एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही होणार वाढ मंत्री अॅड. अनिल परब यांची घोषणा

31

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि.29ऑक्टोबर):- परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड . अनिल परब यांनी दिवाळीच्या पार्श्वभुमीवर एसटी महामंहाडळ कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि घरभाडे भत्त्यातही वाढ करुन खुशखबर दिली आहे . अॅड . परब यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पुकारलेले बेमुदत उपोषण मागे घेतल्याचे जाहिर केले . त्यामुळे आज मध्यरात्रीपासून राज्यभरातील एसटीची वाहतूक सुरळीत सुरु होणार आहे . एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने दि . २७ ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरु केले होते.

कर्मचाऱ्यांच्या उपोषणाची दखल घेऊन परिवहन मंत्री श्री . परब यांनी आज मंत्रालयात संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक आयोजित केली होती . या बैठकीला एसटी महामंडळा उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने , वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे , कर्मचारी व औद्योगिक संबंध खात्याचे महाव्यवस्थापक माधव काळे , वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक सुहास जाधव , मुख्य कामगार अधिकारी राजेश कोनवडेकर आदी उपस्थित होते . या बैठकीत एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडणार आर्थिक भार याचा ऊहापोह करत मंत्री अॅड . परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना शासनाप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा केली . त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ करण्याचे त्यांनी जाहीर केले . मंत्री अॅड . परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने कामगारांची वार्षिक वेतनवाढ २ टक्क्यावरुन ३ टक्के करण्यात यावी करण्याची मागणी केली होती.

या वेतनवाढी संदर्भात आपण सकारात्मक असून दिवाळीनंतर याबाबत बैठक घेण्यात येईल , असे मंत्री अॅड . परब यांनी सांगितले . महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे , हनुमंत ताटे , महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे ( इंटक ) मुकेश तिगोटे , महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे हिरेन रेडकर , कास्ट्राईब रा.प. कर्मचारी संघटनेचे सुनील निरभवणे , महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे श्रीरंग बरगे , महाएसटी कामगार काँग्रेसचे ( इंटक ) दादाराव डोंगरे यांचा समावेश होता .