विज्ञान नष्ट करा,श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ करा

34

कोरोना महामारीने जगात कोणते ही उत्सव साजरे केले नाही.त्यांनी तो पैसा हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी लसीचा शोध घेण्यासाठी वापरला.परदेशात विज्ञानाच्या साहयाने वेगवेगळ्या वस्तुचा शोध लावल्या जातात.त्यावर काही वर्षे प्रयोगशाळेत प्रयोग करून संशोधन केले जातात. मग त्यातुन निष्कर्ष काढल्या जातो, मोबाईल प्रथम कोणत्या देशाने बनविला?. तेव्हा त्यांचा आकार व वजन किती होते?. त्यात दरवर्षी प्रचंड प्रगती होतांना आपण पाहतो.आता आलेले स्मार्टफोन,त्यात असलेल्या विविध डिजिटल फंक्शन त्यातील सेटिंग खूप कमी लोकांना माहीत असते,तरी ते स्मार्टफोन लोक मोठ्या संख्येने वापरतात. त्यामुळेच जगात विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे.आणि भारतात???.

गणपती उत्सव मोठ्या आनंदात उत्सवात पार पडला.त्यासाठी सर्व भक्तांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. तुमच्या श्रद्धेला न दुखवता मी हा लेख गणपती विसर्जना नंतर म्हणजे अनंत चतुर्दशी नंतर देत आहे.कोणाच्या भावना दुखवणे हा माझा उद्धेश बिलकुल नाही. पण सत्य मांडणे आणि त्यांचे शंभर टक्के समर्थन करणे हा माझा उद्धेश आहे.ते कृपया समजून घ्यावे. भारतात श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ!. का आहे. गणपती उत्सवाचे आज असेच झाले आहे.त्यांचा जन्म कसा झाला?. हे सर्वाना माहिती आहे. पण शंकर पर्वती कोणत्या राज्यात देशात राहत होते. त्या राज्यात हत्तीचे प्रमाण जास्त होते का असा प्रश्न आजच्या उच्चशिक्षित लोकांना का पडत नाही. आणि गणपती बाप्पा किती दिवस जगले?. दिड दिवस,पाच,सात दहा दिवस उत्सव साजरा करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य का आहे. सत्याचा कोणताही शोध घेण्याचा प्रयत्न न करता तो मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्सव म्हणुन सर्वत्र साजरा केल्या जातो.तो भी सर्व विज्ञानानाने शोधून काढलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तुचा परिपूर्ण वापर करून.मूर्ती बनविण्या पासून ते विसर्जन करे पर्यंत सर्वच हे माणसाच्या हातचे,डोक्याचे कला, कौशल्य,सजावट आणि कष्ट आहेत. भरपाऊसात बाप्पाचे भव्य मंडप सर्वांना दिसतात पण ते मंडप बांधणारे कुशल कामगार मोठया संख्येने असंघटित कामगार आहेत. त्याची रीतसर नोंद कुठे ही होत नाही.पण त्यांनी निर्माण केलेल्या भव्य दिव्य देखाव्यांना बाप्पाचा बौद्धिक चमत्कार म्हणून सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक व राजकिय देखावे प्रचंड खर्च करून जिद्दीने बनविले जातात.

त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.माझा खरा प्रश्न हा आहे की आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक जगात महासत्ता म्हणुन प्रवेश करीत असतांना विज्ञानाचा पूर्णपणे वापर करून श्रध्दा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ आहे.हे सिद्ध करण्याचा सार्वजनिक सरकार मान्य प्रयत्न करीत आहोत?. असे कोणालाच का वाटत नाही?. बहुसंख्य नागरिकांना आपण महामूर्ख बिनडोक आहोत असे का वाटत नाही.कोणाचीच सदविवेक बुद्धी जागृत का नसावी?.त्यामुळेच जगात विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे.आणि भारतात श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ!. असे म्हणावे लागते.प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया आणि वाहिन्यांवरील सर्वच सिरीयल गणेशोत्सव साजरा करतांना दिसतात.टाईम्स ऑफ इंडिया सारखे भांडवलदारांचे वृतपत्र ४४ पानाचा विशेष गणेशोत्सव अंक काढतो.त्यात गणपतीचे महत्व विशेष नमूद करतो.त्यात जन्म,शिक्षण, मुर्त्यु याबाबत काहीच माहिती नसते.सर्वच चमत्कार दाखविणारे लिहले जाते.

सर्वात मोठे मान्यताप्राप्त वृतपत्र असे करीत असेल तर येणाऱ्या युवापिढीने जात,धर्म संस्कार चमत्कार स्वीकारावे की विज्ञान?. शिक्षण घेऊन ही अज्ञानी राहायचे असेल तर शिक्षण कशासाठी घ्यावे. जगातील कोणतीही सत्य माहिती नेटद्वारे गुगल सर्च करून स्वीकारावी कि पारंपारिक रीतीरिवाज,सण उत्सव हा मोठा प्रश्न आजच्या स्मार्टफोन मोबाईल वापरनाऱ्या तरुणांना का पडत नाही. म्हणुन विज्ञान नष्ट करा श्रद्धा अज्ञान सर्वश्रेष्ठ करा!. ही मांगणी काही दिवसांनी झाल्या शिवाय राहणार नाही असे वाटते.पुलनामा हल्ल्यात जवान शहीद झाले. त्यांची जाहीर चौकशी करावी असे कुणालाच का वाटले नाही.सनातन साधकाकडे पोलीसांनी पकडलेला शस्र साठा देशद्रोही ठरत नाही,त्यावर होणारी पोलीस कारवाई चुकीची आहे याचे समर्थनार्थ विशिष्ट संस्था संघटना खुले आम मोर्चे आंदोलन करीत होते.

म्हणजे देश महासत्ता बनण्याच्या स्पर्धेत आहे की रामराज्य?. त्यामुळेच जगात विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे.आणि भारतात श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ!. पुरोगामी समाजवादी कम्युनिस्ट,फुलेवादी,शाहुवादी शिवाजी महाराजांना म्हणणारे तर उघड घरात गणपती बसवितात,त्याच प्रमाणे आंबेडकरवादी सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे अधिकारी लोक,कलावंत कधी बायकोच्या इच्छा खातर तर काही सोसायटीच्या लोकांना आम्ही ही काही कमी नाही हे दाखविण्या करीता गणपती मूर्ती स्थापना करतात.

आणि चॅनल मीडिया समोर बाप्पामुळेच आमचा आर्थिक सामाजिक विकास व कल्याण झाल्याचे जाहीरपणे सांगतात. त्यामुळेच जगात विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. आणि भारतात श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ!.तसे आम्ही सर्वधर्मसमभाव मानणारे आहोत असे छातीठोक पणे सांगतात. आम्ही मुर्तीपुजेच्या विरोधात असलो तरी मित्र मंडळीला कधी विरोध करीत नाही,काही चळवळीच्या व कामावरच्या मित्रांनी केवळ बायका मुलांच्या हट्टाखातर गेल्या वर्षी पांच दिवसाचा गणपती घरी आणला होता. त्यांच्या मुलांनी अगदी मनलावून चांगली सजावट केली होती. कधी नव्हे तो त्यांच्या घरात अगरबत्तीचा सुगंध घुमत होता. त्याने बाजारातून गणपतींच्या गाण्यांच्या व कथांच्या सीडी विकत आणल्या होत्या. ‘पंचांगा प्रमाणे’ सकाळी दहाच्या आत “मुर्ती प्रतिष्ठापना” करायची असल्याने त्यांनी ती नऊ वाजताच करून घेतली होती. माझा एक मित्र व्यवसायाने विमा एजंट असल्यामुळे त्यांचा असंघटीत कामगारांचा आणि प्रत्येक क्षेत्रातील माणसांशी नियमितपणे संपर्क असतोच. म्हणून त्याने मुंबई लोकल रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या आणि इतर कामातील मित्रमंडळींना गणपती निमित्ताने घरी येण्याचे आमंत्रण, निमंत्रण दिले होते.

म्हणूनच दुपारी बारा वाजल्यानंतर मित्रमंडळी येण्यास सुरुवात झाली. प्रत्येकाच्या हातात केळी, सफरचंद, संत्री, मोदक पाहून एखाद्या इस्पितळात रोग्याला भेटायला जाताना माणसं जशी जातात तसे वाटत होते. जणू काही आज खरोखरच गणपतीचा जन्म झालाय की काय?.असे आम्हाला वाटत होते.मित्र मंडळी दर्शन घेतल्यानंतर एकत्र बसून चहापान घेत होते तेव्हाच मित्रांच्या मुलाने बापाने आणलेली डीव्हीडी लावली होती. ती आम्ही सर्वजण मन लावून बघत होता. मित्रांना लागलेली समाधी पाहून आमचेही त्या गाण्याकडे लक्ष गेले. ते गाणे होते. “मळाचा गणपती पार्वतीने केला” गाण्याची मध्यवर्ती संकल्पना अशी होती की, एकदा शंकर भगवान जंगलात गेले असतात. आणि पार्वती घरी एकटीच असते. तिला अंघोळीला जायचे असते पण घराबाहेर पहारा देण्यासाठी कुणीच नसते म्हणून मग ती तिच्या अंगावरील मळ काढून त्याची मुर्ती बनविते व त्यात जीव टाकते. आणि त्या चिमुकल्यास बाहेर पहारा देण्यास सांगते. तेवढयात आपले काम आटोपून शंकर भगवान घरी येतात तेव्हा त्याना घरात प्रवेश करण्यापासून तो मुलगा म्हणजे गणपती रोखतो.

मग त्यांच्यात काही तासापूर्वी बनविलेला गणपती आणि सर्व देवाचा देव महादेव म्हणजे शंकर भगवान यांचात तुंबळ युद्ध होते आणि भगवान शंकर काही तासापूर्वी बनविलेल्या मुलाचा गणपतीचा शिरच्छेद करतो. इकडे अंघोळ उरकून पार्वती माता बाहेर येतात. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जीवाला बघून हंबरडा फोडतात. आणि माझ्या पोटच्या गोळ्याला (अंगावरचा मळ नव्हे) जिवंत करून द्या असा शंकराजवळ हट्ट करतात. मग भगवान शंकर जंगलात जाऊन एका हत्तीचे शिर कापून आणतात आणि त्या धडास बसवतात व ते धड जिवंत होते.अशी ही भारतीय सर्वश्रेष्ठ कथा आहे. त्यामुळेच जगात विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे. आणि भारतात श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ!.
गाणे संपले तरी सर्वजण शांतच होते. ताटातील फराळ तसाच होता. तेवढयात आमच्यातील पेशाने वार्ताहर असलेला एकजण मध्येच ओरडला.ह्या साल्या मिडीयावरच केस करायला पाहीजे.आज जग विज्ञान युगात जगत असताना असले अज्ञानाचे चित्रीकरण करून दाखविले जाते आणि लहान-थोर ते पाहतात. यातून कसले डोमल्याचे संस्कार होणार. तेवढयात पेशाने डॉक्टर असलेल्या मित्राने त्याचीच री ओढली. तो म्हणाला की, पहीली गोष्ट म्हणजे पार्वतीच्या अंगावर एवढा मळाचा थर झाला होता की, त्यापासून एखादी मुर्ती तयार व्हावी हे किती लज्जास्पद आहे?. साधी गणपतीची तीन फुटांची मुर्ती तयार करायची म्हंटले तरी दहा किलो माती लागेल. मग तिच्या अंगावर जमलेल्या मळाची कल्पना न केलेलीच बरी. तसेच अशा अस्वच्छतेमुळे त्वचेचे खरूज, नायटा, गजकर्ण या सारखे त्वचारोग उद्भवतात ते वेगळेच. यातून एक आई आपल्या मुलांना कसले स्वच्छतेचे धडे देणार?. तसेच माझ्या मित्राच्या वडीलांच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांच्याच रक्तगटाशी मिळता जुळता रक्तगट शोधताना आमच्या नाकीनऊ आले होते.

आणि येथे एका माणसाला हत्तीसारख्या प्राण्याचा रक्तगट कसाकाय जुळला हे समजण्या पलीकडचे आहे. तसेच शिर धडावेगळे झाल्यावर मेंदूची क्रिया बंद पडते तर मग पुन्हा जिवंत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही? (गेल्या वर्षी शाळा कॉलेजचे मुलंमुली चित्रकला स्पर्धा परीक्षा दिली असता त्यांनी यावर असेच चित्र काढले त्यांना बक्षीस भेटण्या ऐवजी जातीव्यवस्था वर्णव्यवस्था विरोधक म्हणून मर खावा लागला.) तेवढ्यात पेशाने वकील असलेला आमचा मित्र तर मर्डर..मर्डर म्हणून चक्क टेबलावरच चहाचा कप आपटू लागला. आता त्याची बारी होती. सर्वप्रथम पार्वतीवरच एका अल्पवयीन मुलाकडून रखवालदाराचे काम करून घेतल्याबद्दल बालकामगार कायद्यातंर्गत कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शंकरावर सदोष मनुष्यवधाचा एक आणि गणपतीचे जीव वाचविण्यासाठी एका निष्पाण प्राण्याचा दुसरा बळी म्हणजेच पशुवधाचा असे दुहेरी हत्याकांडाचे आरोप कायम करायला पाहिजेत अशी मांगणी केली.

प्राणीमित्र संघटनेचा सदस्य असलेल्या एका मित्राने तर या गाण्याचे चित्रीकरण करणा-या कंपनी विरोधात कोर्टात याचिकाच दाखल करणार असे ठणकावून सांगितले. आतापर्यंत सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणारा आमच्यातीलच पेशाने शिक्षक असलेला मित्र बोलू लागला. आजकाल विविध वाहीन्यांवर जे काही दाखविले जाते त्याचे जवळजवळ शंभर टक्के अनुकरण केले जाते. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास धूम स्टाईलने चो-या करणे, दरोडे टाकणे, मुलींना त्रास देणे, अपहरणाच्या घटना अशी नानाप्रकारची उदाहरणे देता येतील. आपण पुस्तकातून मुलांना प्राणीमात्रांवर दया करा असे उपदेश करतो. परंतु आपल्या मुलाचे प्राण परत आणण्यासाठी एका निष्पाप मुक्याजीवाचा बळी घेणे म्हणजे क्रुरतेचा आणि स्वार्थीपणाचा कळसच म्हणावा लागेल. उद्या एखाद्या मुलाने घरातील कुणी वयस्कर व्यक्ती दगावली आणि तिला पुन्हा जिवंत करण्यासाठी घरातीलच पाळत्या कुत्र्याचे मुंडके छाटून लावायचा सल्ला दिला तर नवल वाटायला नको. आणि जर मेलेला जीव पुन्हा जिवंत करण्याची किमया भगवान शंकराला अवगत होती तर मग त्याने गणपतीचेच मुंडके त्याला परत लावून का नाही जिवंत केले?. कारण जगात विज्ञान सर्वश्रेष्ठ आहे.आणि भारतात श्रद्धा (अज्ञान) सर्वश्रेष्ठ!.असे प्रश्न विचारता येत नाही. आमचे चहाचे कप उचलायला आलेली मित्रांची सौ.आमचे सर्वांचे संभाषण शांतपणे ऐकत होती.

आता तिनेही तिचा प्रश्न उपस्थित केला की, जर एका मातीच्या गोळ्यात जीव टाकण्याएवढे सामर्थ्य जर पार्वतीत होते तर मग तिने गणपती ऐवजी एक मजबूत दरवाजा असलेले न्हाणीघरच का नाही बनविले?. सगळा प्रश्नच सुटला असता आणि पुढील महाभारत घडलेच नसते.तिचेही बरोबरच होते. सर्वांनी आपापल्या नजरेतून या गाण्याची समिक्षा केल्यावर सगळेजण आपापल्या घरी गेले.मित्राचा मुलगा मात्र झालेल्या त्या संभाषणानंतर अगदीच गप्प झाला होता. अगदी दुस-या दिवशी विसर्जनाला जातानाही तो गप्पच होता. जणूकाही त्याचा उत्साहच मावळला होता. गणपती विसर्जन करताना मात्र तो मला लाखमोलाचे बोलला.काका आत्ता कळतयं की तुम्ही मुर्ती पुजेच्या विरोधात का होता.ते या काल्पनिक कथेचे न जाणो मराठा समाजासह मागासवर्गीय समाजाच्या किती पिढ्या या गणेशोत्सवात बळी पडले असतील.पडत राहतील. विज्ञानाच्या अफाट प्रगती वर ज्यांचा आज ही विश्वास नाही ते काल्पनिक कथा वर एवढा विश्वास ठेऊन अज्ञान श्रद्धा सर्वश्रेष्ठ ठरवीत आहेत. त्यांच्याशी जगात बरोबरी होऊच शकत नाही.

दहीहंडी,गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यांच्या कथांची जगात कोणत्याही देशात तुलना होऊच शकत नाही.आरक्षणासाठी सर्वच जाती धर्माचे लोक विशेष मराठा समाज, माळी,धनगर,वंजारी,बंजारी,बहुसंख्य मागासवर्गीय मोर्चे आंदोलने करतात.शिक्षण व त्यानंतर नोकरीत आरक्षण मांगणारे इथे मात्र सर्व प्रकारच्या वैचारिक सिद्धांत बाजूला ठेवून या उत्सवात मोठ्या संख्येने कुटुंबासह सहभागी होतात. त्यामुळेच घराघरात गल्लीबोळात बहुसंख्येने साजरे होणारे हे सण उत्सव राष्ट्रीय झाले कि बहुजनास महामूर्ख बनविण्याचा उत्सव गेल्या सत्तर वर्षात खूपच वाढला आहे. विज्ञानाच्या कसोटी हत्तीचे मुडके बालकाला किंवा माणसाला बसवून पहा.धर्म संस्कार आणि कला कौशल्याची कधीच जात नसते. पोट मात्र सर्वांनाच असते, पण ते भरण्यासाठी लाखो बहुजनांना महामूर्ख बनविणे हजारो वर्षापासून सुरु आहे. त्यामुळे आज प्रश्न पडतो आमची शिक्षणामुळे प्रगती झाली कि विज्ञानामुळे आणि राज्य व केंद्र सरकारची त्याला मान्यता असल्यामुळे विज्ञान नष्ट करून (अज्ञान) श्रद्धा सर्वश्रेष्ठ केली पाहिजे. बहुसंख्य मराठा ओबीसी मागासवर्गीय समाज सत्य स्वीकारणार नाही.आणि मानसिक गुलामी सोडणार नाही.हे सत्य मांडण्याचे प्रबोधनाचे काम संत,महापुरुष यांनी कधीच सोडले नाही.मी त्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्यांना आदर्श मानतो म्हणून मी पण हे लिहण्याचे काम दरवर्षी करीत असतो.संपादक या लेखकांच्या मताशी सहमत असतीलच असे नाही.वाचकांना सत्य परिस्थिती योग्य वेळी सांगणे हे विचारवंत साहित्यिकांचे काम असते.

कोणाला वाईट वाटेल म्हणून सत्य सांगू अथवा लिहू नये आणि कोणाला खुश ठेवण्यासाठी असत्याला सत्य म्हणून सांगावे लिहावे हे भाटाचे काम असते. विचारवंत साहित्यिकांचे नाही असे महात्मा ज्योतिबा फुले,प्रबोधनकार ठाकरे यांनी अनेक पुस्तकात ग्रंथात लिहून ठेवले आणि प्राच्यविद्या पंडित कॉम्रेड शरद पाटील अब्राम्हणी सत्यशोधक मासिकातून नेहमी लिहायचे.प्रबोधन करा परिवर्तन होईल निश्चितच होईल.

✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे, भांडूप,मुंबई(९९२०४०३८५९)

(संपादक या लेखकांच्या मताशी सहमत असतीलच असे नाही.वाचकांना सत्य परिस्थिती योग्य वेळी सांगणे हे विचारवंत साहित्यिकांचे काम असते.ते त्यांनी चोकपणे केले पाहिजे)