आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मुंबई येथे घेतली मंत्र्यांची भेट

37

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2फेब्रुवारी):-विधानसभा मतदारसंघातील पुनर्वसित गावांतील रखडलेली विकासकामे करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसनमंत्री मा.ना. विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन निधीची मागणी केली.पंचायत समिती पालम व पंचायत समिती पूर्णा येथे पूर्णवेळ गट विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्याकरिता आमदार रत्नाकर गुट्टे यांनी आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ यांची भेट घेतली.गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड तालुक्यातील खळी,माखणी, खोकलेवाडी व चिलगरवाडी पालम तालुक्यातील पुयणी, कापसी, दुटका व भोगाव तसेच पूर्णा तालुक्यातील निळा, महागाव, पेनुर, आलेगाव, कंठेश्वर, कानडखेडा-२ व सुकी या गावांचे पुनर्वसन झाले असून या पुनर्वसित गावातील विकास कामे अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

याचे गांभीर्य ओळखून आमदार गुट्टे यांनी आपल्या मतदारसंघातील पुनर्वसित गावातील विकास कामे करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसनमंत्री मा.ना. विजय वडेट्टीवार यांची आज मुंबई येथे भेट घेऊन निधीची मागणी केली. पुनर्वसित गावातील नागरिकांना येणाऱ्या समस्या आमदार गुट्टे यांनी मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिल्याने पुनर्वसित गावातील विकास कामे करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याचे मंत्रीमहोदयांनी आश्वासित केले.

पंचायत समिती पालम व पंचायत समिती पूर्णा येथे पूर्णवेळ गट विकास अधिकारी नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची प्रशासकीय कामे होण्यास विलंब होत होता. सामान्य नागरिकांची शासकीय कामे वेळेत पूर्ण होऊन सर्वसामान्य नागरिकांना पंचायत समिती अंतर्गत विविध शासकीय योजनेचा लाभ मिळावा याकरिता पालम व पूर्णा पंचायत समिती येथे पूर्णवेळ गट विकास अधिकारी असणे गरजेचे आहे. त्यामुळे सदरील दोन्ही ठिकाणी पूर्णवेळ गट विकास अधिकारी यांची नियुक्ती करण्याची मागणी आ.गुट्टे यांनी ग्राम विकास मंत्री मा.ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे केली असता दोन्ही पंचायत समितीला एक महिन्याच्या आत पूर्णवेळ गट विकास अधिकारी नियुक्ती करण्याचा शब्द यावेळी मंत्रीमहोदयांनी आ. डॉ.रत्नाकर गुट्टे यांना दिल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते.