शिक्षक – एक समाज घडविणारा कलावंत !

शिक्षकाला राष्ट्र निर्माणकर्ता म्हणतात. शिक्षकांची जबाबदारी ही आहे की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविणे आणि समाजाचे सभ्य नागरिक निर्माण करून एक मजबूत समाज आणि राष्ट्र निर्माण करणे. देशाचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ राधाकृष्णन व्यवसायाने शिक्षक होते आणि त्यांचा असा विश्वास होता की, बलवान राष्ट्र घडविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका शिक्षक बजावतो. आपल्या देशात शिक्षण क्षेत्रात बरीच थोर व्यक्तिमत्वे होऊन गेली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन लोकांच्या कल्याणासाठी, विकासासाठी वाहिले आणि देशाचे नाव जगभरात गाजवले. आपल्या समाजात शिक्षकांबद्दलचे आजचे विचार आपण पाहतो तेव्हा दोन विचारप्रवाह आढळतात.

एक शिक्षकांना मानाचे स्थान देणारा ,त्यांना आदर्श मानणारा आणि दुसरा शिक्षकांबद्दल नकारात्मक दृष्टीने पाहणारा. वास्तविक शिक्षक हा आपल्या कामात नेहमीच प्रामाणिक असणाराच असतो परंतु समाजात शिक्षकांची नकारात्मक प्रतिमा निर्माण होण्यास जेवढे शिक्षकांना जबाबदार ठरविण्यात येते त्याहीपेक्षा जास्त कारणीभूत शासकीय धोरणे आणि समाजव्यवस्था आहे.शिक्षक हा कसा असावा , शि म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील आणि क म्हणजे – कर्तव्यदक्ष असावा. शिक्षकाने मनापासून अध्यापन करावे. स्वत:चे विषयात पारंगतता प्राप्त करून घ्यावी. अध्यापन कला अवगत करून घ्यावी.शिक्षकाने आपले ज्ञान अदययावत करावे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. पूर्वी शिक्षकांचे विद्यादानाचे कार्य पवित्र समजल्या जायचे माञ आज वाढती स्पर्धा , शिक्षणाचे होणारे व्यावसायिकरण , खासगीकरण यासारख्या कारणांमुळे शिक्षकांच्या विद्यादानाच्या कार्यात निश्चितपणे खंड पडत चालला आहे.

आज शिक्षकांच्या मुळ कार्यात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत.शिक्षकांनी मुलांना शिकवायचे सोडून अशैक्षणिक कामांच्या नोंदी करणे , राजकीय नेत्यांचे वाढते अनावश्यक हस्तक्षेप ,भ्रष्टाचार , सरकारी अधिकारी वर्गांची वाढती लुडबुड, वशीलेबाजी, शैक्षणिक कामाच्या नावाने वाटेल ते कामे शिक्षकांना सोपवने आणि विनातक्रार शिक्षकांनी ते कामे करणे यामुळे समाजाचे शिक्षकाकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलत असल्याचे जाणवते त्यातच एखाद्या गैरवर्तनी शिक्षकाच्या कार्याचा परिणाम संपूर्ण शिक्षकांना भोगावा लागतो.
परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.या नियमानुसार समाज जीवनात सातत्याने बदल होत असतात. असेच कितीतरी बदल होत असतांनाच ज्याने स्वतामध्ये परिवर्तन घडवून स्वताचे मानाचे स्थान माञ किंचीतही ढासळू दिलेले नाही , अश्याप्रकारचे समाजात असलेले मानाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिक्षक .प्राचीन भारतातील वैदिक कालखंड , बौध्द कालखंड , मध्ययुगीन कालखंड नंतरच्या वसाहतकालीन भारतात त्यानंतरच्या आजच्या आधुनिक भारतात शिक्षकांना समाजात आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले जाते. शिक्षकांनेही काळानुरूप स्वतामध्ये बदल करून आपले मानाचे स्थान कायम टिकवून ठेवले आहे.

शालेय जीवनात विद्यार्थीरुपी मातीच्या गोळ्याला आकार देण्याचे काम शिक्षक करीत असतो,नंतर त्याचे पक्के भांडे बनवून त्याला समाजात वावरण्याचे संस्काराचे बालकडू पाजतो आणि समाजात एक आदर्श नागरिक म्हणून जडण घडण करण्याचे काम शिक्षक करीत असतो.म्हणून शिक्षक हा समाज घडविणारा कलावंत आहे, शिक्षक हा देशाचे भविष्यच घडवित असतो. सभोवतालच्या वातावरणात होणाऱ्या बदलांची सूक्ष्म माहीती सर्वात प्रथम शिक्षकच जाणतो आणि स्वतामध्ये बदल करून सातत्याने नवनवीन कौशल्य आत्मसात करून देश घडविण्याचा पाया रचत असतो.म्हणून शिक्षक म्हणजे देशाची पायाभरणी करणारा अभियंता असतो.वेदकाळापासून गायली जाणारी शिक्षकाची महती आजतागायत कायम आहे. परंतु आजच्या आधुनिक काळात शिक्षकांच्या जबाबदारी मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत.आधुनिक ज्ञानकेंद्री समाज व्यवस्थेमध्ये पूर्वीपेक्षा शिक्षकाचे कार्य वाढलेले दिसून येते. कारण ज्ञानाचे प्रस्फोट व ज्ञानाची वाढती गरज यामुळे प्रत्येक क्षणी चांगल्या मार्गदर्शकाची मागणी वाढत आहे. ज्यांच्याजवळ ज्ञान, कौशल्य, क्षमता व मार्गदर्शनासाठी आवश्यक योग्यता आहेत अशांना बाहेरील देशातसुद्धा शिक्षक म्हणून खूप मागणी वाढत आहे.

सद्यस्थितीत समताधिष्ठित, गरजाधिष्ठित शिक्षक शिक्षणाच्या निर्मितीला फार महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यामुळेच शिक्षकांना काळानूरूप अद्ययावत ठेवण्यासाठी शासनाने शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. शिक्षकालाही प्रशिक्षित करणे आवश्यक ठरते तेव्हाच अष्टपैलू शिक्षक निर्माण होऊ शकतात. शिक्षकांना प्रशिक्षित करतांना वेगवेगळ्या अध्यापनशास्त्रीय तात्वीक, मानसशास्त्रीय व समाजशास्त्रीय अधिष्ठान, अध्यापन अध्यापनासाठी नवनवीन पद्धती, तंत्रे, कौशल्य, संस्कार या सर्वांचा समावेश प्रशिक्षणात करावा. शिक्षकांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाशिवाय कोणतेही उपक्रम यशस्वी होऊ शकत नाहीत.समाज विकासासाठी शिक्षकाची गुणवत्ता आणि शिक्षणात गतिशीलता असणे अत्यंत महत्वाची आहे.
आजच्या भौतिवादी संस्कृतीमध्ये शिक्षकाचे कार्य केवळ ज्ञानदाना पूरतेच उरलेले नाहीतर ज्ञानदानासोबत मूल्यसंस्कार आणि जीवन कौशल्य विद्यार्थ्यांच्या अंगी रुजवावे लागतील म्हणजे पूर्वीपेक्षा आज समाजामध्ये शिक्षकाची भूमिका महत्त्वाची ठरते आहे. आजचा शिक्षक खऱ्या अर्थाने समाजव्यवस्थेचा पाया आहे. त्याला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कधी मिञाची , कधी मार्गदर्शकाची , तर कधी कुंभाराची, तर कधी समाजाची भूमिका स्वीकारावी लागणार आहे. वर्गामध्ये केवळ ज्ञान देऊन चालणार नाही तर ज्ञानाची निर्मिती, संवर्धन संरक्षण व संक्रमणाचे करावे लागणार आहे, त्यामुळे या सर्व कार्यासाठी शिक्षकांना जर स्वयंपूर्ण बनवाचये असेल तर त्यांना क्षमताधिष्ठित शिक्षणाशिवाय पर्याय नाही.शिक्षक हा समाजाचा घटक असला तरी त्याला समाजविकासाचे नेतृत्व करावे लागते. विद्यार्थी हे देशाचे भावी नागरिक असतात त्यामुळे तात्कालीन परिस्थितीतुन भविष्याचा योग्य वेध घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे लागते. विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान, कौशल्य संस्कार देण्यासाठी शिक्षक परिपूर्ण असणे आवश्यक ठरते. हे सर्व विचार शिक्षकाच्या भुमिकेला साजेसे वाटतात.

माञ आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात समाजातील मानवी मूल्ये पायदळी तुडवले जात असतांना शिक्षकाचे स्थान माञ आजही आदर्श आहे हे केवळ शिक्षकांच्या कर्तृत्वामुळे आणि त्यांच्या प्रामाणिकतेमुळे.समाजशील शिक्षक स्वत:साठी कधीच जगत नाहीत तर समाजाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी धडपडत असतात चांगले शिक्षण कोणालाही बदलू शकते, परंतु एक चांगला शिक्षक सर्वकाही बदलू शकतो. ते आयुष्यभर ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम करतात. या आधुनिकीकरणाच्या, खासगीकृरणाच्या युगात ‘शिक्षक दिनी’ अशा प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ, शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या शिक्षकांना सन्मानित करण्यासाठी समाजाने नक्कीच पुढाकार घ्यायला हवा. शिक्षक हे सुद्धा इतरांच्या प्रमाणे मानव आहेत , त्यांनाही कुटुंब , परिवार असते त्यांच्याही वैयक्तिक गरजा, समस्या असतात. त्याकडे समाजाने आणि शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.निव्वळ शिक्षक दिनाच्या निमित्ताने एक दिवस सन्मान करण्याऐंवजी कायमचे हृदयात स्थान देणे गरजेचे आहे हाच खरा शिक्षकांचा खरा सन्मान आहे.

✒️अरविंद आर.टिकले(राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर)मो:-9623904726

महाराष्ट्र, लेख, शैक्षणिक, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED