भारत जपान मैत्रीचे सत्तर वर्ष

30

भारत आणि जपान हे एकमेकांचे विश्वासू मित्र आहेत. जगातील भारताचे जे विश्वासू मित्र आहेत त्यात जपानचा क्रमांक खूप वरचा आहे. दोन्ही देशांच्या मैत्री संबंधाला यावर्षी सत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत. २०२२ हे वर्ष तसे ऐतिहासिक आहे कारण हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे तर जपान आणि भारत मैत्री संबंधाला यावर्षी सत्तर वर्ष पूर्ण होत आहे. १९४७ साली भारत स्वातंत्र्य झाल्यावर ज्या मोजक्या देशांनी भारताशी मैत्रीचे संबंध स्थापन केले होते त्यात जपान हा ही एक देश होता. भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिगेरू येशूदा यांच्यापासून सुरू झालेली ही मैत्री भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे विद्यमान पंतप्रधान फुमिओ केशिदा यांच्यापर्यंत चालू आहेत. जपान हा आज भारताचा विश्वासू मित्र असला तरी दोन्ही देशांच्या मैत्री संबंधात अनेकदा चढउतार पाहायला मिळाले आहेत. विशेषतः अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान असताना दोन्ही देशांचे संबंध बिघडले होते त्याला कारणही तसे होते. १९९८ साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारताने पोखरणमध्ये अणू चाचण्या केल्या होत्या तेंव्हा भारताला सर्वात जास्त जपानच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. जपानने भारताविरोधी आघाडी उघडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यास सुरुवात केली होती. जपान हा अण्वस्त्रांबाबत सर्वात संवेदनशील देश आहे. कारण आजवर एकाच देशावर अण्वस्त्र हल्ला झाला आहे आणि तो देश म्हणजे जपान. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अण्वस्त्र हल्ला करून हे दोन्ही शहरे बेचिराख केली होती.

अण्वस्त्रांची सर्वात जास्त झळ जपानला बसली आहे त्यामुळे १९९८ साली जेंव्हा भारताने अण्वस्त्र चाचण्या केल्या तेंव्हा जपानने भारतावर निर्बंध लादले होते. अर्थात हे निर्बंध जास्त दिवस चालले नाही कारण भारताची अर्थव्यवस्था मोठया प्रमाणात प्रगती करत होती व चीन विरोधात आघाडी उघडण्यासाठी जपान व अमेरिकेला भारताची गरज होती. त्यामुळे भारत आणि जपान यांचे संबंध लवकरच पुर्ववत झाले. २००४ साली जेंव्हा मनमोहन सिंग यांचे सरकार अस्तित्वात आले तेंव्हापासून दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ झाले. वर्ष २००६ पासून जपान व भारत यांच्यात वार्षिक बैठका ( ही बैठक एक वर्ष भारतात तर एक वर्ष जपानमध्ये अशी असते ) सुरू झाल्या. २००६ साली सुरू झालेल्या या वार्षिक बैठका आजतागत चालू आहेत. या बैठकांमुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. जसे २०१३ साली जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारताच्या दौऱ्यावर आले होते तेंव्हा भारतातील अतिवेगवान रेल्वे ( बुलेट ट्रेन ) ची घोषणा करण्यात आली. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान बनल्यावर बुलेट ट्रेन प्रकल्पाला चालना मिळाली. बुलेट ट्रेनसाठी दोन्ही देशात करार झाला. भारतातील बुलेट ट्रेनसाठी जपान सर्वोतोपरी मदत करणार असून हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी जपानने भारताला मोठे अर्थ साहाय्य केले आहे. जपानच्या मदतीने भारतातील बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे.

भारतातील इशान्येकडील राज्यांमध्ये विकासासाठी जपान प्रयत्नशील आहे. जपान हा भारताचा सर्वात मोठा देणगीदार असून भारतातील सर्वात मोठी तिसरी थेट परकीय गुंतवणूक ही जपान कडून होते. दोन्ही देश एकमेकांना विज्ञान अंतराळात प्रगती करण्यासाठी सहकार्य करतात. भारत आणि जपान मैत्री संबंधाला आणखी किनार आहे ती म्हणजे चीन. जागतिक मागासत्ता होण्याचे चीनचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी तो आशिया खंडावर एकहाती वर्चस्व गाजवू इच्छितो मात्र त्याची ही इच्छा भारत आणि जपानमुळे पूर्ण होऊ शकत नाही. भारताप्रमाणेच जपानलाही चीन पाण्यात पाहतो. जपानही चीनचे वर्षस्व झुगारून देतो. चीन हा जपान आणि भारत या दोन्ही देशांचा समान शत्रू आहे. चीनशी लढायचे असेल तर जपान आणि भारत या दोन्ही देशांना हातात हात धरून काम करावे लागेल. दोन्ही देशांच्या क्षमता व त्रुटी पूरक आहेत. दोन्ही देशांचे मैत्री संबंध दृढ झाले तरच दोघांचा विकास होऊ शकतो आणि चीनलाही टक्कर देता येऊ शकेल!

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५