धानोरे येथे सावित्रीमाई व जिजाऊ जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधन संपन्न…

33

🔸महामातांचे जीवन कार्य प्रेरणादायी !..- पी.डी.पाटील.

🔹घराघरात जिजाऊ घडल्या पाहिजेत – हेमंत माळी

✒️धरणगाव(पुरोगामी न्युज नेटवर्क)

धरणगांव(दि.11जानेवारी): – ९ जानेवारी , २०२२ रविवार रोजी धरणगाव तालुक्यातील धानोरे गावात ३ जानेवारी ते १२ जानेवारी निमित्त महिला शिक्षण दिन, बालिका दिन, महिला मुक्ती दिन याचे औचित्य साधून महामातांचा जागर करण्यात आला. या वैचारिक प्रबोधन व्याख्यानाचे प्रास्ताविक सरपंच भगवान महाजन यांनी केले.या वैचारिक प्रबोधनाच्या अध्यक्षस्थानी तालुक्यातील प्रसिध्द काँट्रॅक्टर भगवान महाजन होते.

प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सर, हेमंत माळी सर आणि शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून गायत्रीबाई भगवान महाजन, उपसरपंच अशोक पाटील, ग्रा.पं. सदस्य हरी पाटील, राजाराम महाजन, वैजयंताबाई बाविस्कर सुरेखाबाई रोकडे, मायाबाई चांभार आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व प्रमुख अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान महाजन यांनी केले. त्यांनी महापुरुषांचा विचार रुजविणे ही काळाची गरज आहे हे सांगून गावामध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेत असल्याची माहिती दिली. जि.प.शाळेचे मुख्याध्यापक रमेश गुरुजी यांनी प्रमुख वक्ते पी.डी. पाटील सर , हेमंत माळी सर, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांचा परिचय करून दिला. हेमंत माळी यांनी महामातांचे जीवन चरित्र सांगून, सर्वांनी अंधश्रद्धा व कर्मकांडापासून दूर रहा व घराघरात जिजाऊ जन्माला आल्या पाहिजेत असे प्रतिपादन केले. पी.डी. पाटील यांनी शिक्षण क्रांतीच्या प्रणेत्या सावित्रीमाई फुले यांच्या जीवन संघर्षावर प्रकाश टाकला या सोबतच राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, अहिल्याराणी होळकर, फातिमाबी शेख, त्यागमूर्ती रमाई, विरागंणा झलकारी देवी या सर्व महामातांचे चरित्र उलगडले. छत्रपती शिवरायांच्या खऱ्या गुरु माँसाहेब जिजाऊ आहेत.

शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी महिलांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम फुले दांपत्यांनी केलेले आहे. शिक्षणाने मस्तक सशक्त होतं आणि सशक्त झालेलं मस्तक कुणापुढेही नतमस्तक होत नाही असा मोलाचा संदेश दिला.सर्व उपस्थित माता भगिनी व बांधवांना विद्येची महानायिका सावित्रीमाई फुले, महापुरुषांचे व महामातांचे ग्रंथ भेट देण्यात आले. या वैचारिक प्रबोधनाचे सूत्रसंचालन जि.प.शाळेचे मुख्याध्यापक रमेश गुरुजी यांनी तर आभार भगवान महाजन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धानोरे गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रा.सदस्य, युवक मित्र व सर्व ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.