इंटरनेटचे व्यसन ; एक घातक समस्या

30

अन्न, वस्त्र आणि निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत हे आपण सर्वांनीच शाळेत शिकलो आहोत. सध्याच्या काळात त्यात आणखी एक भर पडली आहे ती म्हणजे इंटरनेटची. विशेषतः आजची तरुण पिढी अन्न, पाण्याशिवाय जगेल पण इंटरनेट शिवाय नाही ही आजची अवस्था आहे. आजची तरुण पिढी इंटरनेटच्या इतकी आहारी गेली आहे की इंटरनेट शिवाय ते जगूच शकत नाही. कोरोना काळात तर इंटरनेट ही जीवनावश्यक गरज बनली आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाईलची स्क्रीन हेच फळा आणि पुस्तक बनले आहे. घरातल्या खोल्या शाळेचे वर्ग बनले आहेत. शिक्षणासाठी मोबाईल हे महत्वाचे साधन बनले आहे पण शिक्षणच नव्हे तर मनोरंजन, खेळ यासाठीही मुले मोबाईलचा वापर करत आहेत.

मुले तासंतास मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेले असतात. उद्याने, मैदाने बंद असल्याने पालकही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पालकांकडेही मुलांशी बोलण्यासाठी वेळ नसल्याने पालक आणि पाल्यांचा संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप ही संवादाची साधने बनली आहेत. मुले वास्तवापेक्षा आभासी दुनियेत जगात जगत आहेत. मुले डिजिटल माध्यमांचा इतका वापर करत आहेत की जणू त्यांना इंटरनेटचे व्यसन लागले आहे. सतत इंटरनेटवर असणे, त्यावरील गेम खेळणे, यु ट्यूब, वेबसिरीज, वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्स, पॉर्न साईट पाहणे, सोशल मीडियाचा अवाजवी वापर हे अनेक मुले नको त्या वयात करत आहेत. त्यावर पालकांचे कुठलेही नियंत्रण नाही. आपला मुलगा इंटरनेटवर काय पाहत आहे, कोणाशी बोलत आहे, कोणते गेम खेळत आहे हे देखील पालक पाहत नाही. त्यामुळे मुले इंटरनेटच्या महाजालात अडकत चालली आहे. पालकांनी मुलांना मोबाईल देऊ नये असे कोणीही म्हणणार नाही. आजच्या युगाशी ते सुसंगतही नाही पण पालकांनी मुलांच्या इंटरनेट वापरावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे.

कुठल्याही गोष्टीचा अतिवापर घातक असतो. इंटरनेटचा अतिवापर देखील घातकच आहे. जे मुले इंटरनेटचा वापर मोठया प्रमाणावर करतात त्यांना पुढे जाऊन नैराश्य येते असे एका सर्व्हेक्षणात सांगण्यात आले आहे. इंटरनेटच्या अतिवापरामुळे मुले आभासी दुनियेतच जास्त रमतात. इंटरनेट वापरताना एकाच जागी बसून राहिल्याने मुलांची शारीरिक हालचाल होत नाही. परिणामी स्थूलता वाढते. स्थूलता वाढल्याने अनेक आजार होतात. सतत मोबाईल समोर असल्याने डोळे दुखतात. दृष्टी कमी होते. ६ ते १८ वयोगटातील २६ टक्के मुलांना दृष्टीदोष असल्याचे नुकतेच एका पाहण्यात आढळून आले आहे.

मोबाईलमुळे मुले मैदानी खेळच विसरून गेले आहेत. मैदानावर जाऊन खेळण्याऐवजी मुले इंटरनेटवरच गेम खेळत असतात. सतत इंटरनेटवरील गेम खेळल्याने मुले हिंसक बनत आहेत. ब्ल्यू व्हेल, पब्जी यासारखे इंटरनेट गेम खेळताना काही मुलांचा जीवही गेला आहे. इंटरनेटवरील गेम खेळून काही मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इंटरनेटमुळे मुले शारीरिक आणि मानसिकरित्या पंगू बनत आहेत म्हणूनच इंटरनेट वापरावर मर्यादा घातली पाहिजे. पालकांनी याबाबत दक्ष राहिले पाहिजे.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५