सुरजागडविरोधी आंदोलनाला समर्थन हे वडेट्टीवारांचे नाटक.?

31

🔹माओवाद्यांची प्रसिद्धी पत्रकातून टीका

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.11नोव्हेंबर):-बहुचर्चित सुरजागड लोहखाणीच्या विरोधात त्या आणि जिल्ह्यातील विविध दुर्गम भागातील कार्यकर्त्यांनी, जनतेनी केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्याचा प्रकार म्हणजे मंत्री विजय वडेट्टीवार यांचे नाटक असल्याची टीका माओवाद्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.माओवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दंडकारण्य पश्चिम झोनचा प्रवक्ता श्रीनिवास याने अलीकडेच एक प्रसिद्धीपत्रक जारी करुन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

एकीकडे वडेट्टीवार हे सुरजागड लोहखाणी विरोधात आंदोलन करणाऱ्या जनतेसोबत असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगतात. मात्र २५ ऑक्टोबरला हजारो नागरिकांनी एटापल्ली येथे मोर्चा काढला, त्यानंतर २५ ते २९ ऑक्टोबरदरम्यान ठिय्या आंदोलन केले. तेव्हा वडेट्टीवार कुठे गेले होते? असा प्रश्न श्रीनिवास याने उपस्थित केला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे आंदोलनात सहभागी होता आले नाही. असे सांगणे म्हणजे एक नाटक आहे. काँग्रेस पक्ष सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन करण्याच्या बाजूने आहे. हे त्यांनी नाकारले जाणे उचीत नाही.काँग्रेसच्याच काळात सुरजागड लोहखाणीची लीज देण्यात आली. त्यानंतर भाजप-शिवसेनेने अन्य कंपन्यांना लीज दिली. हे सर्व जगजाहीर असताना वडेट्टीवार कोणाला मुर्ख बनवत आहेत? असा प्रश्न श्रीनिवास् याने उपस्थित केला आहे.

सत्ता हातात असताना वडेट्टीवार खाण बंद करण्याचे आदेश का देत नाहीत? जनतेला आंदोलन करण्याची गरज का भासली, ? अशी विचारणाही श्रीनिवासने केली आहे. एकूणच जनता विरोधात जाऊ नये म्हणून वडेट्टीवार अशी खेळी खेळत आहेत. मात्र, जनता ती चांगलेच ओळखून आहे. वडेट्टीवारांना खरोखरच जनता आणि पर्यावरणाची काळजी असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही माओवादी प्रवक्ता श्रीनिवास याने केली आहे. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांची दुपारी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सायंकाळी देतो असे सांगितले परंतु सायंकाळी त्यांनी फोन रिसीव केला नाही.त्यामुळे प्रतिक्रिया प्राप्त होऊ शकली नाही.