अस्पृश्यता निवारण : वास्तव अनुभव कथन!

31

(प्रा.श्री.म.माटे जयंती विशेष)

प्रा.श्रीपाद महादेव माटे हे बहुविध स्वरूपाचे ललित आणि वैचारिक लेखक, स्वतंत्र प्रज्ञेचे शैलीकार साहित्यिक, ज्ञानोपासक, वक्ते, शिक्षक, नामवंत प्राध्यापक, अस्पृश्यता विरोधी कार्यकर्ते, कृतिशील, निष्ठावंत समाजसेवक होते. त्यांचे शिक्षण सातारा व पुणे येथे एमए.पर्यंत झाले. ते सन १९३५-४६ या कालखंडात पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात इंग्रजीचे व मराठीचे प्राध्यापक होते. ही त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी व फलद्रुप ठरली.प्रा.श्री.म.माटे यांचा जन्म दि.२ सप्टेंबर १८८६ रोजी वर्‍हाडातील शिरपूर या गावी झाला. त्यांचे वडील महादेव हे संस्कृतविद्या पंडित ‘महादेवशास्त्री’ या नावाने परिचित होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव उमाबाई होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची होती. दांपत्याच्या पाच मुलांपैकी श्री.म.माटे हे त्यांचे शेवटचे अपत्य होय. ते एक वर्षाचे असतानाच पित्याचे छत्र हरपले. त्यानंतर त्यांच्या आईने माहेरचा आश्रय घेतला खरा; पण दारिद्य्राशी झगडण्यात व हालअपेष्टा सोसण्यातच माटे भावंडांचे बालपण सरले. विटे येथील प्राथमिक शाळेत त्यांनी दुसरीत प्रवेश घेतला, तेव्हा त्यांचे मूळनाव श्रीपती बदलून ‘श्रीपाद’ झाले. सन १९११ साली ते लक्ष्मीबाईंशी विवाहबद्ध होऊन त्यांनी पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सन १९१५ साली ते इंग्लिश व मराठी विषय घेऊन एमएची परीक्षा उत्तीर्ण झाले.

सरकारी नोकरी करणार नाही, असा त्यांनी निर्धार केलेला असल्यामुळे पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते इंग्रजी विषयाचे अध्यापक झाले. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शिक्षकाचे उत्पन्न अगदीच तुटपुंजे असायचे. त्यामुळे उत्पन्न वाढावे म्हणून त्यांनी इंग्रजी विषयाच्या खासगी शिकवण्या घेणे सुरू केले. पुढे त्याचेच रूपांतर इंग्लिश क्लासमध्ये झाले. उत्पन्न वाढले खरे; पण त्याच वेळी त्यांनी हाती घेतलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कामी ते खर्ची पडू लागले. त्याच सुमारास वसंत व्याख्यान मालेच्या चिटणीस पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि तेव्हापासून त्यांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली. सन १९१७पासून त्यांच्या अस्पृश्यता-निवारणाच्या कार्याला गती मिळाली. वीस वर्षे त्यांनी अस्पृश्यांच्या सेवेत व्यतीत केली. सन १९४३ साली सांगली येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष झाले. सन १९४५ साली स.प.महाविद्यालयातून निवृत्त झाल्यावर पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते कार्याध्यक्ष म्हणून काम पाहू लागले.पुण्यातील मातंग वस्तीत रात्रीच्या शाळा स्वखर्चाने चालविण्याचे अत्यंत मोलाचे, समाजसुधारणेचे कार्य त्यांनी हाती घेतले.

ते आपल्या आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात अविरतपणे, निष्कामबुद्धीने व जिद्दीने चालविले. मांगवाड्यात पहिली शाळा, मंगळवार पेठेतील महार वस्तीत दुसरी शाळा, नारायणपेठेत नदीकाठी तिसरी शाळा अशा एकूण बावीस शाळा त्यांनी सुरू केल्या. या कार्यामागील हेतू अस्पृश्योद्धार करणे व शिक्षणाचे संस्कार करणे हा होता. श्रीपाद माटेंनी अस्पृश्य शब्दाऐवजी ‘अस्पृष्ट’ या शब्दाची योजना हेतुपूर्वक केली. या कार्यात त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांचे बहुमोल सहकार्य मिळाले. या उपेक्षित वर्गाला त्यांनी स्वच्छतेचे धडे दिले; त्यांच्या अडचणी, व्यथा सहानुभूतीने ऐकून त्यांना शक्य तेवढी मदत करण्याचा वसा त्यांनी घेतला होता. हे कार्य करीत असताना पुण्यातील कर्मठ व सनातनी वर्गाकडून त्यांना अपमान तथा मनस्ताप सोसावा लागला. महार माटे, महारडे माटे अशी बिरुदे त्यांना कुत्सितपणे बहाल करण्यात आली. मात्र या विरोधाला व सनातन्यांच्या निंदानालस्तीला न जुमानता आपल्या ध्येयावरील निष्ठा त्यांनी अबाधित ठेवली. या सामाजिक कार्याबरोबरच समाजप्रबोधनाचे इतर उपक्रमही त्यांनी हाती घेतले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षपदी असताना त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय आहे.

श्री.म.माटे यांनी आपल्या आयुष्यातील पंचेचाळीस वर्षांचा प्रदीर्घ काळ साहित्याची निर्मिती करण्यात आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासाच्या कार्यात व्यतीत केला. त्यांची वाङ्मयनिर्मिती ही त्यांच्या सामाजिक कार्याचेच एक अविभाज्य अंग आहे. त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान व त्यांनी लिहिलेले ललित वा ललितेतर वाङ्मय यांत एक अतूट अनुबंध आहे. मानवी जीवन सुंदर, समृद्ध आणि अर्थपूर्ण बनविण्याच्या ध्यासातून त्यांचे साहित्य सिद्ध झाले आहे. “ललित वाङ्मयाने मतप्रचार आणि मतपरिवर्तन होत नाही, असे म्हणणार्‍यांचा दावा चुकीचा आहे” असे त्यांचे स्पष्ट मत होते. “जे-जे समाजहिताचे वाटते, ते-ते लिहून प्रकट करायला आपण बांधील आहोत” या भूमिकेतूनच त्यांनी वाङ्मयनिर्मिती केली. आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘खरे जीवनवादी लेखक’ म्हटले ते सर्वार्थाने योग्यच आहे! विविध विषयांवरची त्यांची एकूण चाळीस पुस्तके प्रसिद्ध आहेत. विज्ञानबोधनाची प्रस्तावना ही २०० पानी प्रस्तावनाही त्यात समाविष्ट आहे. त्यांच्या साहित्य निर्मितीतील परिश्रमपूर्वक सिद्ध केलेला अत्यंत महत्त्वाचा, पण उपेक्षित राहिलेला ग्रंथ म्हणजे ‘अस्पृष्टांचा प्रश्न’ या पुस्तकातील पहिल्या साडेचारशे पृष्ठांत अस्पृश्यतेच्या समस्येची सांगोपांग तात्त्विक चर्चा त्यांनी केलेली आहे.

उरलेल्या पृष्ठांत अस्पृश्यता निवारणाच्या कार्यातील त्यांना आलेल्या अनुभवांचे वास्तव कथन आहे. भटक्या जमातींच्या समस्यांचा ऊहापोहही या ग्रंथात केलेला आहे. सर्वेक्षण, आकडेवारी, विविध प्रश्नावली व त्यांच्या उत्तरांतून मिळालेली महत्त्वाची माहिती या सर्वांच्या आधारे त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धान्त असे या ग्रंथांचे स्वरूप आहे. या ग्रंथामागील त्यांची भूमिका प्रचारकाची नसून समाजशास्त्रज्ञाची आहे. यातून त्यांच्या पांडित्याचे, तर्कनिष्ठतेचे, चिंतनशीलतेचे व सहृदयतेचे दर्शन घडते, हे निःसंशय! सारांश, महाराष्ट्राचे एक महत्त्वाचे व प्रमुख शिल्पकार म्हणून त्यांचे नाव अजरामर झाले आहे.आपल्या प्रज्ञेस सतत प्रज्वलित व स्वतंत्र ठेवून मराठी वाङ्‌मयावर एक चिरंतन मुद्रा उमटविणाऱ्या थोर ज्ञानोपासकांत श्री.म.माटे यांची गणना केली जाते. ते पुणे येथे दि.२५ डिसेंबर १९५७ रोजी निधन पावले.

!! जयंतीनिमित्त त्यांच्या अचाट बुद्धिचातुर्याला विनम्र अभिवादन !!

✒️संकलक:-कृष्णकुमार लक्ष्मी गोविंदा निकोडे(म.रा.डि.शै.दै.रयतेचा कैवारी: लेखविभाग प्रमुखव जिल्हा प्रतिनिधी तथा मराठी साहित्यिक)मु. पो. ता. जि. गडचिरोली.व्हा. नं. ७४१४९८३३३९.