शरद पवारांना का झोप लागत नाही ?

31

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस काल उत्साहात साजरा झाला. कालचा कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटनात्मक ताकद राष्ट्रवादीला उर्जा देणारी आहे. या वाढदिवस सोहळ्यांचे आणि शुभेच्छांचे आभार मानताना शरद पवार भावूक झालेले दिसले. त्यांची आभाराची पोस्ट त्यांच्या फेसबुक पेजला वाचनात आली. या आभाराच्या निवेदनात शरद पवारांनी काही अतिशय महत्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी पक्षाची उभारणी फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारावर झाली असल्याचे म्हंटले आहे. त्या आधी विदर्भातील कवी मोतीलाल राठोड यांचा आवर्जून उल्लेख करताना त्यांच्या अस्वस्थ करणा-या ‘पाथरवट’ कवितेचा उल्लेखही केला आहे. “अशा कविता ऐकल्या की अस्वस्थ होतं, झोप लागत नाही आणि असे ऐकून ज्याला झोप लागते तो खरा कार्यकर्ता नाही !’ असे म्हंटले आहे. हे मांडण्यापुर्वी, “समाजातील काही वर्गाला अजूनही सन्मानाने जगण्याची संधी आहे असे वाटत नाही. तसे नसेल तर ते दुरूस्त करण्याची आपण काळजी घेतली पाहिजे !” असं त्यांनी म्हंटले आहे. खरेतर वाढदिवसाच्या शुभेच्छा सोहळ्याचे आभार प्रदर्शन करताना त्यांनी सामाजिक विषमतेचा विषय छेडला आहे. हा विषय त्यांनी का छेडावा ? ते खरच अस्वस्थ आहेत का ? त्यांना खरेच या मुळे झोप येत नाही का ? हे प्रश्न कोड्यात टाकणारे आहेत. त्यांची ही घालमेल खरीच आहे का ? शरदरावांना या सामाजिक विषमतेच्या विषयावरून जर झोप येत नसेल, ते अस्वस्थ होत असतील तर ही बाब महाराष्ट्रासाठी खुप चांगली आहे.

शरद पवारांनी आता उरलेल्या आयुष्यात सरकारं आणण्याच्या व पाडण्याच्या भानगडीत न पडता या विषयावर काम करावे. सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी ताकद लावावी. महाराष्ट्र नेहमी त्यांच्या ऋणात राहिल. ते म्हणतात तसे आजही महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात विषमता आहेच. ग्रामिण महाराष्ट्रात, दलितांना, पारध्यासारख्या भटक्यांना, इतर मागासांना मिळणारी वागणूक नक्कीच सन्मानाची नाही. पुरोगामी महाराष्ट्रात बोकाळल्या जाणा-या जातीयवादाची गती चिंता वाटावी अशीच आहे. राज्यात आर एस एसचे पसरलेले जाळेसुध्दा तेवढेच चिंताजनक आहे. पुरोगामी चळवळीतल्या नेत्यांच्या भाषणातले फुले, शाहू, आंबेडकर जन-माणसात आजही रुजलेले नाहीत. या लोकांची नावे घेवून आयुष्यभर राजकारण करणा-या पवारांना ते जन-माणसात रूजवता आले नाहीत. महाराष्ट्रातला काही वर्ग, “आम्ही जयभीमवाले नाही तरीही आंबेडकरांना मानतो !” अशा फुशारक्या मारतो. विशेष म्हणजे अशा फुशारक्या मारणारे हे भामटे पुरोगामी असतात. राज्याच्या पुरोगामी चळवळीत कमालीचा दांभिकपणा आहे. पवारही सोईस्कर भूमिका घेत असतात. त्यांना गरज असते तेव्हा गोळवलकरवाल्यांचा पाठींबा घेतात आणि गरज वाटेल तेव्हा त्यांना पाठींबा देतातही. परवाच पुरोगामी नेते म्हणून मिरवणा-या जितेंद्र आव्हाडांनी भाजप राष्ट्रवादीची युती होवू शकते असा दम सेनेला दिला आहे. अशा दुटप्पी वागण्याने सामाजिक विषमता कशी संपणार ? राज्यात संभाजी ब्रिगडेने काम केले नसते तर फार वाईट अवस्था असती.

शरद पवारांचे कर्तृत्व आणि नेतृत्वही उत्तूंग आहे. काल त्यांच्या गौरवपर विपूल लिहीले गेले आहे. अगदी आम्हीही लिहीले आहे. काल तर त्यांच्या गौरवपर लेखनाचा रतीबच सुरू होता. खरेतर शरद पवार या कौतुकाचे हक्कदार आहेत यात शंका नाही. पण अशा मोठ्या माणसांच्या यशासोबत त्यांच्या अपयशाचीही चर्चा व्हायला हवी. शरद पवार राज्याच्या राजकारणात पॉवरफुल्ल आहेत, किंगमेकर आहेत. डावपेचात बाप आहेत, कसलेले पैलवान, वस्ताद सारं सारं आहेत. हे सगळं खर आहे. पण त्यांना राज्याच्या राजकारणात पुर्ण यश नाही मिळाले. ते का नाही मिळाले ? याचे कारण शोधले असता त्यात कुठेतर सामाजिक विषमताही आहे. पवारांच्याही काही चुका याला कारण असतील हे खर आहे पण राज्यातल्या काही वर्गाने पवारांना कनिष्ट समजून डावलले हे नाकारता येणार नाही. शरद पवार हे नेतृत्व महाराष्ट्रातील कित्येक देशमुख, सरदार, इनामदार, वतनदार आणि संस्थानिक घराण्यातील लोकांना कधीच आपले वाटले नाही. या लोकांनी त्यांना नेहमी कमी लेखले. ही वस्तुस्थिती कुणाला नाकारता येणार नाही. दस्तुरखुद्द शरद पवारांची ही अवस्था तर मोतीलाल राठोड यांनी ज्या वर्गाचे दुखणे मांडले आहे त्यांची अवस्था काय असेल ? याचा विचार न केलेला बरा. महाराष्ट्राच्या राजकारणात शाहू, फुले, आंबेडकरांचा प्रचंड उदोउदो झाला. अनेक योजनांना त्यांची नावे दिली. अनेक गावांना, नगरांना नावे दिली पण तो विचार तेवढ्याच ताकदीने राज्याच्या सामाजिक जीवनात रूजवला गेला नाही. ज्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतात त्या महाराष्ट्राचे पुरोगामीत्व आज सोवळ्याच्या खुटींला टांगले गेले नसते ? तब्बल पाच दशके राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू असूनही शरदरावांनी सामाजिक विषमतेची खंत बोलून दाखवावी हे त्यांचे स्वत:चे अपयश नाही का ? राज्यातील पुरोगामी चळवळीचे लाडके नेतृत्व म्हणजे शरद पवार. पुरोगामी चळवळीच्या कामाचा राजकीय नफाही तेच घेतात. राज्यातल्या ब्राम्हण आणि ब्राम्हणेतर राजकारणाचे लाभार्थी शरद पवारच आहेत. राज्यातली सगळी पुरोगामी चळवळ शेवटी पवारांना जावून मिळते. म्हणूनच पवारही अध्येमध्ये पुणेरी पगडी काढून भुजबळांना महात्मा फुलेंची पगडी घालत प्रतिकात्मक राजकारण खेळतात. पण ही पगडी त्यांनी कधी अजित पवारांना घातली नाही.

ती घातली असती तर त्यांचा मुलगा ख्रिश्चन पाद्र्याच्या पायावर गेला नसता. शरद पवारांनी हे प्रतिकात्मक राजकारण खेळण्यापेक्षा फुलेंचा विचार राज्यात रूजवण्यासाठी किती ताकद पणाला लावली ? हा चिंतनाचा विषय आहे. ज्या पुरोगामी चळवळीचे ते राजकीय लाभार्थी आहेत ती चळवळ रूजावी, वाढावी यासाठी ते चळवळीला किती ताकद देतात ? फुले, शाहू आणि आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राच्या तळागाळात रूजवण्यासाठी किती क्षमतेने प्रयत्न करतात ? या प्रश्नांची उत्तर त्यांनीच शोधावीत.

राज्यात गेली पाच दशके शरद पवार पॉवरफुल्ल असताना प्रतिगामी विचार का फोफावला ? कसा फोफावला ? कुणामुळे फोफावला ? राज्यातले जातीवादी राजकारण का बळकट झाले ? २०१४ ला जातीयवादी भाजपाला ताकद का दिली ? सत्तेच्या राजकारणात त्यांच्याशी कधी छुपे कधी उघड साटेलोटे का केले ? राहूल गांधीसारखे ते आर एस एस ला खुलेआम का भिडले नाहीत ? आर एस एस त्यांच्या डोळ्यादेखत राज्यात स्वत:चे जाळे पसरवत असताना त्याला आवर का घातला नाही ? याचे चिंतन त्यांनीच करावे. त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरं आणि उपायही आहेत. आता उतारवयात अस्वस्थ होवून जागत रहाण्यापेक्षा त्यांनी सरळ सरळ या

प्रश्नालाच

 

भिडायला हवे. राजकारणात त्यांना आजवर खुप सारी संधी आणि पदे मिळाली आहेत. शरद पवार हे या पदांच्यापेक्षा मोठे व्यक्तीमत्व आहे. देशाचे प्रधानमंत्री पद त्यांना नाही मिळाले पण आघाडीच्या तिघाडीत शिरून ते पद मिळवण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा महाराष्ट्रात त्यांनी सामाजिक विषमता समुळ नष्ट करण्याचे काम केले तर अवघा महाराष्ट्र त्यांना काळजात ठेवेल. हे काम करताना त्यांना सुखाने झोपही लागेल. आयुष्याच्या संध्याकाळी मनात कुठली खंत राहणार नाही, काळजात कुठली सलही उरणार नाही. राष्ट्रवादी पक्षालाही शाहू, फुले आणि आंबेडकरांचे प्रामाणिक पाईक करावे. केवळ प्रतिकात्मक राजकारण करत दांभिक भूमिका घेतल्या तर नाही लागणार झोप.