होय, आम्हीच जातीवाद शाबूत ठेवलाय…

35

फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी दोन आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. एक औरंगाबाद मधील कार्यक्रमात समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? असे आणि दुसरे पुण्यातील कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांचं लग्न 10 व्या वर्षी झालं होतं. तेव्हा त्यांच्या पतीचं वय 13 वर्ष होतं. त्यामुळे कल्पना करा की, इतक्या लहान वयात एक मुलगा आणि मुलगी लग्नानंतर काय करत असतील? असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ह्या दोन्ही वक्तव्यानंतर समाजातून अगदीच बोटांवर मोजण्याइतक्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यातसुद्धा शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यानंतर काही मराठा समाजाच्या संघटनांमधून तर सावित्रीमाई फुलेंबाबतच्या विधानानंतर काही माळी समाज संघटनांमधून निषेधाचा सूर उमटला तो सुद्धा अगदी नगण्यच.

याचे कारणही तसेच आहे. आपण सर्व महापुरुषांना जातीनुसार वाटून घेतले आहे. शिवाजी महाराजांबद्दल कुणी बोललं तर फक्त मराठयांनीं निषेध करायचा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कुणी वाईट बोलकं की फक्त बौध्दांनीच त्याचा विरोध करायचा. फुले दाम्पत्याबद्दल बोललं की फक्त माळी लोकांनीच निषेध नोंदवायचा. मुस्लिम महापुरुषाबद्दल कुणी बोललं तर मुस्लिमांनीच त्याविरुद्ध आवाज उठवायचा. असे दुसर्‍या जाती-धर्मातील महापुरुषाबद्दल कुणी वाईट वक्तव्य केलं की आपल्याला जास्त वाईट वाटत नाही, ते वक्तव्य आपल्या मनाला झोंबत नाही कारण आपण सुद्धा आतून निर्लज्जपणे मान्य केलंय की ते आपले नाहीत.

अशी वक्तव्ये करतांना कदाचित कोशियारींना सुद्धा माहिती नसेल की आपल्याला का असे वक्तव्य करायला लावले. आणि आपल्याला सुद्धा वाटत की ही वक्तव्ये करणारी व्यक्ती विकृत आहे, तिला कळत नाही वगैरे. पण अशा वक्तव्यातून ह्या विकृत प्रवृत्ती ह्याचीच अधून मधून चाचणी घेत असतात की हा ’कट्टर जातीवाद’ शाबूत आहे की नाही? आणि आपल्या कृतीतून आपण तो जातीवाद साबूत असल्याची पावती प्रत्येकवेळी देत असतो. महापुरुषांच्या विचारांच्या केलेल्या खुनाचीच आपण अशा प्रत्येकवेळी साक्ष देत असतो. जातीवाद हा शब्द वापरून वापरून गुळगुळीत झालेला असला तरी तो अस्तित्वात आहेच हे सत्य नाकारता येत नाही.

अशी अनेक महापुरुषांबद्दलची उदाहरणे आपल्याला देता येतील की जेव्हा जेव्हा कुण्या महापुरुषाचा अपमान केला गेला तेव्हा तेव्हा फक्त त्या महापुरुषाच्या जातीच्या लोकांनीच निषेधात पुढाकार घेतला. इतर जाती-धर्मातील लोक अंतर राखून होते. अशावेळी आपण हा विचार करायला हवा की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा रयतेचं राज्य स्वराज्य उभं केलं तेव्हा ते काय कुणा एका जाती धर्माला डोळ्यांसमोर ठेऊन निर्माण केलं? स्वराज्यात प्रत्येक जातीसाठी-धर्मासाठी वेगवेगळे नियम होते? महात्मा फुले आणि सावित्रीआईंनी शाळा काढतांना काय फक्त माळी जातीच्या मुलींसाठीच शाळा काढली? विधवा विवाह बंदी, शिक्षणबंदी, विधवा केशवपन आणि शेतकर्‍यांवरील अत्याचाराविरुद्ध लढले ते काय फक्त माळी जातीतील स्त्रिया आणि शेतकर्‍यांसाठी? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहितांना फक्त दलितांसाठी लिहिली? दलितांसाठी वेगळे कायदे आणि इतरांसाठी वेगळे कायदे केले? हे सर्व महापुरुष जर आज फक्त आपापल्या जातीसाठीच झटले असते तर आज समाजाचं चित्र कीती भयंकर असतं? मग जर महापुरुषांनी समाजात कार्य करत असतांना कुठलीही जात पहिली नाही, धर्म पहिला नाही मग आपण ह्या महापुरुषांना का कायम जातीच्या चष्म्यातून बघतो?

कुठल्याही महापुरुषाला एकाच जातीच्या चष्म्यातून बघणे, त्यांना कुण्या एकाच जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे हा त्या महापुरुषांचा सर्वात मोठा अपमान आहे. आणि आपण तो अपमान कळत-नकळत रोजच करत असतो. विशेष म्हणजे प्रत्येक महापुरुषाच्या जातीच्या लोकांनीच त्या त्या महापुरुषांना सीमित करून टाकले आहे. त्यांचे व्यक्तीमत्व खुजे करुन टाकले. अमके महापुरुष आमचे आहेत असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा इतरांना आपण ते महापुरुष तुमचे नाहीत असेच सांगत असतो. आमचे आमचे करून आपण कोणत्याच महापुरुषाला ’आपले’ (सर्वांचे) ठेवले नाही. आम्ही महापुरुषांच्या विचारांचा प्रचार प्रसार करायला पाहिजे, टीसन्न वैश्विक करायला पाहिजे पण आम्ही तर उलट त्यांना मर्यादित करून टाकतोय.
1947 च्या अगोदर इंग्रजांनी ’फोडा आणि झोडा’ या सूत्रानुसार राज्यकारभार चालवला. परंतु इंग्रजांनी या देशाला फक्त दोनच भागात विभागले होते. एक हिंदू आणि दुसरा मुस्लिम. परंतु इंग्रजांच्या भारतात येण्याअगोदर पासून गेली हजारो वर्षे आपण हजारो जातींमध्ये विभागलो गेलो आहोत. आणि आम्ही खूप कष्टाने, प्रसंगी आपल्याच देशातील नागरिकांशी भांडून, त्यांचा द्वेष करत आमच्या वागणुकीतून हा जातीभेद शाबूत ठेवला आहे. हा जातीवाद आपल्यात कुणीही पेरला असो पण आपण सर्वांनी तो आपल्यात रुजवला, फुलवला आणि हजारो वर्षांपासून आजही जीवापाड जपतोय हेसुद्धा तितकेच खरे आहे.

विशेष म्हणजे हा जातीवाद शाबूत ठेवण्यासाठी आमच्यावर कुणाचाह दबाव नाही. कुणाची जबरदस्ती नाही. उलट जातीवाद मानू नये याकरिता राज्यघटनेत कायदे आहेत, कर्तव्ये आहेत. पण आम्ही ना राज्यघटनेला मोजत ना त्यातील कायद्यांना. परस्परांच्या जातीत रोटी-बेटी व्यवहार सोडा हो, फक्त इतर जातीतील महापुरुष ज्यांनी संपूर्ण समाजासाठी कार्य करून ठेवलं त्या महापुरुषांना तरी आपलं माना. आपलं म्हणा. त्यांच्या अपमानाचा चटका आपल्या जीवालासुध्दा लागू द्या. संपूर्ण आयुष्य तुमच्या-आमच्यासाठी पणाला लावणार्‍या महापूरुषांपेक्षा कुण्या एका नेता किंवा पक्षाला महत्व देवून काय साधतोय आपण? महापुरुषांचा अपमान आपल्या दृष्टीने महत्वाचा नसतो तर तो अपमान कोणत्या पक्षाच्या-जातीच्या व्यक्तीने केला हे महत्वाचे असते, हे कीती संतापजनक आहे? आज महापुरुष बघत असतील तर कुणासाठी आम्ही आयुष्य झिजवलं म्हणून पश्चाताप करत असतील.आजही एका जातीतील व्यक्ती-कुटुंबावर कुण्या दुसर्‍या जातीतील व्यक्ती कडून अन्याय-अत्याचार होतो आणि अन्याय करणारा आपल्या जातीचा आहे म्हणून दुसर्‍या जातीचे लोक जेव्हा गप्प बसतात तेव्हा तो महापुरुषांच्या विचारांचा खून असतो. आजकाल तर मैत्री करतांना सुद्धा जात-धर्म पाहिल्या जातो. मित्र म्हणून आपल्याच जातीच्या व्यक्ती निवडल्या जातात. आपल्या जातीचे लोक चांगले असतात, इतरांवर तितका विश्वास ठेवता येत नाही अशीच भावना बहुतांश लोकांच्या मनात रुजली आहे. ही भावना कुणी रुजवली? आपणच.आपण शबरीची उष्टी बोरे खाणार्‍या, कधीतरी आपल्याला मदत केली म्हणून एका नावाड्याला आपल्या राज्याभिषेकाला बोलावणार्‍या रामाला मानतो. सर्वच जातीतील सवंगड्यांसोबत रमणार्‍या कृष्णाला मानतो. अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करणार्‍या छत्रपती शिवरायांना दैवत मानतो पण त्यांच्या ठायी असलेला समानतेचा गुण नाकारतो याला काय म्हणावे?

आपण धर्माला मानतो. मग धर्म जर जाती-जातींमध्ये विभागून ठेवला, त्यांच्यात अंतर निर्माण केलं तर धर्म सशक्त बनेल की अशक्त? धर्म सशक्त व्हावा या दिशेने आपली वाटचाल पाहिजे की धर्मातच फूट पडून अंतर्गत वाद निर्माण होण्याच्या दिशेने आपली वाटचाल पाहिजे? अहो समानता जपणे, सोबत मिळून मिसळून राहणे खूप सोपे आहे, उलट जातीभेद पाळत वाद कायम ठेवत जगणे खूप कठीण आहे. कोणताही धर्म हा माणसाचे जगणे सोपे करण्यासाठी बनला आहे, जगणे कठीण-किचकट करण्यासाठी नव्हे.आज शिवजयंतीला फक्त मराठेच पुढाकार घेतांना दिसतात. भीमजयंतीला फक्त बौध्दच आयोजक असतात. महात्मा फुलेंच्या जयंतीला फक्त माळी समाजाचेच लोक जयंती साजरी करतात. त्यात इतर जातींचा समावेश नगण्य असतो. का? कारण दुसर्‍या जातीचा महापुरुष आम्हाला आपला वाटत नाही. त्याच्यावर आम्हाला आमचा हक्क वाटत नाही. कारण काय तर त्या महापुरुषाच्या जातीच्या लोकांनी त्या महापुरुषावर स्वतः चा हक्क सांगून ठेवलाय. आम्हीच आमच्या महापुरुषाचे वारसदार असे प्रत्येक समाजाने घोषित केले आहे. पण आपण हे का विसरता की कोणत्याही महापुरुषाचे वारसदार कधीच जातीचे नसतात, असतात ते फक्त वैचारिक वारसदार. ज्या दिवशी तुम्हाला दुसर्‍या जातीतील महापुरुष आपला वाटेल, त्याच्यावर आपला पूर्ण हक्क वाटेल, त्यांचा अपमान स्वतःचा अपमान वाटेल, त्यादिवशी समजा की आपण त्या महापुरुषाचे वैचारिक वारसदार झालो आहोत. आपण एकदा ठरवायचं आहे की, पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय शाबुत ठेवायचं? महापुरुषांचे विचार की जातीवाद? त्यावरच आपल्या पुढील पिढ्यांचे भविष्य निश्चित होणार आहे.

✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६