पहिली वेचणीचे उत्पादन पाण्यातच जाणार, मातीतून उगवलेली पिके मातीत मिसळली – लक्ष्मण माळी

37

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)

धरणगाव(दि.29सप्टेंबर):- धरणगावात पावसामुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामाच्या ऐन काढणीच्या पूर्वार्धातच धुवाधार पाऊस सुरू असल्याने वेचणीस आलेल्या कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच सततच्या पावसामुळे उभ्या कपाशीवर लाल्या व करप्याचे आक्रमण झाल्याने अपरिपक्व बोंड फुटायलाही सुरुवात झाली.

आता मात्र कापसाचे पीक काढणीला सुरुवात झाली असताना  पावसामुळे शेतकऱ्यांना बोंडाची तोडणीही शक्य होत नाही.त्यामुळे डोळ्यासमोर कापसाची बोंडं ही चिखलात गळून पडत आहेत. निसर्गाने निर्माण केलेल्या परस्थितीसमोर बळीराजा हताश झाला आहे. खरिपातील इतर पिकांना योग्य दर नाही तर कापसाची ही अवस्था झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यामुळे शेतीची कामेही करणे मुश्किल झाले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच लागवड केलेला कापूस आता वेचणीला आला आहे. पण चार दिवस विश्रांती दिलेल्या पावसाने पुनारागमन केले आहे. त्यामुले वेचणी करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. गेल्या तीन दिवसापासून पाऊस होत असल्याने वेचणीसाठी शेतामध्ये जाणेही शक्य होत नाही.

शिवाय मजुर लावून कापूस वेटणीची कामे करावी लागतात. मात्र, कामाला सुरवात केली की पावसाचे आगमन होत आहे. कामे तर रखडत आहेतच पण मजूरांवर देखील शेतकऱ्यांचा खर्चही होत आहे. सध्याच्या वातावरणामुळे एकरी दोन ते तीन क्विंटल कापसाचे नुकसान होत आहे. त्यामुळे पहिल्या वेचनीत तर शेतकऱ्यांचे नुकसान हे अटळ आहे .सगळीकडे एकाच वेळी कापूस वेचणीस सुरुवात झाल्‍याने मजुरांची टंचाई भासत असून, मजूरी देखील वाढली आहे. आज घडीला धरणगाव व परिसरातील अनेक गावांत कापूस वेचणीचे दर वाढले आहेत.   

 कापसाचा खर्च पाहता सातशे ते आठशे प्रमाणे एकरी दोन बॅग बिटी बियाणे, तीन वेळेस रासायनिक खतांचा डोस, फवारणीचा वेगळा खर्च सोबतच शेती मशागत ते निंदन, खुरपणी, डवरणी पर्यंतचा खर्च व मजुरीचे दर आणि दुसरीकडे शासनाने हमीभावात अपेक्षित वाढ न करण्याचे तंत्र वापरल्याने व खरेदीलाही वेळेवर मुहूर्त साधत नसल्याने खासगी व्यापारी शेतकऱ्यांची पिळवणूक करणार हे निश्चित असून आज रोजी कापसाला केवळ ५ हजार ते साडेपाच हजार रुपये क्विंटलचा भाव असल्याची माहिती आहे. . मात्र, भविष्यात तरी पावसाने उघडीप द्यावी अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.
                                          

  यावर्षी पावसाने उशिरा का होईना समाधानकारक सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये जास्त उत्पन्नाचे आशेने उत्साहाचे वातावरण होते. मात्र यंदा प्रथमच सततच्या पावसाने ओढे, नाले, विहिरी तुडुंब भरून ओसंडून वाहत आहे. अति पावसामुळे खरिपातील कपाशी, सोयाबीन, तूर, मूग आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी.”
*- विठोबा नामदेव माळी प्रगतशील शेतकरी धरणगाव*

दरवर्षीचा कर्जबाजारीपणा, महागडे बियाणे, रोगराई वरील कीटकनाशक फवारणी, बेभरवशाचा पाऊस आदी अडचणीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांची यंदाही सततच्या पावसाने संकटाची मालिका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.शासनाने पिकांचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी.”
*- धिरेद्रसिंग पुरभे शेतकरी जांभोरा तालुका धरणगाव*

“यंदा अति पावसामुळे शेतकऱ्यांचा हाती आलेला खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने पंचनामा, स्थळ पाहणी यासारखे कागदी घोडे न नाचवता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी.”-

*- नवल बाविस्कर युवा शेतकरी बाभळे तालुका धरणगाव*