कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला मायेचा हात

32

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔹पाच लाख रुपयांच्या “मुदत ठेव प्रमाणपत्र व अनाथ प्रमाणपत्र” वितरण

म्हसवड(दि.17नोव्हेंबर):-कोविड -19 मुळे आई वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या भवितव्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे.सातारा जिल्ह्यातील अशा 14 अनाथ बालकांना एकरकमी पाच लाख रुपयांच्या मुदतठेव प्रमाणपत्र व अनाथ प्रमाणपत्र वितरण आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथील कार्यक्रमात करण्यात आले.करोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या 0 ते 18 वयोगटातील बालकांना “अर्थसहाय्य योजना” या योजनेंतर्गत कोविड कालावधीत कोविड संसर्गामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक (आई व वडील) हे मृत्यू पावलेले आहेत, अशा बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्याची ही योजना आहे.

या योजनेंतर्गत ही एकरकमी मुदत ठेव रक्कम संबंधित बालक व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामायिक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.बालकांविषयी दुःख व्यक्त करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले की, कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या उत्तम शिक्षणासाठी शासन म्हणून निश्चितच योग्य ती जबाबदारी घेण्यात येईल.

येणाऱ्या काळात त्यांच्या मालमत्ता हक्क बाबतीतही भविष्यात या बालकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास जिल्हाधिकारी या नात्याने या बालकांना आवश्यक ती मदत करण्यास मी नेहमीच तत्पर असेन.यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजय तावरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) धनंजय चोपडे, भरोसा सेल, साताराच्या अनिता आमंदे-मेणकर, अनाथ बालकांचे नातेवाईक, नागरिक उपस्थित होते.