नागभीड येथे १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या कोविद लसीकरणाला सुरुवात

34

🔹कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयात तालुकास्तरीय शुभारंभ

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभीड(दि 10जानेवारी):-केंद्र सरकारच्या निर्णयानंतर १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थी व युवकांना कोविद लसीकरणाची आज नागभीड येथे सुरुवात करण्यात आली. नागभीड येथील कर्मवीर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात कोविद लसीकरणाचा तालुकास्तरीय शुभारंभ न.प.चे नगराध्यक्ष प्रा.डॉ. उमाजी हिरे यांच्या हस्ते व जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

याप्रसंगी न.प.चे उपाध्यक्ष गणेश तर्वेकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी , नगरसेवक शिरीष वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. विनोद मडावी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कोविद लसीकरणाची माहिती देत शासनाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले व नागभीड येथे या वयोगटातील युवकांसाठी स्थानिक जि.प.शाळेजवळ नियमित लसीकरण केंद्र सुरु राहणार असल्याचे सांगितले. १५ फेब्रुवारी पर्यंत शाळा व महाविद्यालये बंद राहणार असल्याने तालुक्यातील या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचे योग्य नियोजन करुन संबंधीत शाळा व महाविद्यालय मार्फत प्रत्येकाचे लसीकरण करावे अशी सुचना याप्रसंगी संजय गजपुरे यांनी केली.

यावेळी डॉ. उमाजी हिरे व गणेश तर्वेकर यांनीही मार्गदर्शन करताना कोरोना पासुन बचाव करीत उत्तम आरोग्य ठेवण्याचा सल्ला दिला व घरी राहुन नियमित अभ्यास करण्याची सुचना केली.याठिकाणी नवेगाव पांडव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लसीकरण चमुने वैद्यकीय अधिकारी डॉ. पायल आदे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाला सुरुवात केली. या तालुकास्तरीय शुभारंभ सोहळ्याचे प्रास्ताविक कर्मवीर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास चिलबुले यांनी केले. संचालन प्रा. देवानंद प्रधान यांनी केले तर मान्यवरांचे आभार पर्यवेक्षक युवराज इडपाचे सर यांनी मानले.