गांधींचे धर्मचिंतन

28

धर्माच्या अंगाने गांधींनी त्यांच्या संपूर्ण हयातीत “माणूस”हाच तेवढा केंद्रबिंदू मानून त्यासाठी आयुष्यभर काम केलं. तरीही गांधींच्या जीवनामध्ये धर्माला निश्चितच महत्त्वाचे स्थान होते. गांधींच्या अनेक ओळखीं पैकी “गांधी हे धार्मिक गृहस्थ आहेत.” अशीही त्यांची ओळख होती. गांधी बॅरिस्टरचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले, तेव्हा ते तेथील इनर टेम्पल चे विद्यार्थी होते. इंग्लंडमध्ये त्यांचा शाकाहारी संघटनेच्या अनेक सदस्यांशी संपर्क आला. त्यामुळे आपसूकच इंग्लंडमधील ख्रिश्चन मित्रांशीही त्यांचा परिचय झाला. “दि व्हेजिटेरियन” या पत्राचे संपादक डॉ. जोशिया ओल्डफिल्ड हे इंग्लंडमधील ज्या शाकाहारी संघटनेचे अध्यक्ष होते त्या संघटनेचे गांधी सचिव झाले. याच संघटनेचे उपाध्यक्ष सर ॲडविन अर्नोल्ड यांनी भगवद्गीतेचे “सॉंग सेलेष्टियल”(स्वर्गीय गीता) या नावाने इंग्रजीत भाषांतर केले ते 1885 साली प्रसिद्ध झाले.

भगवद् गीतेबद्दल गांधींना विशेष प्रेम होतं हे सर्वश्रुत आहे. भगवद्गीते बद्दल गांधींनी त्यांच्या भाषणांमध्ये व लिखाणामध्ये अनेकदा आपले मनोगत व्यक्त केलेले आढळते,”मी जेव्हा अनिश्चिततेत अडकतो, विफलतेची भावना मन ग्रस्त करते आणि आशेचा एकही किरण दिसेनासा होतो अशा वेळी मी भगवद् गीतेकडे वळतो.त्यावेळी ती मला दिलासा देते. अति दुःखातून मी बाहेर पडतो.”

६ आॕगस्ट १९२५ च्या “यंग इंडिया” मध्ये गांधी म्हणतात,” माझे आयुष्य अनेक बाह्य घटनांनी व्यापले आहे. परंतु या घटनांनी मी विचलित झालो नाही ते केवळ गीतेच्या शिकवणुकीने.” गांधींच्या आयुष्यात एकीकडे गीतेतील निष्काम कर्माच्या तत्वाबाबत ओढ दिसते तर दुसरीकडे ख्रिस्त आणि बुद्धांची करूणाही दिसते. ख्रिस्ताची डोंगरावरील प्रवचने गांधींना फार आवडत “क्षमा,दया,या सद्भावांचा उगम मला ख्रिस्ता कडे नेणारा आहे”, असे गांधी अनेकदा म्हणत असत. दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांचा अनेक प्रोटेस्टंट, कॅथोलिक आणि भावनिक ख्रिश्चनांशी संबंध आला.त्यातील अनेकांनी त्यांचे धर्मांतर घडवण्याचाही प्रयत्न केला. त्यावर गांधी मात्र ,”माझ्या अंतर्मनाने स्वीकारले तरच मी ख्रिस्ती होईल”, असे उत्तरत असत. हिंदू धर्माबद्दल अनेक प्रश्न गांधींना विचारले जायचे, त्यावर गांधी त्यांचे मित्र कवी रायचंदभाईंशी चर्चा करून पत्राद्वारे प्रश्नकर्त्यांना उत्तरे देतत्.

धर्मातील बाह्यचाराला किंवा प्रतिकांना गांधी फार महत्त्व देत नसत. एकदा मिचेल कोट्स यांनी गांधींना त्यांच्या गळ्यातील मण्यांची माळ काढण्‍यासाठी आग्रह केला. गांधींनी त्याला नकार दिला. तेव्हा कोट्स म्हणाले,”तुझा या गोष्टीवर विश्वास कसा बसतो?”त्यावर गांधी म्हणाले, ” माझा या माळेवर विश्वास नाही. पण माझ्या आईने ज्या प्रेमाने ती मला दिली.त्या प्रेमावर मला विश्वास आहे.तो विश्वास मला तोडायचा नाही.” गांधींचे अनेक ख्रिश्चन मित्र त्यांना ख्रिश्चन धर्माचे धडे देत. ते म्हणत,”तू येशू ख्रिस्तावर श्रद्धा ठेवली, तर तो तुला पापातून मुक्ती देईल.” यावर गांधी म्हणत, “माझ्या हातून पापच घडू नये याची दक्षता मी घेतली, तर मला पापातून मुक्ती मिळण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही”. एकदा “ख्रिस्त आणि स्वर्ग” या विषयावर एका मित्राशी बोलताना, गांधी म्हणाले ,”मी ख्रिश्चन झालो तरच मला स्वर्ग लाभेल हे कसे?स्वर्ग केवळ ख्रिश्चनांची एकाधिकारशाही आहे का?ईश्वर केवळ ख्रिश्चन आहे काय? बिगर ख्रिश्चनाविषयी ईश्वराचे मन कलुषित आहे काय?”, असे प्रश्न गांधी टाकत.दोन धर्मातील श्रेष्ठत्वाची स्पर्धा गांधींना कधीच भुरळ घालू शकली नाही.
“दि लाईट ऑफ एशिया” या एडविन अर्नाल्डच्या ग्रंथांमधून गांधींना बुद्ध आणि ख्रिस्त यांच्यातील साम्य याचा अभ्यास करता आला.पुढे गांधींनी सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह या बुद्धांच्या तत्त्वांचा अक्षरशः आयुष्यभर अंगीकार केला. करुणा हा तर गांधींच्या जीवनाचा स्थायीभावच झाला.

गांधींच्या अहिंसा तत्त्वाची जेवढी चर्चा होते तेवढीच त्याची चेष्टाही होतांना दिसते. समाजात शोषणाची व्यवस्था असतांना गांधींच्या अहिंसेची अनेकदा कसोटी लागली. पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीयांनी युध्दात सहभाग घेऊन शस्त्र प्रशिक्षित व्हावे, असे गांधी म्हणाले. गांधी आपल्या जीवन तत्त्वांना परिस्थितीनुरूप प्रत्यक्षात आणत. युद्धाच्या काळात भारतीयांना शस्त्र प्रशिक्षण मिळण्याची संधी असल्याने यातून युद्ध शिक्षणही भारतीयांना उपलब्ध होईल असं गांधींना वाटत होत. यासंदर्भात पंडित मदन मोहन मालवीय यांना लिहिलेल्या पत्रात गांधी लिहितात, “शरीर बलाचा पूर्ण विकास साधणे ही अहिंसा समजून घेण्याची आणि आत्मसात करण्याची पूर्वअट आहे.” जून 1918 मध्ये नाडियाडहून केलेल्या आव्हानात गांधी म्हणतात,”शूर माणसात नि पौरुष्य गमावलेल्या माणसात मैत्री होणे शक्य नसते.” वर्णव्यवस्थेला गांधी “हिंदू धर्मावरील कलंक” म्हणायचे.अशाच आशयाचा ठराव त्यांनी 1920 च्या नागपूर अधिवेशनात मांडला आणि संमत करून घेतला. वर्णव्यवस्थेने प्रत्येक वर्णातील लोकांसाठी वेगवेगळी कामे निश्चित केलेली होते. ही कामे जन्मानुसार निश्चित केल्या गेलेली होती. अंगमेहनतीची आणि शारीरिक श्रमाची सर्व कामे शुद्रवर्णाची कामे म्हणून वर्णव्यवस्थेने सांगितलेली होती. पण गांधींनी श्रम न करणाऱ्यांना अन्न नाही किंवा स्वतः कष्ट न करता दुसऱ्याच्या श्रमावर जगणारा तो चोर असतो. अशी विधाने करून वर्णव्यवस्थेच्या या विचारांनाच सुरुंग लावला. या सुरुंगाला उक्ती बरोबरच गांधींनी व्यापक प्रमाणावर कृतीचीही जोड दिली. गांधी वर्णव्यवस्थेनुसार वैश्य असूनही शुद्रांसाठी नेमून दिलेली कामे स्वतः करीत. गांधींची ही कृती वर्णसंकराला सिद्ध करणारी होती. पारंपारिक नि कर्मठ धर्म धारणेला गांधींनी दिलेला तो जबरदस्त तडाखा होता.गांधींच्या वैयक्तिक आयुष्यातही शारीरिक श्रमाला प्रचंड मोठे आदराचे स्थान होते. एवढेच नव्हे तर “शारीरिक श्रम” हीच काँग्रेसमधील मतदान हक्क मिळवण्याची अट असावी, असा ठराव गांधींनी बेळगाव काँग्रेस अधिवेशनात मांडला. पण दुर्दैवाने तो ठराव नाकारण्यात आला.

गांधींच्या धार्मिक चिंतनावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये लिओ टॉलस्टॉय आणि कवी रायचंदभाई या व्यक्ती प्रमुख होत्या. जैन तत्त्वज्ञानातील अनेक संस्कार, विचार यांचा परिचय रायचंदभाई मुळेच गांधींना झाला. अनेकांतवाद (स्यादवाद)हा जैन विचार गांधींना आवडला.” मी सनातन हिंदु आहे.”असे म्हणणाऱ्या गांधींच्या आयुष्यात मात्र सनातन विचारांना जागा नसल्याचीच उदाहरणे अधिक. सनातन धर्मानुसार समुद्रउल्लंघन करणे म्हणजे धर्म द्रोहच होता. अगदी टिळकांनाही या धर्मद्रोहासाठी प्रायश्चित्त घ्यावे लागल्याचे इतिहास प्रसिद्ध आहे. पण गांधींनीही केलेल्या या कथित धर्मद्रोहा बद्दल कधीही प्रायश्चित्त घेतलं नाही. इथेही गांधींनी सनातनतेला हरताळ फासला. ज्या वर्ण व्यवस्थेमध्ये अस्पृश्यांचा स्पर्शही विटाळ मानला गेला. अशा अस्पृश्य कुटुंबाला साबरमती आश्रमातून घालवण्यासाठी आश्रमवासियांसहीत गांधींच्या कुटुंबीयांनीही आग्रह धरला.तेव्हा आपल्या सर्व शक्तिनिशी त्या अस्पृश्य कुटुंबाला आश्रमातच ठेवून घेण्यासाठी गांधी इरेस पेटले होते.” सर्व आश्रमवासी आश्रम सोडून गेले तरी बेहत्तर परंतु हे कुटुंब आश्रम सोडून कुठेही जाणार नाही”, असा निर्वाणीचा इशाराच गांधींनी आश्रमवासींना दिला. भगवद् गीतेप्रमाणेच गांधींच्या आयुष्यात रामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु त्यांच्या आयुष्यात रामाचे मंदिर मात्र कुठेही दिसत नाही.हे विशेष! धर्म चिंतनाच्या बाबतीत टॉलस्टॉयच्या “ईश्वराचे सिंहासन तुमच्या हृदयात वसले आहे.” या पुस्तकाचाही प्रभाव गांधींवर होता. मार्च 1909 मध्ये गांधींनी आपले पुत्र मणिलाल ला लिहिलेल्या पत्रात या पुस्तकाचा उल्लेख केला आहे.
.
गांधींचा धर्म सहानुभूती पेक्षा अनुभूतीने परिपूर्ण होता.झालेल्या चुकांच्या प्रायश्चित्तापोटी त्यांनी उपवासाच्या माध्यमातून आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला. उपवास करणे म्हणजे दुःखाची आणि वेदनेची अनुभूती घेणे असे त्यांना वाटत असे. धर्माच्या आडून आपल्या वर्चस्वाला टिकू पाहणार्‍या प्रवृत्तींशी गांधींच्या धर्म चिंतनाने आयुष्यभर संघर्ष केला. जन्माधारित श्रेष्ठत्व नाकारून गांधींनी कर्मा आधारित श्रेष्ठत्वाला मान्यता दिली.त्यामुळे देशातील धर्मांध शक्तींना गांधी त्यांच्या मार्गातील सर्वात मोठा अडसर वाटल्यास नवल नव्हते. गांधींनी वेदांना श्रेष्ठ आणि ईश्वरीय कधीही मानले नाही. पण त्यांच्या धर्म जाणिवेमध्ये इतरांची वेदना मात्र प्राधान्याने असायची. आफ्रिकेमधील झुलूंचे बंड असो किंवा बोअर युद्ध असो गांधींनी या दोन्ही युद्धामध्ये प्रचंड रुग्णसेवा केली. सेवाभाव हा गांधींच्या जगण्यातला स्थायीभाव होता. “सेवेशिवाय ईश्वरच अनुभवता येत नाही.” असे गांधीजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना एका भेटीत म्हणाले होते.
गांधींच्या धार्मिक भावना त्यांच्या जगण्यातला भाग होता. “निष्काम कर्म” ही गीतेची शिकवण गांधींनी त्यांच्या हयातभर पाळली.याच धर्म जाणिवेमधून त्यांनी स्वतंत्र आंदोलनात सर्व जाती- धर्म- पंथ- वर्णाची माणसं जोडली. स्वतंत्र आणि त्यातून येणारी सत्ता हा आमचाच पारंपारिक अधिकार आहे ,असं मनोमन मानणाऱ्या प्रस्थापित वर्गाला गांधींच्या या कृतीने जबरदस्त धक्का दिला. गांधींच्या अशा कृतींमध्येच त्यांच्या हत्येची कारणमिमांसा शोधता येते.

गांधींच्या धर्म चिंतनाने देशातील लोकांना धर्माची नवी दृष्टी दिली. सत्य व अहिंसा याच्या जोडीला गांधींनी करुणाही स्वीकारली,ती जपली! गांधींच्या धर्मचिकित्सेचा केंद्रबिंदू माणूसच होता. माणसाचं मूल्यमापन गांधींनी धर्म -जात- पंथ -वर्ण त्याच्या कितीतरी वर उठून केलेल आहे. गांधींचे धर्मचिंतन हे सातत्याने प्रवाही आणि सतत प्रगत होत जाणारे आहे. या धर्मचिंतनामध्ये धर्मातील बाह्यचाराला महत्व नाही. धर्मप्रतिकांच्या-प्रतिमांच्या अवडंबराला थारा नाही. धर्मातील दया, क्षमा, करुणेला स्थान असले तरी तिच्याविषयीच्या सहानुभूती पेक्षा अनुभूतीला कितीतरी उच्च स्थान या चिंतनात आहे.

✒️राहुल धनराजजी बरडे(अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज प्रबोधन परिषद वरुड)मो:-8275049863