पाकिस्तानचा भारतावर निरर्थक आरोप

25

पाकिस्तानच्या दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव ऐनवेळी पाकिस्तानचा दौरा रद्द केला. न्यूझीलंडच्या गुप्तचर यंत्रणेला न्यूझीलंडच्या खेळाडूंवर हल्ला होणार असल्याची माहिती मिळाल्यावर न्यूझीलंड सरकारने हा या दौरा ऐनवेळी रद्द केला. न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडनेही पाकिस्तानचा नियोजित दौरा रद्द केला. न्यूझीलंड सरकारने दौरा रद्द करू नये यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही प्रयत्न केले पण न्यूझीलंड सरकारने त्यांचेही ऐकले नाही. ऑस्ट्रेलियन संघही असाच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तानमध्ये खेळणे सुरक्षित नसल्यानेच आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार नाहीत हे जगजाहीर असताना पाकिस्तानने मात्र कारण नसताना या घटनेला राजकीय वळण देत भारतामुळेच न्यूझीलंडने दौरा रद्द केला असा आरोप केला आहे.

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी भारतानेच न्यूझीलंड सरकारला ईमेल करून दौरा रद्द करण्यास भाग पाडले असा हास्यास्पद आरोप केला आहे. मंत्री फवाद चौधरी यांनी केलेला आरोप आणि त्यासंदर्भात त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात तारतम्य नाही म्हणूनच मंत्री फवाद चौधरी यांच्या या आरोपाने पाकिस्तानचे चांगलेच हसे झाले आहे. पाकिस्तानमध्ये काही घडले की त्याला भारतालाच जबाबदार धरणे ही पाकिस्तानची जुनी खोड आहे. यावेळीही तेच घडले. वास्तविक मागील अठरा वर्षांपासून पाकिस्तानमध्ये कोणताही आंतरराष्ट्रीय संघ क्रिकेट खेळायला तयार नाहीत. अठरा वर्षांपूर्वी पाकिस्तान दौऱ्यावर आलेल्या श्रीलंका संघावर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात श्रीलंकेचे काही खेळाडू जखमी झाले होते. नशीब बलवत्तर होते म्हणून त्या हल्ल्यात मनुष्यहानी झाली नाही. त्या घटनेनंतर किरकोळ अपवाद सोडता पाकिस्तानमध्ये कोणीही खेळायला आले नाही. अठरा वर्षांपूर्वी पाकिस्तानात जी परिस्थिती होती ती आजही कायम आहे.

उलट आता पाकिस्तानमध्ये खेळणे जास्त धोकेदायक बनले आहे कारण पाकिस्तानच्या शेजारी असलेल्या अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आली आहे. तालिबानी हे अतिरेकीच आहेत. त्यांचे आणि पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांचे घनिष्ठ संबंध आहेत. पाकिस्तानमधील अतिरेकी संघटना तालिबान्यांना हाताशी धरून अठरा वर्षांपूर्वी झालेल्या घटनेची पुनरावृत्ती करु शकतात अशी भीती सर्वच देशाना वाटत आहे. त्या देशातील सरकारांना त्या देशातील गुप्तचर संघटनांनी तशी सूचना देखील केली असेल म्हणूनच तिथे खेळायला कोणी ते तयार होत नाहीत. असे असताना या घटनेला भारताला जबाबदार धरून पाकिस्तान स्वतःचे हसे करून घेत आहे. भारतावर निरर्थक आरोप करण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तानात खेळायला का येत नाही याचा विचार पाकिस्तान सरकारने करावा. पाकिस्तानमध्ये कोणी खेळायला तयार नाही याला भारत नाही तर पाकिस्तानच जबाबदार आहे. पाकिस्तानने पोसलेला दहशतवाद हाच त्यांच्या मुळाशी आला आहे. पाकिस्तान हीच दहशतवाद्यांची जननी आहे. पाकिस्तानने कायम दहशतवाद्यांना सहकार्य केले.

पाकीस्तानने उभा केलेला दहशतवादाचा राक्षस आज भस्मासुर बनला आहे. तो पाकिस्तान सरकरचेही ऐकायला तयार नाही तो काय करेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये खेळणे धोक्याचे आहे हे सर्व देश जाणून आहेत. आपल्या खेळाडूंची सुरक्षा धोक्यात घालणे कोणत्याही देशाला शक्य नाही म्हणूनच ते पाकिस्तानचा दौरा रद्द करत आहे. पाकिस्तानने आतातरी यातून बोध घ्यावा.

✒️लेखक:-श्याम ठाणेदार(दौंड,जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५