खर्दे येथील जय गुरुदेव माध्यमिक विद्यालयात १०वी च्या विद्यार्थ्यांना निरोप

29

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि 15मार्च):- जय गुरुदेव माध्यमिक विद्यालय खर्दे येथे इ.१० वी च्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.बी.चौधरी यांनी केले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे अध्यक्ष ऍड.व्ही.एस.भोलाणे होते. तत्पुर्वी, निरोप समारंभ कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून धानोराचे सरपंच भगवान महाजन, महात्मा फुले हायस्कूलचे आदर्श शिक्षक व्ही.टी. माळी, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख भानुदास पाटील, उद्योजक दिनेश कंखरे, पत्रकार राजेंद्र वाघ, संचालक आत्माराम पाटील, अरुण पाटील, मुख्याध्यापक पी.व्ही.नेमाडे आदी मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य संकल्पिका माँसाहेब जिजाऊ, विद्येची खरी देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.

याप्रसंगी यामिनी पाटील, साक्षी सोनवणे, रोहित बाविस्कर, जयश्री वाघ, वर्षा पाटील, प्राची पाटील आदींनी गुरुजनांबद्दलच्या भावना व्यक्त केल्यात की, आयुष्यभर पुरेल इतकी शिदोरी आम्हाला गुरुजनांकडून मिळाली आहे. व आम्ही सर्व विद्यार्थी चांगले मार्क्स मिळवून शाळेचे नाव मोठे करणार, आज रोजी आम्ही सर्व जड अंतकरणान शाळेचा निरोप घेत आहोत. परंतु, शाळेला कधीही विसरणार नाहीत. त्याचबरोबर शाळा, शिक्षक व कर्मचारी वृंदांप्रती कृतज्ञता करीत आठवणींना उजाळा दिला. तसेच, शिक्षक वृंदांनी विद्यार्थ्यांना एस.एस.सी बोर्ड परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना दिल्या. पेपर कसा लिहावा ? याचे मार्गदर्शन करून येणार्‍या बोर्डाच्या परीक्षेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांनी सदिच्छा दिल्या.

त्याचप्रमाणे भगवान महाजन, व्ही.टी.माळी, भानुदास पाटील, दिनेश कंखरे, राजेंद्र वाघ आदींनी विद्यार्थ्यांना भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कार, सभ्यता, राष्ट्रभक्ती, गुरूंबद्दल भावना, जेष्ठांचा आदर, व्यक्तिमत्त्व विकास, स्वतःला विद्यार्थी समजा, आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर रहा, या पवित्र मंदिरात उभारलेल्या पायावर तुमची उत्तम माणुसरूपी इमारत नक्कीच उभी राहील आणि तुमच्या यशाचा, सत्कार्याचा सुगंध सदैव जय गुरुदेव शाळेला प्रफुल्लीत करणार याच अपेक्षा विद्यार्थ्यांकडून केल्या व भावी आयुष्याला सदिच्छा दिल्यात.अध्यक्षीय भाषणात ऍड.व्ही. एस. भोलाणे म्हणाले की, चांगले मार्क्स मिळवुन शाळेचे, गावाचे, देशाचे व आपल्या परिवाराचे नाव उज्ज्वल करा, त्याचसोबत संस्कार जोपासावे. असे संबोधित करून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक आर.टी.माळी यांनी तर आभार मुख्याध्यापक पी.व्ही.नेमाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्ही.बी.चौधरी, व्ही.एन.शिरसाठ, एन.एस.चौधरी, वा.ना.पाटील, एस.आर.सपकाळे, बी.एस.पटेल, वाय.जी.पाटील, एस.डी.पाटील, बी.एम.सौंदाणे, एच.एच.चौधरी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.