राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष पत्रकार शहाबाज दिवकर यांच्यावर प्राणघातक हल्ला

35

🔹राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाकडून 3 तारखेला राज्यभर गांधीगिरी आंदोलनाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांचा इशारा

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

ठाणे(दि.1सप्टेंबर)-: राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष यांच्यावर अज्ञात गुंडांनी अचानक प्राणघातक भ्याड हल्ला केला यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहे.

सविस्तर वृत्त असे की, पत्रकार शहाबाज दिवकर हे कसारा रेल्वे स्टेशन परिसरात फोनवरती बोलत असताना त्यांच्यावर दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात गुंडांनी मागील बाजूने येऊन डोक्यात दारूची बाटली मारली. धारदार हत्याराने त्यांच्यावर वार करत असतांनाच त्यांचा वार चुकवून दिवकर यांनी तेथून पळ काढला. पळत जाऊन त्यांनी कसारा रेल्वे पोलिस स्टेशन गाठले. कसारा रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी गुन्हा दाखल करण्याची विनंती केली मात्र तेथील उपस्थित असलेले कर्मचारी यांनी उडवाउडवीची उत्तरे देत गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला. आपल्यावरती हल्ला झाला ती आमची हद्द नाही तरी आपण दुसऱ्या पोलीस स्टेशनची संपर्क साधावा अशी टोलवाटोलवी केली.

गुन्हा कुठेही घडला तरी तो दाखल करून संबधीत पोलीस ठाण्यात वर्ग करणे गरजेचे असते मात्र रेल्वे पोलिसांनी पत्रकार दिवकर यांना धुडकावून लावले याबाबत राज्यभर संताप व्यक्त होत आहे.संबधीत पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी व अज्ञात गुंडांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणी साठी शुक्रवार दिनांक 3 सप्टेंबरला राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालया समोर राज्यस्तरीय गांधीगिरी आंदोलनाचा इशारा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिला आहे.