भारतीय व्रतवैकल्य: निसर्गाशी साधर्म्य!

29

(हरतालिका व्रत विशेष)

भारतीय संस्कृती ही जगाला वेडावून सोडणारी संस्कृती आहे. येथील रितीभाती, रूढी व परंपरा या वैज्ञानिक, धार्मिक, पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींवर आधारित आहेत. भारतीय सण व उत्सव निसर्गाशी साधर्म्य सांगणारे आहेत. पाने, फळे, फुले, मुळे, डहाळी आदींचा उपयोग ईश्वरपूजेत केला जातो. म्हणूनच येथील लोक तसल्याप्रकारचे वृक्षरोपण व वृक्षसंवर्धन करीत असतात. अर्थातच निसर्गपूजा ही येथील माणसांच्या रक्तां-रक्तांतच भिनली आहे, असे म्हणे अतिशयोक्ती ठरू नये. निसर्गपुजेस प्रेरणा देणारे हरितालिका हे व्रतसुद्धा आहे, त्याची महती सांगणारा हा उद्बोधक लेख…

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिला आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि आलि म्हणजे सखी होय. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला ‘हरितालिका’ असे म्हणतात. याची कथाही भविष्य पुराणातील हर-गौरी संवादात आली आहे. ‘शिवा भूत्वा शिवां यजेत|’ या भावनेने हरितालिकेची पूजा करावी. आरती अशी म्हटली जाते-

“जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके।
आरती ओवाळीतें। ज्ञानदीपकळिके।धृ।
हरअर्धांगी वससी। जासी यज्ञा माहेरासी।
तेथें अपमान पावसी। यज्ञकुंडीं गुप्त होसी। जय..।१।”

प्रत्येक स्त्रीने हे व्रत केलेच पाहिजे अशा सक्तीचे विधान कोठेही नाही. अशिक्षितांपेक्षा शिक्षित स्त्रीवर्गात हे व्रत करण्याची चढाओढ अधिक आहे. या व्रतांविषयी त्या अनेक पुस्तके व ग्रंथाध्ययन करून-वाचून समजून घेतात. खेड्यांपेक्षा शहरात अशा व्रतांना रोचकस्वरूपात आचरणात आणले जाते. त्यात भावभक्ती कमी आणि दिखाऊपणा अधिक आढळून येतो.
हरतालिका व्रत सर्व पाप व कौटुंबिक चिंतांना दूर करणारे आहे. शास्त्रात या व्रताबाबत ‘हरित पापान सांसारिकान क्लेशाञ्च!’ अर्थात हे व्रत सर्वप्रकारचे दु:ख, क्लेश, कलह व पापांपासून मुक्ती देते, असे म्हटले आहे. शिव-पार्वतीच्या आराधनेचे हे सौभाग्य व्रत फक्त महिलांसाठी आहे. निर्जला एकादशीप्रमाणेच हरतालिका व्रताच्या दिवशीही उपवास पाळण्यात येतो. पार्वतीने भगवान शंकराशी लग्न करण्यासाठी हे व्रत केले होते. पार्वतीच्या इच्छेची पूर्तीही याच दिवशी झाली होती, असे म्हटले जाते.

म्हणून शिवपूजाही केली जाते. चालीसा पाठ-
“नित्त नेम कर प्रातः ही, पाठ करौं चालीसा।
तुम मेरी मनोकामना, पूर्ण करो जगदीशा॥”

पतीपरमेश्वर जीवीत राहून अखंड सौभाग्य रहावे यासाठी हरतालिकेचे व्रत केले जाते. भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हे व्रत करण्यात येते. ‘हर’ हे भगवान शंकराचेच नाव आहे. शंकराची आराधना करण्यात येत असल्याने या व्रतास हरतालिका म्हणून संबोधण्यात येते. ‘हरी’ हे भगवान विष्णूचे नाव आहे. हरतालिकेसंबंधी पौराणिक कथाही आहे की, पार्वतीने एकदा आपल्या सख्यांना सोबत घेऊन हे व्रत केले होते. कालांतराने हे हरतालिका व्रत म्हणून प्रसिद्ध झाले. या व्रतासाठी हरतालिका किवा हरितालिका दोन्ही शब्दांचा उपयोग करण्यात येतो. ग्रंथामध्ये हे दोन्ही शब्द आढळतात. चौपाईत म्हटले आहे-

“जन्म जन्म के पाप नासावे। अन्त धाम शिवपुर में पावे॥
कहैं अयोध्यादास आस तुम्हारी। जानि सकल दुःख हरहु हमारी॥”

पतीप्रती आपली प्रेमाभक्ती व इच्छित पती मिळावा यासाठी या व्रताचे पालन करण्यात येते. इच्छेनुसार पती मिळावा यासाठी मुलीही या व्रताचे पालन करतात. व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर अन्नसेवन करण्यात येते. व्रतापासून मिळणार्‍या फळाचे वर्णन ‘अवैधव्यकारा स्त्रीणा पुत्र-पौत्र प्रर्वधिनी!’ असे करण्यात आले आहे. अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधिपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आले आहे. भविष्योत्तर पुराणानुसार हरतालिका व्रताच्या दिवशी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेस हस्तगौरी, हरिकाली व कोटेश्वरी व्रताचेही पालन करण्यात येते. दुसर्‍या शब्दात सांगायचे झाल्यास हरतालिका व्रत या नावानेही प्रसिद्ध आहे. यामध्ये आदी शक्तीमाता पार्वतीचे गौरीच्या रूपात पूजन करण्यात येते. भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशीच हस्तगौरी व्रताचे अनुष्ठान होते. महाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होते, याचा संदर्भ आढळतो. भगवान श्रीकृष्णाने राज्य प्राप्ती व धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले होते. यामध्ये तेरा वर्षांपर्यंत शिव-पार्वती व श्रीगणेशाचे ध्यान करण्यात येते. चौदाव्या वर्षी व्रताचे उद्यापन करण्यात येते. चालीसा पाठ-

“मगसर छठि हेमन्त ॠतु, संवत चौसठ जान।
अस्तुति चालीसा शिवहि, पूर्ण कीन कल्याण॥”

हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला सुलक्षणा पती मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. गुजराथमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तामिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित आणि विधवा स्त्रिया हे व्रत करतात. उत्तर भारतातीलही महिला हे व्रत करतात. तसेच काशी प्रांतातही हे व्रत केले जाते. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग किनारपट्टी व गोवा राज्यातही हे व्रत केले जाते. हरितालिका आरती-

“लीला दाखविसी दृष्टी। हें व्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हां वरिसी धूर्जटी। मज रक्षावें संकटीं।। जय…।४।”

पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली होती. नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत आखला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला, “तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन!” इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली. शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन तिने शिवलिंगाची पूजा आरंभली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. तिने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देवून पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. अशी आख्यायिका आहे.

शिवपार्वती किंवा उमा-महेश्वर हे जगताचे माता-पिता म्हणून ओळखले जातात. स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो. आदिशक्तीच्या पूजनातून शक्तीचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करण्यात येते.

“मैया जी की आरती, भक्ति भाव से जो नर गाता!
नित्य सुखी रह करके, सुख संपत्ति पाता!!
जय पार्वती माता…”

वाळूची शिवपिंडी तयार करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवपिंडीसहित मूर्ती आणतात. तशी त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे. संकल्प, सोळा उपचार पूजन, सौभाग्य लेणी अर्पण, नैवेद्य, आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते. व्रतराज या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते. दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात. समस्त मानवजातीने ईश्वरभक्ती केली पाहिजे. त्याविषयीची तळमळ व तातडी जागृत होत राहावी, हाच या व्रतांमागील हेतू आहे… ॐ नमः शिवाय!

!! या निमित्ताने पुरोगामी संदेश परिवारातर्फे सर्व बंधुभगिनींना भक्तिमय हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री एन. कृष्णकुमार जी. गुरुजी.
(हिंदू सण समारंभांचे गाढे अभ्यासक व मराठी साहित्यिक.)मु. पो. ता. जि. गडचिरोली.फक्त व्हा. नं. ७४१४९८३३३९.