बालानाईक तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला

31

🔹अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्याला यश, आ.पवार यांनी केला विरोध

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.1फेब्रुवारी):-बंजारा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा या उद्देशाने माजी आ.अमरसिंह पंडित यांनी सातत्याने शासन दरबारी प्रयत्न केले. तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीचे विभक्तीकरण करून बालानाईक तांडा या स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती व्हावी यासाठी माजी आ.अमरसिंह पंडित सातत्याने प्रयत्न करत होते. भाजपाच्या शासन काळात आ.लक्ष्मण पवार यांनी विरोध केल्यामुळे आजवर रखडलेल्या या ग्रामपंचायत विभक्तीकरणाला अखेर महाविकास आघाडी शासनाच्या काळात न्याय मिळाला. अमरसिंह पंडित यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे याकामी सहकार्य लाभले असून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. चकलांबा ग्रामस्थ व बंजारा समाजाने तोफांची सलामी देवून या निर्णयाचे स्वागत केले.

अनेक मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये जोडलेल्या बंजारा तांड्यांना निधी वितरणामध्ये अन्याय सहन करावा लागतो परिणामी वर्षानुवर्षे त्यांना विकासापासून वंचित रहावे लागते. बंजारा समाजाच्या सर्वांगिन विकासासाठी सातत्याने अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांनी प्रयत्न केले आहेत. गेवराई तालुक्यातील बंजारा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. चकलांबा ग्रामपंचायतीचे विभक्तीकरण करून बालानाईक तांडा या स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती व्हावी यासाठी त्यांनी महाविकास आघाडी शासनाकडे प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून माजी आ.अमरसिंह पंडित यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर चकलांबा ग्रामपंचायतीचे विभक्तीकरण होवून बालानाईक तांडा या स्वतंत्र ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे. या बाबतचे अधिकृत राजपत्र महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केले. यापूर्वीही माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या प्रयत्नामुळे पाचेगाव ग्रामपंचायतीचे विभक्तीकरण होवून वसंतनगर तांडा आणि जयराम तांडा यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला तर राक्षसभुवन ग्रामपंचायतीचे विभक्तीकरण होवून गैबीनगर तांडा ही नविन ग्रामपंचायत अस्तित्वात आली. बंजारा तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाल्यामुळे बंजारा समाज बांधवांनी माजी आ.अमरसिंह पंडित यांचे आभार व्यक्त केले.

बालानाईक तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळू नये यासाठी भाजपा आमदार लक्ष्मण पवार यांनी भाजपाच्या सत्तेच्या काळात प्रयत्न केले. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून त्यांनी याकामी विरोध केल्यामुळे आजवर बालानाईक तांडा स्ततंत्र ग्रामपंचायतीपासून वंचित राहिला. शेवटी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून माजी आ.अमरसिंह पंडित यांनी बालानाईक तांडा येथे नविन ग्रामपंचायत स्थापन करून बंजारा समाज बांधवांना न्याय मिळवून दिला. तेथील ग्रामस्थांनी तोफांची सलामी देवून या निर्णयाचे स्वागत केले. माजी जि.प.सदस्य विजयकुमार घाडगे, उपसरंपच अंबादास सांगळे, पंचायत समिती सदस्य शेख तय्यबभाई, मदनराव खेडकर, भाऊसाहेब घाडगे, अंकुश सोनवणे, मच्छिंद्र शेळके, शिवाजी खेडकर, भागवतराव खेडकर, राजेंद्र सांगळे, शिवाजी चव्हाण आदींनी गावात आनंदोत्सव साजरा केला.