तरूण-तरूणींना लष्करी शिक्षण!

46

(छ.प्रतापसिंह भोसले पुण्यस्मरण विशेष)

सातारा येथील मराठेशाहीचे सद्गुणी व प्रजाहितदक्ष छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना पेशवेशाहीने पदावनत कसे व का केले? याचा लेखाजोखा महाराष्ट्राचे प्रसिद्ध अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी यांनी येथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे..- संपादक.

छत्रपती प्रतापसिंह भोसले यांची आज ४ ऑक्टोबरला पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या लोकहिताच्या कार्यांचे थोडेसे हे स्मरण! सातार्‍याचे छत्रपती हे मराठ्यांच्या साम्राज्याचे खरे धनी होत. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज हे वंशपरंपरेने सातार्‍याच्या गादीवर होते. तथापि, पेशवाईचे महत्त्व वाढल्याने सातार्‍याचे छत्रपती केवळ नामधारी राहिले. दि.१८ जानेवारी १७९३ रोजी छत्रपती प्रतापसिंह भोसले महाराजांचा जन्म झाला. सातार्‍याचे छत्रपती दुसरे शाहू हे सन १८०८च्या सुमारास मृत्यू पावले. त्यानंतर प्रतापसिंह छत्रपती झाले.
सवाई माधवराव पेशवे हे गादीवर असताना नाना फडणीस मुख्य कारभारी होते. छत्रपती पहिला शाहू यांनी स्वहस्ते लिहून दिलेल्या दोन याद्यांप्रमाणे मराठी राज्याचे पुढारीपण पेशव्यांकडे आले होते. सवाई माधवरावाने छत्रपतिपदाची प्रतिष्ठा सामान्यतः राखली; परंतु दुसरे बाजीराव पेशवे हे पदावर आल्यावर त्याने हळूहळू छत्रपतिपदाचा गैरवापर व अवमान करण्यास प्रारंभ केला. अखेरीस छत्रपती प्रतापसिंहांना त्याने प्रायः साताऱ्याच्या किल्ल्यात नजरकैदेत टाकले. हे सहन न होऊन छत्रपतींचा सेनापती चतुरसिंग भोसले याने पेशव्यांविरुद्ध बंड केले. ते बंड पेशव्यांतर्फे सेनापती बापू गोखले याने मोडले. परिणामी राजे प्रतापसिंहांची नजरकैद अधिकच कडक करण्यात आली.

त्या वेळचे इंग्लिश रेसिडेंट मौंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन यांनी या परिस्थितीचा फायदा घेऊन दुसऱ्या बाजीरावाशी युद्ध सुरू केले. हे करताना त्यांनी प्रकट केले, “मी छत्रपतींना पेशव्यांच्या जाचातून सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मला पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे असून छत्रपतींची सत्ता राखावयाची आहे.” परिणामतः सन १८१८मध्ये आष्टी जिल्हा सोलापूर येथे झालेल्या शेवटच्या इंग्रज-मराठे लढाईत छ.प्रतापसिंह इंग्रजांच्या सैन्याबरोबर होते. पेशवाईच्या अस्तानंतर एल्फिन्स्टनने प्रतापसिंह यांना छत्रपतींच्या गादीवर पुन्हा नेऊन बसविले. एल्फिन्स्टनने प्रतापसिंहांशी तह करून त्यांच्या अनेक वाजवी हक्कांत काटछाट केली; तरीही साताऱ्यात नेमलेल्या ग्रँट डफसारख्या रेसिडेंटने साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहास सुशिक्षित आणि सुसंस्कृत केले. त्यांनी राज्यकारभारास उत्तजेन दिले व राज्यात शिस्त आणली. प्रतापसिंहांनी सातारा शहरात अनेक सुधारणा केल्या. शहरात नवा राजवाडा, जलमंदिर यांसारख्या काही वास्तू बांधल्या; शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून यवतेश्वर डोंगरावर तलाव खोदून खापरी नळाने गावात पाणी आणले तसेच मुलांच्या शिक्षणासाठी प्राथमिक शाळा काढली आणि तीमधून संस्कृत-मराठीबरोबर इंग्रजी भाषेच्याही अध्ययनाला उत्तेजन दिले; छापखाना काढून अनेक उपयुक्त ग्रंथ छापविले. याशिवाय मराठा तरुण-तरुणींना लष्करी शिक्षण देण्यास प्रारंभ केला. त्यांत महाराजांची कन्या गोजराबाई ही सुद्धा होती.

एल्फिन्स्टनची कारकीर्द संपल्यावर इंग्रजांचे प्रतापसिंह महाराजांविषयीचे एकूण धोरण बदलले. पुढे विविध कारणांवरून त्यांचे इंग्रजांशी खटके उडू लागले. स्वाभिमानी असलेल्या छत्रपतींना इंग्रजांची बंधने आता बोचू लागली. अखेर छत्रपतींवर इंग्रजांनी राजद्रोहाचा आरोप ठेवला. आरोप कबूल केल्यास गादीवर ठेवू अन्यथा राज्यास मुकाल, असा तिढा त्यांना टाकला. या गोष्टीस छत्रपतींनी बाणेदारपणे नकार दिला. तेव्हा त्यांना गादीवरून दूर करून त्यांची रवानगी काशी- वाराणसी येथे केली गेली. तत्कालिन गव्हर्नर जनरलपुढे त्यांनी आपली बाजू मांडली. मात्र काही उपयोग झाला नाही. तेव्हा आपला स्वामीनिष्ठ वकील रंगो बापूजी यास आपली कैफियत मांडण्यासाठी त्यांनी इंग्लंडला पाठवले. ‘‘राज्य जाईल अशी धमकी कशाला देता? मी राज्याची हाव कधीच धरली नाही.’’ असे बाणेदार उत्तर त्यांनी इंग्रजांना दिले होते.या लोकहितवादी राजाच्या कार्यक्षम प्रशासनाविषयी ग्रँट डफने गव्हर्नरकडे शिफारस केली.

तेव्हा त्यांच्या काही अधिकारांत ईस्ट इंडिया कंपनीने दि.५ एप्रिल १८२२च्या जाहीरनाम्याने वाढ केली. ग्रँट डफ हा रेसिडेंट म्हणून प्रतापसिंहाच्या दरबारी इ.स.१८१८-२२ दरम्यान होता; त्याने या काळात मराठ्यांच्या इतिहासाची साधनसामग्री जमा करून पुढे सन १८२६मध्ये ‘हिस्टरी ऑफ द मराठाज’ हा ग्रंथ लिहिला. परम प्रतापी छत्रपती हे फार काळ काही जगू शकले नाही. अखेर दुर्दैवीपणे दि.१४ ऑक्टोबर १८४७ रोजी महाराज प्रतापसिंह भोसले यांना मरण ओढवले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या काही वारसांना इंग्रजांनी गादीवर बसवले. परंतु पुढे दत्तक वारस नामंजूर करून सन १८४८च्या सुमारास साताऱ्याचे राज्य खालसा करण्यात आले.

!! अशा लोककल्याणी छत्रपतींना पुरोगामी संदेश परिवारातर्फे स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!

✒️संकलक:-अलककार’- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी(भारतीय थोर पुरुषांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक व विश्लेषक)मु. पो. ता. जि. गडचिरोली. मोबा. ७४१४९८३३३९.