फटाकेमुक्त दिवाळी साजरी करुया!

27

आपण वर्षभर विविध सण साजरे करतो त्यात दिवाळी या सणाला विशेष महत्व आहे. दिवाळी या सणाला सणांचा राजा असेही म्हटले जाते. दिवाळी सण म्हणजे प्रकाशाचा सण, दिव्यांच्या सण. दिवाळीच्या चार दिवसांच्या कालावधीत पणत्या, मेणबत्या, नवी खरेदी, नवे कपडे, मिठाई, रांगोळी, आकाशकंदील, धार्मिक गोष्टी, कौटुंबिक संमेलन आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत फटाके उडवणे म्हणजेच दिवाळी हे समीकरणच झाले आहे. दिवाळी इतका उत्साह इतर कोणत्याच सणात नसतो. दिवाळीत मोठ्यांच्या उत्साहाला आणि लहानांच्या अतिउत्साहाला उधाण येते.पण यावर्षी दिवाळीच्या सणावर कोरोनारूपी वैश्विक महामारीची छाया असल्याने राज्य सरकारने दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे तसेच या दिवाळीत फटाके न उडवण्याचे आव्हान केले आहे.

प्रसंगी फटाके बंदीचा कठोर निर्णय घेण्याचे सूतोवाचही सरकारने केले आहे. सरकारचा हा निर्णय योग्यच आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक सामाजीक व स्वयंसेवी संस्था फटाकेमुक्त दिवाळीची संकल्पना मांडत आहेत त्याला काही जण प्रतिसादही देत आहेत पण त्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजवले जातात त्यामुळे प्रदूषण खूप वाढते. त्याचा मानवाच्याच नव्हे सर्व सजीवांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कॉपर, कँडीमीयम, लेड, गंधक, सल्फर, मॅग्नेशियम, सोडियम, झिंक, नायट्रेट आदी रसायनांपासून फटाक्यांची निर्मिती केली जाते. हे रसायन मानवी आरोग्यास घातक आहेत. फटाक्यातील कॉपरमुळे श्वसनमार्गात दाह होतो. त्यामुळे दम्याचा रोगांच्या आजारात वाढ होते. हृदयविकार आणि फुफ्फुसांचे आजार होण्याची शक्यता असते. लेड मज्जासंस्थेवर परिणाम करते, कँडीमियम मूत्रपिंडाचे नुकसान करते. सल्फर हे वनस्पतींसाठी घातक आहे.

सल्फरमुळे वनस्पतींची वाढ खुंटते. सल्फरमुळे झाडांच्या फळांवर अनिष्ट परिणाम होतो ही फळे खाण्यात आल्यास खाणाऱ्यांना विषबाधा होण्याचा धोका असतो. मोठया आवाजाच्या फटाक्यांमुळे ध्वनीप्रदूषण होते. ध्वनीप्रदूषणाचा लहान मुले, वयोवृद्ध नागरिक तसेच रुग्णांना खुप त्रास होतो. सतत चार ते पाच दिवस कानठळ्या बसणारा आवाज ऐकल्यास कायमचे बहिरेपणा येण्याची शक्यता असते. शिवाय फटाके उडवताना योग्य ती काळजी घेतली नाही तर अपघात होऊन कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता असते. यावर्षी तर फटाक्यांचा धोका जास्त आहे कारण यावर्षीच्या दिवाळीवर कोरोनाचे सावट आहे. सध्याच्या घडीला आजही कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत.

राज्यसरकारने मागील काही दिवसात केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत आतापर्यंतचे सर्व सण आपण साधेपणाने साजरे केले आहेत, त्याचप्रमाणे दिवाळी सण साजरा करणे अपेक्षित आहे. कारण परिस्थिती जरी सुधारत असली तरी कायम तशीच राहील असे नाही. दिवाळी नंतर सुरू होणाऱ्या थंडीच्या काळात कोरोनाचा विषाणू कशा पद्धतीने आपले रंग दाखवेल हे सांगता येत नाही. चीनमध्ये कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढला आहे. चीनमध्ये कोरोनाने दमदार पुनरागमन केल्याने चीनमधील अनेक भागात लॉक डाऊन करण्यात आले आहे. रशियामध्येही कोरोना वाढत आहे. आपल्याकडेही दिवाळीनंतर कोरोना परतण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली आहे. ती परिस्थिती पाहता नागरिकांनी दिवाळी आटोपशीर पद्धतीने केल्यास त्याचा भविष्यात फायदाच होऊ शकतो. ज्या काळात आपल्याकडे दिवाळी सण असतो त्याकाळात थंडीच असते. हवा मोठ्या प्रमाणत कोरडी झालेली असते,त्यात धुके आणि धूर मोठ्या प्रमाणात असते. या सर्व बाबींचा श्वसनविकार असणाऱ्या रुग्णांना त्रास होतोच. त्यामुळे कोरोना असो वा नसो, सरकारने फटाक्यांवर बंदी घातलेली असो वा नसो नागरिकांनीच फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्प करायला हवा. चला तर मग ही दिवाळी फटाकेमुक्त दिवाळी म्हणून साजरी करू या!

✒️लेखक:-श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५