाहीत मुलीची आठवण काढून आईबापांचे डोळे पाणावतात- “फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे| पंचमीचा सण आला डोळे माझे ओले||” या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो, अशी पद्धती भारतात रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते. गीत निर्देश देते-

“चल गं सये वारुळाला वारुळाला। नागोबाला पूजायाला पूजायाला।। ताज्या लाह्या वेचायाला वेचायाला। हळदकुंकू वाहायाला वाहायाला।। या गं या गडयिनी या गं या मैतरणी। तेल्या तांबोळीच्या बाई वान्या बामणाच्या बाई।। जमूनिया साऱ्या जनी जाऊ बाई म्हणा। चल गं सये वारुळाला वारुळाला।।”

पूर्वी नागपंचमी सणाच्या अगदी ८ ते १० दिवस आधी गल्लीतील सर्व लहानथोर स्त्रिया एकत्र येवून फेर धरत व गाणी म्हणत. त्यात झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना इत्यादी खेळ मनसोक्त खेळत असत. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मन मोकळे करीत. या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळतात. नागपंचमीच्या सणाला बहिणीला माहेरी नेण्यासाठी तिचा बंधू येत असे. माहेरी जाण्याकरिता परवानगी घेण्यासाठी तिला सासू-सासरे, दीर-नणंद, पतिराज यांची आर्जवे करावी लागत. अशावेळी ती या लोकगीतातून सासूरवाशीण सून सासूला म्हणते-

“पंचमीच्या सणाला, बंधू आल्यात नियाला। बंधू आल्यात नियाला, रजा द्या मला जायाला। सासू म्हणते, मला काय विचारतीस? विचार तुझ्या सासऱ्याला।। सासरा म्हणे, मला काय विचारतीस? विचार तुझ्या पतीला।।”

पूजेचे स्वरूप: या दिवशी नागाची पूजा करताना महिला घराची अंतर्बाह्य स्वच्छता करतात. घरातील जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते. दूध-लाह्या या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. हाच पावसाळ्यात माणसाच्या हिताचा आहार आहे. तो स्वतः मात्र घेण्याचे टाळतो. हा सण विशेषतः माणसांत जाणिव जागृती करणारा व अंधश्रद्धेवर हटकून उतारा आहे. सर्पवर्गीय प्राणी शेतकरीराजाचे शत्रू नसून मित्र आहेत. ते शेतात नासधूस करणार्‍या उंदीर-घुसींना नष्ट करतात. यातून निरुपद्रवी प्राणी व पक्षी यांवर प्रेम करावे. त्यांची नाहक हिंसा करू नये. त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे, हीच खरी पूजा होय.

!! मानवास भूतदयेची जाणिव करून देणाऱ्या नागपंचमी सणाच्या सर्वांना पुरोगामी संदेश परिवाराच्या अनंत हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
(साहित्यिक व भारतीय सण-समारंभाचे गाढे अभ्यासक.)
मु. रामनगर, श्रीगुरूदेव प्रार्थना मंदिराजवळ, गडचिरोली.
ता. जि. गडचिरोली, व्हा.नं. ९४२३७१४८८३
इमेल- Krishnadas.nirankari@gmail.com