राष्ट्रीय विज्ञान दिन

26

संपूर्ण देशात आजचा दिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी नोबेल पारितोषिक विजेते भारतीय शास्त्रज्ञ सर सी व्ही रामन यांनी रामन इफेक्ट हा वैशिष्टयपूर्ण शोधनिबंध जगासमोर सादर केला होता. त्या दिवसाचे औचित्य साधून हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस उत्साहाने साजरा करतात.

भारतासाठी पहिले नोबेल पारितोषिक मिळवून देणारे जेष्ठ शास्त्रज्ञ भारतरत्न सर सी व्ही रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी भौतिक शास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकाशाच्या विकीरणासंबंधी संशोधन करून त्याविषयीचा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जागतिक पातळीवर सादर केला. त्यांच्या या शोध निबंधाला १९३० साली मान्यता मिळाली आणि त्याच वर्षी या संशोधनासाठी त्यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाला. सी व्ही रामन हे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आशियाई शास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून म्हणजेच १९८७ पासून २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान म्हणून साजरा म्हणून साजरा केला जातो. रामन यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी मद्रास येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रामन असे होते. शालेय वयात रामन हे अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. रामन यांनी ११ व्या वर्षीच शालेय शिक्षण पूर्ण केले. १५ व्या वर्षी ते इंग्रजी आणि विज्ञानामध्ये पदवीधर झाले तर १७ व्या वर्षी भौतिक शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण मद्रासमध्ये उच्च श्रेणीमध्ये पूर्ण केले.

त्यांनतर ते कोलकाता येथे डेप्युटी अकाउंटट जनरल पदावर रुजू झाले झाले पण या नोकरीत त्यांचे मन रमेना म्हणून त्यांनी कोलकाता येथे कमी पगारात भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. प्राध्यापक म्हणून अध्यापन करीत असतानाही त्यांनी आपले संशोधन सुरूच ठेवले. १९२१ मध्ये कोलकाता विद्यापीठाने त्यांना उच्च शिक्षणासाठी ब्रिटनला पाठवले. तिथे त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये भारतीय तंतुवाद्ये हा शोधनिबंध सादर केला. पुढे १९३५ मध्ये भारतीय तंतुवाद्ये विशेष करून तबल्याचा नादनिर्मिती, तबल्याची पुडी, शाई, तरंगलांबी इत्यादींवर संशोधन केले. युरोपातून समुद्रमार्गे भारतात येत असताना आकाशातील निळा रंग पाहून त्यांना या रंगाविषयी कुतूहल जागृत झाले. आकाश निळ्या रंगाचेच का दिसते असा प्रश्न त्यांना पडला. त्यांचे उत्तर शोधण्यासाठी त्यांनी पाणी, बर्फ यामधून प्रकाशाचे विकिरण यावर संशोधन सुरू केले. या संशोधनातून त्यांना आकाशाच्या निळ्या रंगाचे उत्तर मिळाले. रामन इफेक्ट म्हणजे प्रकाशाचे विकिरणच. प्रकाशाचे विकिकरण हा एक दृश्य परिणाम आहे.

अशा प्रकारचे किरण सरळ जेंव्हा आपल्या डोळ्यांत शिरतात, तेंव्हाच आपल्याला प्रकाशाच्या अस्तित्वाची जाणीव होते. रामन हे सुरवातीला स्फटिकांच्या अणू रचनेसंबंधी आढळणाऱ्या रचना साधर्म्याशी अपवादात्मक असा अभ्यास करत होते. या दरम्यान १९२८ साली त्यांना असे आढळून आले की विकिरीत प्रकाशामध्ये मूळ प्रकाशाइतक्या, तरंग लांबीच्या किरणांबरोबर इतरही प्रकाश किरणांचे अस्तित्व असते, ज्यांचा मागमूसही मूळ प्रकाश किरणांमध्ये नव्हता. या नवीन किरणांचा जास्त अचूक अभ्यास करण्यासाठी त्यांनी पाऱ्याच्या विद्युतदीपाघटापासून मिळणारी तरंग लांबी अभ्यासली आणि त्यातून त्यांच्या नवीन निष्कर्षाला, संशोधनाला बळकटी मिळाली. प्रकाशामध्ये कण स्वरूपाशी साधर्म्य सांगणारे काही गुणधर्म असतात, त्यांच्या प्रकाश कनिकांमधील ऊर्जा ही त्या प्रकाशाच्या कंपन संख्येच्या समप्रमाणात असते. त्यांचा हाच शोधनिबंध रामन इफेक्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यांच्या या अत्यंत मौलिक आणि आणि अनमोल अशा संशोधनामुळे पुढे अनेक शोध लागले. भौतिक शास्त्रात सध्या जे शोध लागत आहेत त्याचे मूळ याच रामन इफेक्ट मध्ये सामावलेले असते. रामन इफेक्टमुळे माहितीचे भांडार खुले झाले. त्यामुळेच देशातील देशातील १७ विद्यापीठांनी तसेच जगातील ८ विद्यापीठांनी त्यांना सन्मानीय डॉक्टरेट फेलोशिप बहाल केली. १९४३ मध्ये रामन यांनी बंगलोर येथे रामन संशोधन संस्थेची स्थापना केली.

या संशोधन संस्थेत भौतिक शास्त्रातील संशोधनाला अग्रक्रम देण्यात आला. १९५४ साली भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. १९५७ साली आंतरराष्ट्रीय लेनिन पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. आपण लावलेल्या शोधाचा उपयोग रचनात्मक कार्यासाठी व्हायला हवा विध्वंसक कार्यासाठी त्याचा उपयोग होऊ नये असे त्यांचे मत होते. १२ नोव्हेंबर १९७० रोजी त्यांचे निधन झाले.

✒️श्याम बसप्पा ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५