मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले शासकीय योजनांचा शुभारंभ

29

🔸राज्यातील पत्रकार, बांधकाम मजुर व त्यांचे कुटूंबियांना मिळणार मोफत उपचार

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.24ऑगस्ट):- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा आपण सामना केला आहे. तिसऱ्या लाटेच्या बाबतीत सरकारकडून वारंवार शक्यता वर्तविली जात आहे. या कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिक आर्थिक अडचणींमध्ये सापडले आहेत. कोरोनावरील उपचार घेताना काही वेळा रुग्णालयात दाखल व्हावं लागतं. त्यामुळे रुग्णालयातील उपचाराचा खर्च भागवणं काही वेळा अडचणीचं ठरतं. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना तर्फे मोफत उपचार केले जाणार आहेत.

या योजनांची घोषणा आणि डायलिसिस युनिटचे उदघाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज करण्यात आले. या प्रसंगी बोलताना, सुळे यांनी शासकीय योजना राबवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, कोरोना पूर्व काळात वेगाने जगण्यात आपण माणुसकी विसरलो कोविडच्या काळात आत्मचिंतन करून खरच कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचे याची जाणीव कोविड ने करून दिली. गेली दिड वर्षे सर्व मतभेद विसरून कोणताही पक्षपात न करता डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, नागरिक तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी कोविड योद्धा म्हणून जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे. आरोग्यसेवा, औषधे आणि लसीकरण प्रत्येक गाव वाडी वस्ती पर्यंत पोहचवण्याचे कार्य अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात संपूर्ण भारतात महाराष्ट्राचा अव्वल नंबर असल्याचा निर्वाळा केरळ सरकारने दिल्याचे त्यांनी नमूद केले.

मोरया मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजितसिंह पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेविषयी बऱ्याच जणांना माहिती नसते. त्यामुळे अनेकदा आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. या योजनेद्वारे पात्र नागरिकांना मोरया मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय आरोग्य सुविधांचा लाभ घेता येणार आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी ३४ निवडक विशेष सेवा अंतर्गत ९९६ प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रिया आणि १२१ शस्त्रक्रिया पश्चात सेवांचा मोफत लाभ घेऊ शकतात. या योजनेत कोरोना वरील उपचारांचा देखील समावेश करण्यात आला आहे. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उद्देश राज्यातील जनतेला गंभीर आजारांवरील उपचारांसाठी पुर्णपणे नि:शुल्क गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधेचा लाभ विशेषज्ञ सेवांतर्गत पॅकेजेससाठी अंगीकृत रुग्णालयांमधून उपलब्ध करून देणे ही आहे. राज्यात सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेसह एकत्रितपणे राबवले जाते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष १.५० लाख रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळते.

या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय अन्न योजना, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न ) शिधापत्रिका धारक कुटुंबातील नागरिक, औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकरी कुटुंबं देखील या योजनेचे लाभार्थी आहेत. शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय अनाथ आश्रमातील मुले, शासकीय वृद्धश्रमातील जेष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांची कुटुंबे तसेच कामगार विभागाने निश्चित केलेले बांधकाम व इतर बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे हे सुद्धा योजनेचे लाभार्थी आहेत.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुरेशअण्णा गुजर, गूरूवर्य कुमार दादा, त्रंबक मोकाशी, काका चव्हाण, पुणे मनपा नगरसेविका सायली वांजळे, पुणे मनपा नगरसेवक सचिन दोडके, मेजर गजानन पाटील, डॉ. मोनाली पाटील, डॉ.सुनिल जगताप, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष अवधूत सूर्यवंशी व मेडिकल टीम उपस्थित होते.