दिवाळी! आमची तर ‘काळी’…..!

28

काय मंडळी! जोरदार तयारी चालू आहे वाटते दिवाळीची! खरेदी तर सगळी झालीच असेल! आता काय उडवायची खरेदी अन् मजा घ्यायची जीवनाची. मस्त आहे गड्या तुमचे! दसरा गेला की दिवाळी येते, दिवाळी गेली की संक्रांत! हे आणखी पुढे सुखाचे क्षण पावलोपावली उभेच! तेही आतुर झाले असतील, कधी तुम्ही याल अन् कधी तुम्हाला बिलगावे म्हणून!

टीव्ही पहायला गेलो, तर तिथे जाहिरातीही हमाम व पिअर्स साबणाच्या, सुगंधी उटनाच्या! बातम्या असो की टीव्हीवरचे इतर शो सगळे जग दिवाळीचा आनंद लुटताना दिसते. ऍमेझॉन व फ्लिपकार्टवरही ऑफर्सचा पाऊस! हे घ्या, ते घ्या! लवकर खरेदी करा! दिवाळीची खास ऑफर म्हणून सगळी दुकाने सजली. घेणारे-देणारे सगळेच खुश. ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’, नेमके तसे!

पण खरेच असे आहे का? सर्व देशभर! ही दिवाळी सगळ्यांच्या घरी जसे टीव्हीवर व बाजारात दिसते तशीच आहे का? तशीच जर असेल तर भारत हा विकसित आणि श्रीमंत लोकांचा देश आहे म्हणून घोषित करायला काही हरकत नसावी. कारण मूलभूत गरजा भागल्यानंतर अतिरिक्त खरेदी आणि सणवार उत्सव साजरे करणे, हे एका प्रगत राष्ट्रात व श्रीमंत लोकांच्या घरातच होऊ शकते. नाही का? मग दारिद्र्यरेषेखालील म्हणून जी व्याख्या मांडली जाते, जिथे बेकारांची संख्या दरवर्षी सांख्यिकी स्वरूपात काढली जाते, मध्यमवर्गीय म्हणून काटकसरी बाणा जिकडे-तिकडे वाजवला जातो. तो खोटा म्हणायचा का? आणि खरा असेल तर निदान 70% भारतीय हे जेमतेमच म्हणायला हवेत. इतके जेमतेम की त्यांना आपल्या मूलभूत आणि काही दुय्यम गरज सोडल्या तर सणवार साजरे करायला वेळ अन् पुरेसा पैसा असणे अशक्यच म्हणावे लागेल; आणि निदान 20% भारतीय तर असे आहेत ज्यांच्या या मूलभूत गरजाही पूर्ण होत नाही. ज्यांना आपण अतिदारिद्रयी म्हणतो. (‘अंत्योदय योजनेवाले!’) मग टीव्हीवर, बाजारातल्या चकाचौंधमध्ये दिसणारा हा ‘शाइनिंग इंडिया’ नेमका कोणता म्हणायचा? जो फक्त फिरायला आला, की खर्च करून खुशी लुटायला? काही अंदाज लागतो का?

मुळात सण येतात, जातात. काहींच्या घरी म्हणले तेव्हा दिवाळी असते आणि काहींच्या घरी दिवाळीलाही तेल नसते. हो! ऐकल तर नवल वाटेल आणि जाणीव व समज असणाऱ्यांना खरे! पण ही तितकेच सत्य व विदारक आहे; जी शाइनिंग इंडियाची काळी सावलीच दर्शवते. ज्यात उजेड तर आहे, पण मागे घट्ट काळोख कैक दशके लपून बसला आहे. तो दिसतो त्यांनाच ज्यांच्या जीवनात कायम दडून बसला आहे. तो दिसतो त्यांनाच ज्यांना आपल्या उजेडाच्या खिडकीतून दुसऱ्याचा अंधार अनुभवण्याची जाणीव आहे. त्यांना हा अंधार कधीच नाही दिसणार, ज्यांची नाकपुडी फुलाच्या सुगंधाने बाजूची दुर्गंध (वैयक्तिक त्यांना दुर्गंध वाटत असेल म्हणून) विसरली. ज्यांचे पोट गोड खाऊन सुटले. त्यांना रिकामे पोट कुठे दिसणार हो! कारण त्यांच्या व त्यांच्यासारख्या अनेकांच्या हिशोबाने दुनिया अशीच सुखसोयीने समृद्ध असावी.

दिवाळीतली झगमगाट पाहताना, दिव्याखालचा अंधार पहायचा असेल तर शहराबाहेर वर्षानुवर्षे लागलेल्या राहुट्या पहा! त्याच्यापुढे अर्धनग्न अवस्थेत बसलेले चिलेपिल्ले पहा! त्यांच्या चेहऱ्यावरचा हरवलेला नूर, विस्कटलेले केस आणि भकास फेस पहा! त्याच रस्त्यावरून आपण घरी घेऊन जाणारे फटाके तिथेच नाही फुटले अन् आपले काळीज नाही फाटले तर तुमच्या मनाला एक जोराचा फटका देऊन विचारा, ते मेले की जीवंत आहे, हे एकदा जरूर तपासून पहा!

आपले लेकरं जेव्हा फटाके वाजवतात न, तेव्हा दूरून एखादा चिमुकला तो हे पाहतो. तो फटाक्यांचा आवाज ऐकतो, रोषणाई पाहतो, अंगावरचे नवे कपडे पाहतो. निदान फटाके वाजलेले पाहून थोडा तरी आनंद मिळेल आणि विझलेले पाहून हे सर्व क्षणिक आहे, हे समाधानही मिळेल. पण, गोडधौडाचा आनंद पाहून नाही मिळत हो! पाहून तोंडाला आलेले पाणी गिळावे लागणे, हे उज्ज्वल भारताची खरी शोकांतिका आहे. या रस्त्यावर भटकणाऱ्यांसाठी शासनाने कधीतरी मिठाईचा एखादा डब्बा घेऊन जाऊन त्यांच्या हातात देऊन पहावं, तुम्हाला स्मितहास्याची पोचपावती तिथेच मिळेल.

लोकांना आनंदी पाहून आनंद तेव्हाच होतो, जेव्हा आपण स्वतः आनंदी असतो. कोणावर जळण्याची ही बाबच नाही आणि इथे जळत बसायला कोणाला वेळही नाही. दुःख फक्त याचे होते, की दुसरे रंगीबेरंगी कपडे घालताना, आम्ही खुश आहोत म्हणून फटाक्यांचा बार करताना, इकडे कोणाचा तरी ठोका चुकत असतो; भाकरीचा तुकडा हातात घेतलेला सुटत असतो. याची जाणीव आणि माझ्याजवळ ते काही नाही? याची उणीव या गरिबांना नक्कीच झाल्यावाचून राहत नाही.

मी काय म्हणतो! सेल्फी काढा की नगाडा वाजवा! आपली खुशी साजरी करताना, निदान सणवारापुरते तरी या भुकेल्यांना जमलं तर सुखाचा एक घास आपल्यातला देऊन पहा. तुमची दिवाळी द्विगुणित नाही झाली तर पहा! आनंद वाटण्याने अधिक वाढतो. दुःख सोसण्याने कमी तरी होईल पण त्या दुःखाला आनंदाची किनार दिली तर कदाचित ते नष्टही होईल.

ऍमेझॉन फेस्टिवल सिझन ऑफर्स, टीव्हीतले घराचे रंग व त्यावरची रोषणाई इतकी उज्ज्वल दिवाळी साध्या जनमानसात नसते हो! ज्यांना भाकरीसाठी 365 दिवस वणवण भटकावे लागते, त्यांना सणाच्या दिवशीही काम मिळने म्हणजेच ऑफर आणि त्या दिवशी घरचे सगळे पोटभरून जेवणे हीच रोषणाई!

” फटाक्यांचा बार एका क्षणाचा

धूरही प्रदूषित मिळतो कैक रुपड्यांचा

गोड खाऊन पळावेच लागत असेल तर

एक पेढा वाटा न तहान ओली करायला

दिवाळी तुमची भरून जाईल अत्याधिक सुखाने

वंचितांना मायेच्या कवेत घेऊन पहा कधी

तुमचे मन आनंदाने अमर होईल

दिवाळीचा खरे तर हाच मेवा….”

मन आपले सुखासुखी भरवले याबद्धल माफी, आणि गोड घ्या शुभेच्छा, दिपरूपी दिवाळी!!!

✒️लेखक- अमोल चंद्रशेखर भारती(लेखक/कवी/व्याख्याते, नांदेड)मो:-8806721206