हे विश्वाकार लंबोदर : देशाचे सकल विघ्न हर!

भारताचा विघ्नहर्ता आद्य आराध्य देवबाप्पा श्रीगणेशाचे यंदा सन २०२१मध्येही मोठ्या भक्तिभावाने स्वागत झाले. त्याच्या मूर्तींची प्रतिष्ठापना श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी वाजतगाजत मोठ्या उत्साहाने व तन्मयतेने करण्यात आली. कोव्हिड-१९ हा भस्मासुर जगात मृत्युतांडव करीत थैमान घालत असताना गणेशभक्त जीवाची पर्वा न करता त्याच्या भजन-पूजनात स्वतःला वाहून घेत आहेत. डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, ताप आदी आजारांची साथ सुरू असूनसुद्धा भक्तगण एकाग्र चित्ताने भक्तीत तल्लीन झाले आहेत. ‘सकलमती प्रकाशु’ अशी ज्याची ख्याती वर्णिले जाते. तो बुद्धिदाता गणपती, विश्वव्यापक ज्याचा आकार आहे तो लंबोदर, शिवपार्वतीचा जो लाडका नंदन, अशा अनेक बीरूदांनी आळविले जाते तोच श्रीमोरेश्वर होय. तो खरेच यंदा निर्माल्य व्यवस्थापन, परिसरासह वैयक्तिक स्वच्छता व पाणी बचत याबद्दलची सुमती भक्तमंडळींना अवश्य देत आहे. ते सर्व शासकीय नियमांच्या अधीन राहून अनंत चतुर्दशीपर्यंतच्या गणेशोत्सव व गणेश मूर्ती विसर्जन कार्यक्रमात काळजी घेणार आहेत. यास्तव श्रीकृष्णकुमार निकोडे गुरुजी यांचा हा सर्वंकष मार्गदर्शक विशेष लेख… – संपादक.

“तुझ्या शक्तीची ही पूर्णावली।
अजूनि नाही जीवभावात शिरली।
म्हणोनीच अज्ञानदशा उरली।
आम्हांपाशी।।९।।”
(राष्ट्रसंत तुकडोजीकृत पवित्र ग्रामगीता : सदधर्म मंथन पंचक : अध्याय १ला : देवदर्शन.)

अनेक गणेशभक्तांनी घरगुती गणपती मांडले. अनेक गणेश मंडळांनीही सालाबादप्रमाणे यंदाही सार्वजनिक ठिकाणी गणेश मूर्तींची स्थापना केली. त्यात काही भक्त दीड दिवसांत, काही तीन दिवसांत, काही पाच दिवसांत, काही सात दिवसांत, काही नऊ दिवसांत तर काही अकरा दिवसांत या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करू लागले आहेत. खरेच, ती समस्त भक्तमांदियाळी यावर्षी दंगेधोपे, हाणामारी, वैरविरोध, कटकारस्थान अशा काहीही उचापती करतांना आढळत नाही. वंद.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात तसे-

“गणेश, शारदा आणि सद्गुरू।
आपणचि भक्तकाम कल्पतरू।
देवदेवता, नारद, तुंबरू।
आपणचि जाहला।।४।।”
(पवित्र ग्रामगीता : सद्धर्म मंथन पंचक : अध्याय १ला : देवदर्शन.)

कारण “तुझा देवबाप्पा, माझा देवबाप्पा काही वेगळा नाही. देव देव एकच!” ही एकत्वाची भावना व बुद्धी त्यानेच सर्वांच्या मनीमानसी पेरली आणि ती फळासही आली, असेच गृहित धरावे लागत आहे. हे बुद्धिदाता गजमुखा! खरेच, तुझा उदो उदो, जय जयकार करावा तितके शब्द माझ्याकडेही उपलब्ध नाहीत. आजवर मी समोरासमोर आलेल्या मिरवणूकीत खुप खडाजंगी होऊन भक्तांनी हिंसक वळण घेतल्याचे अनेकदा बघितले, ऐकले व वर्तमान पत्रांतून वाचलेसुद्धा आहे. तसली आसुरीवृत्ती, अभद्र भावना आणि भेदबुद्धी कदापिही निर्माण होऊ नये. सर्वत्र गुण्यागोविंदाने गणेशोत्सव पार पडावे, अशी नेहमीच भक्तभाविकांना सद्बुद्धी उपजत राहो!

“वक्रतुंड महाकाय, सूर्यऽकोटी समप्रभ:।
निर्विघ्नं कुरूऽमे देवे, सर्व कार्येशु सर्वदा।।”

समर्पण भावनेने प्रत्येकच भोळाभक्त ईश्वर मूर्तीची पूजा-अर्चा करीत असतो. त्याच्या भक्तिभावनेची जराही खिल्ली उडवण्याची माझी काय औकात? देवाला भावणाऱ्या व आवडणाऱ्या वस्तू त्याच्या श्रीचरणांवर वाहण्यात येतात. तो त्या वस्तू खातघेत नाही, हे त्या भगवदभक्त शिरोमणींनाही ठाऊक असते. परंतु आपले सर्वस्व ज्याला म्हणतात ते तन-मन-धन या रूपाने ते समर्पित करीत असतात. त्यामुळे त्यांना आम्ही श्रीचरणांवर सर्वस्वाचा त्याग किंवा सर्वसंगपरित्याग केले, याचा परमानंद त्यांना मिळाल्याचे भाव त्यांच्या मुखचंद्रावर झळाळतो. असे मोठमोठे जटील शब्द अध्यात्मशास्त्रात योजलेले आहेत, ते त्यांनी कधीतरी वाचलेले किंवा ऐकलेले असतात. पण तेथेच कोठेतरी शुद्ध अंतःकरणाने, निश्चल, निर्विकार, निर्विकल्प मनाने हातही न जोडता, पूजापाठ न मांडता व पूजेची सामग्री न वाहताही परमेश्वर भक्ती साध्य करता येऊ शकते. कारण देवाच्या द्वारी घाण, कचरा, अस्वच्छता व दुर्गंधी यांना आयतीच संधी मिळते. परिणामी मानवास विविध आजारांना बळी पडावे लागते. मग काय विचारता? एवढा भक्त आणि त्याला ही असाध्य व्याधी? असा लोकांचा गैरसमज होत असतो.

म्हणून वेळीच सावधगिरी बाळगून ‘सर्वच देवाची जागा, देव जेथे तेथेच उभा’ मानून स्वच्छता ही कटाक्षाने पाळली गेलीच पाहिजे. अगरबत्ती लावली तर ती मंडपाच्या पडद्यांना स्पर्शू नये. यामुळे मंडपाला आग लागण्याच्या धोक्यापासून वाचवता येईल. बेलपत्री, दुर्वा, फूले, पुष्पमाला, पत्रावळी, शेंदूर, गुलाल, कुंकू, हळद, बुक्का, नैवेद्य, प्रसाद, आदी सर्वच पूजेतील वस्तू या वेळच्या वेळी उचलल्या जाव्यात. यांनाच आपण निर्माल्य असे म्हणतो. हे निर्माल्य नदीच्या पाण्यात शिरविणे पुण्यप्रद असल्याचे काही भोळे भक्तगण समजतात. परंतु ते खरे नाही. ते पापसंचय करणारे ठरते, म्हणून ते जमीनीत खड्डा खोदून पुरणेच योग्य असते. यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होण्यापासून वाचविले जाते. ही समज यावर्षी गणपती बाप्पाने भक्तगणांच्या घटाघटांत रुजवलेली दिसून येत आहे. हीच समज पुढेही कायम असू दे गा बाप्पा! वंद.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा तेच समजविण्याचा हा प्रयत्न-

“आपणचि मंदिर, मूर्ती, पुजारी।
आपणचि पुष्पे होऊनि पूजा करी।
आपणचि देवरुपे अंतरी।
पावे भक्ता।।३।।”
(पवित्र ग्रामगीता : सद्धर्म मंथन पंचक : अध्याय १ला : देवदर्शन.)

कोव्हिड-१९पासून स्वतःसह आपल्या प्रिय, ज्ञानी वा गुणी जणांचा बचाव करण्यासाठी आपण पूजा, आरती, ध्यान, नामजप करतांना घाई-गर्दी करता कामा नये. सावकाशपणे केले तर सर्व काही सुरळीत पार पडेलच, असे धीर-गांभीर्य पाळणे श्रेयस्कर ठरेल. विसर्जनाच्या वेळी आगावूपणाची चळवळ, वळवळ, वर्दळ, गर्दी, गडबड व घाई करण्याने कोरोनाला आमंत्रण मिळू शकते. समोरून येणाऱ्या मिरवणूकीस निमूटपणे वाट मोकळी करून दिली पाहिजे. विनाकारण अरेरावी व उसणी मिजास दाखवित अडवणूक टाळणेच बाप्पा मोरयाच्या कृपेस पात्र ठरणे होय. तलाव, नदी, नाले यांचा प्रबळ प्रवाह, खोल पात्र किंवा खोल डोह यात मूर्तीं विसर्जित करणे पूर्णतः निषिद्धच समजावे. लहान मुलाबाळांना पाण्यात उतरण्या-खेळण्यापासून रोखता आले पाहिजे. खरे पाहता विसर्जन हे कृत्रिम पाणवठ्यात केले तर अधिक लाभदायी असेल. हा पाणवठा म्हणजे वेळीच बांधले सिमेंटचे, मातीचे, टिनाचे टाके, प्लास्टिक टब आदीं सुरक्षित साधनांचा योग्य राहिल. याने विघ्नहर्ता श्रीगणेशा

अधिक प्रसन्न होऊन पावावे गा!
“लंबोदर पीतांबर फणिवरबंधना!
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना!
दास रामाचा वाट पाहे सदना!
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे,
सुरवर वंदना!! जय देव…!३!”
(सचित्र आरती संग्रह : श्री गणपतीची आरती : क्र.१.)

अशाप्रकारे केले गेलेले गणेशोत्सवाचे आयोजन व नियोजन यातून सुरक्षितता, सुव्यवस्था, सुख, शांती, भक्तिआनंद, ईशकृपा, समाधान सारे काही भरभरून मिळत आहे.. !! गणपती बाप्पा मोरया! पुढच्या वर्षी लवकर या !!

✒️लेखक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
(भारतीय अध्यात्म शास्त्राचे गाढे अभ्यासक व साहित्यकार.)मु. रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.मोबा. ७७७५०४१०८६.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED