नुतन वर्षाभिनंदन….!!!

36

नवे वर्ष म्हणजे नवी आशा,नव्या आकांक्षा,नवी स्वप्न,नवे संकल्प,नव्या ओळखी,नवी भरारी मारण्याचे वर्ष.अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची इच्छा घेऊन नव्या वर्षाचा सूर्योदय होत असतो.नव्या वर्षांत आनंद वाटायचा असतो.दुःख,निराशा विसरून नव्याने सुरुवात करण्याची संधी नववर्षानिमित्ताने आपल्याला मिळत असते.या नव्या वर्षाची सुरुवात उत्तमोत्तम संदेश पाठवून आपण करू शकतो.आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्यक्ष गाठी-भेटी होत नसल्या,तरी मित्रांना,नातेवाइकांना,आप्तेष्टांना नववर्ष स्वागताचे संदेश पाठवून त्यांच्याबद्दलच्या आठवणींना नक्कीच उजाळा देऊ शकतो.चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया,जुन्या स्वप्नांना,नव्याने फुलवुया,नववर्षाभिनंदन…!!!

नवीन वर्ष सुरु होणार हे म्हटल्यावर आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला सुरुवात करतो.बदल हा निसर्गाचा नियम आहे.तो सर्वांना मान्य करावाच लागतो.याच निसर्गनियमानुसार २०२१ ला निरोप देण्याची आणि २०२२ या नवीन वर्षाचे स्वागत करण्याची वेळ आहे.आपण नवीन विचारांचे,नव-संकल्पाचे स्वागत करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो.नवीन वर्षाची चाहूल ही डिसेंबर महिना सुरु होताच सुरु होऊन जाते.नवीन वर्ष येणार म्हटल्यावर ते कसे सुरु करायचे,याची यादी बनवली जाते.जुने ते सोने असूनही येणाऱ्या नवीन वर्षात काय नवीन करायच ह्याचे नियोजन आपण करीत असतो.अर्थातच नवीन वर्ष साजरे करण्याच्या प्रत्येकाच्या आपल्या संकल्पना असतात आणि केलेले नवीन संकल्पही..!!!पाहता पाहता नवीन वर्ष सरत आले आहे तेव्हा थोडा विचार केला असता पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करण्याच्या नादात आपण आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य विसरून आपल्या जीवनरचनेत न शोभणारे कृत्य तर करत नाही ना? याचा जरा गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.नववर्षाचे स्वागत सामाजिक जान-भान जपून उत्साहपूर्ण वातावरणात केले गेले पाहिजे हे आपण थोडे फार विसरून गेलो आहोत.

आनंद हा व्यक्त व्हायलाच हवा पण त्यासाठी त्याचा आनंद कसा घ्यावा हे महत्वाचे.मोठया हॉटेल्स मध्ये जाऊन धांगडधिंगा करण्यापेक्षा फॅमिली गेट टुगेदर,फ्रेंड्स गेट टुगेदर करूनही तुम्ही तो घरीच साजरा करू शकता.ह्याच निमित्ताने अनेक नवीन विचारांची देवाण घेवाण होते.अर्थात,नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला आणि सरत्या वर्षांच्या रात्री आपोआप मने जल्लोषाच्या भावनेने भारून जातात.त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सेलिब्रेशन करणे काही चूक नाही.पण त्याचा इतरांना त्रास होणार नाही,याची काळजी घ्यायलाच हवी.सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना ‘बंधनांची ऐशीतैशी’ होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायला हवी.आजच्या तरुण पिढीला हे सगळे पटवून देणे थोडे कठीण आहे कारण,त्यांना आत्मिक समाधान काय हे सांगण्यात आपणच कमी पडलो आहोत.त्यामुळे त्यांना घराबाहेर मिळणाऱ्या कृत्रिम आनंदात ते वाहत जातात.हातात पैसा आहे तर त्याचा उपयोग ही चांगला कामासाठी व्हावा इतकच.

प्रारंभ म्हणजे सुरुवात.मागील चांगल्या-वाईट गोष्टींना बाजूला सारून नवीन होणाऱ्या सुर्योदयासोबत नवसंकल्पांचे अवलंबन करणे,आपल्यासाठी नक्की काय चांगले हे पडताळणे,सत्याची कास धरणे आणि नव्या जोमाने हे माझ्याकडून सुटणारच नाही ह्या पेक्षा खरच ह्यानी मला किती हानी होते ह्याचा विचार करणे,नवीन उत्साहाने कामाला लागणे म्हणजेच नववर्षाचे स्वागत.त्यामुळे नववर्षाच्या निमित्ताने काही चांगले करण्याचा संकल्प ही आपण केला पाहिजे.
आताच्या या प्रगतशील,आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणूस फार प्रगत झाला.पण या प्रगतीच्या नादात तो एखाद्या मशीनप्रमाणे आजूबाजूच्या परिस्थितीचा कुठलाही विचार न करता फक्त झगमगत्या क्षणिक आनंदाचा मागेच हरवून चिरडत पुढे निघाला आहे.संवेदना,माणुसकी हे शब्द त्याच्या शब्दकोशातून हरवू पाहत आहे.त्यामुळे येणाऱ्या वर्षात माणूस म्हणून जगण्याचा आणि माणुसकीच्या नात्याने आपापल्या कुवतीनुसार गरजवंतांना मदतीचा हात देण्याचा संकल्पही आपल्याला करता येईल.छोटे छोटे संकल्प आपल्याला भविष्यात मोठा फायदा करून देणारे ठरत असतात.

धावत्या जगासोबत धावत असताना जीवनरूपी प्रवासात आपल्याला विविध प्रवृत्तीचे लोक भेटतात.आपण त्यांना गुणदोषांसहीत स्वीकारत असतो.त्यामुळे आपण काही अशा गोष्टींच्या इतके आहारी जातो,की त्याचा आपल्याला मन:स्ताप तर होतोच.परंतु त्याच्या दुपटीने आपल्या कुटुंबाला होत असतो.आपण आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन अशा गोष्टींपासून पिच्छा सोडवून घेण्यासाठी निमित्ताची वाट बघत असतो.परंतु त्या निमित्तासोबत आपल्या मनावरही आपला ताबा असला पाहिजे.स्वत:साठी वेळ काढा – घरातील कामकाज व नोकरीतील टेन्शन यात ‘सॅंडविच’ होत असते.त्यामुळे व्यक्तीचा स्वत:कडे लक्ष द्यायला फारसा वेळ मिळत नाही.दिवसभरातून किमान दहा ते पंधरा मिनिटे स्वत:साठी वेळ काढून ठेवला पाहिजे.या पंधरा मिनिटात आपण एखादा छंद जोपासू शकता.व्यायाम करून फिट राहू शकता.सकारात्मक विचार करायला शिका – एखाद्या चांगल्या गोष्टीचा उलटा अर्थ काढणे,त्यामुळे विनाकारण अधिक विचार करणे व त्या गोष्टीचा उगाच बाऊ करणे,हा आपला स्वभाव बनून जातो.त्यामुळे आपल्या मनावर तसेच आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो.त्यासाठी नवीन वर्षात सशक्त व सकारात्मक विचारसरणीचा संकल्प केला पाहिजे.आपला विचार सकारात्मक असला म्हणजे भविष्यात आपले कोणीच वाईट चिंतणार नाही,हे ठामपणे ठरविले पाहिजे.अशा गोष्टी आपला आत्मविश्वास वाढवत असतात.अगदी कठिण परिस्थितीत आपल्याला सामना करण्याची हिंमत देतात.स्वत:ची कामे स्वत: करा – आपल्याला सगळ्यात जास्त त्रास स्वत:मुळेच होतो.कुठली ना कुठली वाईट सवय आपल्याला जडलेली असते.त्यात आपला आद्य शत्रू म्हणजे आळस.आपण किमान स्वत:ची तरी कामे स्वत: केली पाहिजेत.नियोजन आखून कामे उरकली पाहिजे.त्यामुळे आपल्याला कामाची शिस्त लागते.

२०२१ या सरत्या वर्षाला निरोप देताना सर्वांच्याच मनात कटू-गोड अनुभव असतील.सरत्या वर्षात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टीच्या आठवणीने मन कातर होत असेल.माणसांना ओळखण्याची परखही आपल्याला झाली असेल.आशा घेवून येणाऱ्या नववर्षाबद्दल कमालीचे कुतूहलही असेल.स्वतः ला ओळखुन जान व भान ठेवण्याचा संकल्प आपण सर्वांनी या नववर्षाच्या निमिताने करायला हवा.एकामागून एक नवीन वर्षे येतच राहतील आणि काळानुसार माणसाने बदल हा आत्मसात केलाच पाहिजे.काळ बदलून काही होत नाही तर विचार बदलले,झगमगत्या दुनियेत बरे वाईट काय हे कळेल,तेंव्हाच तुमच्यातील बदल हा खऱ्या अर्थाने ओळखला जाईल.त्यामुळे या वर्षात आपल्या आचारात आणि विचारात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करून या नवीन वर्षाला सामोरे जावू या.!नवीन वर्ष,नवा आनंद,नवीन जल्लोष,नवा तरंग,नवीन आशा,नवी दिशा,नवीन स्वप्ने,नवा संकल्प… चला तर मग करूया नवीन वर्षाचा आरंभ,नवीन स्वप्ननांचा प्रारंभ…सर्वांना नवीन वर्षाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा…!!!

✒️राजेंद्र लाड(आष्टी)मो.९४२३१७०८८५