रंगभूमी ही समता, बंधुता आणि शांततेची पुरस्कर्ती असावी!

31

रंगभूमी ही समता, बंधुता आणि शांतीची पुरस्कर्ती असावी, परंतु असे होत नाही. रंगभूमी ही केवळ सत्तेच्या वर्चस्वाचे माध्यम बनली आहे आणि रंगकर्मीं त्यांचे कठपुतली बनले आहेत जे रंगभूमीच्या मूळ उदग्माच्या विरोधात आहे.रंगकर्माचे मूळ आहे मनुष्याला आणि मनुष्यतेला विकारांपासून मुक्त करणे. मनुष्याच्या विचाराला विवेकाच्या ज्योतीने प्रज्वलित करणे. रंगकर्म समग्र आहे, रंगकर्म मानवतेचे पुरस्कर्ते आहे. रंगकर्माची प्रक्रिया आगीत स्वतःला जाळून ‘स्व’ ला जिवंत ठेवण्याची आहे.

आत्म-विद्रोहाचे अहिंसक, कलात्मक सौंदर्य आहे रंगकर्म. सौंदर्यबोध म्हणजेच मानवता. सौंदर्यबोध हे सत्य शोधण्याचे, जतन करण्याचे, जगण्याचे आणि जोपासण्याचे सूत्र आहे. सौंदर्यबोध म्हणजे विवेकाच्या ज्योतीने पेटलेली शांततेची मशाल जी तलवारीतून गळणाऱ्या रक्ताला निरुपयोगी असल्याचे सिद्ध करत, तलवारधारी हे मानवतेचे पक्षधर नसून शत्रू असल्याचे सिद्ध करते. रंगकर्माच्या याच सौंदर्यबोधाला सत्तेने लुटले आहे. सौंदर्यबोधाच्या अमूर्त विवेकाला मूर्त शरीरापुरते मर्यादित केले. कलाकारांना विवेकाच्या सौंदर्याने प्रकाशित होण्याऐवजी भोग आणि वासनेच्या अधीन होऊन सत्तेच्या अधिपाशात रेंगणाऱ्या प्राण्यांमध्ये बदलले आहे. रंग म्हणजे विचारांच्या कर्माला केवळ प्रदर्शनापूर्ते सीमित केले आहे.

जगातील महासत्तांनी हेच केले. सत्ता भांडवलवादी असो, मार्क्सवादी असो वा उजव्या विचारसरणीची असो. सरंजामशाही सत्तेने नाचणारे – गाणारे बनवले, सम्राटांनी दरबारी बनवले, भांडवलशाही सत्तेने विकाऊ केले आणि वामपंथीयांनी त्याचा प्रपोगंडा केला. कलाकारांना राजाश्रय देऊन सर्व सत्तांनी कलाकारांच्या मनात हे रुजवले की कलाकार राजाश्रयाशिवाय जगू शकत नाहीत. सन्मान मिळू शकत नाही आणि हाच विचार सत्तेने समाजाच्या मानस मध्ये ही भरला. जगभरातील जनमानस हेच मानतो की कलाकार विकल्याशिवाय जगू शकत नाही. स्वतःच्या वर्चस्वासाठी उपयुक्त ठरलेल्या रंगकर्मींनाच सत्तेने पुढे नेले,शेक्सपियर असो चेखव्ह,गोर्कि किंवा अमेरिकेचे नव-भांडवलवादी असोत. शेक्सपियरने इंग्रजी भाषा आणि साम्राज्यवाद पुढे नेला, चेखव,गोर्कि हे सर्वहारा वर्गाच्या नावाखाली हुकूमशाहीचे प्रोपोगेंडिस्ट बनले आणि अमेरिकेचे नव-भांडवलवादी प्रोफेशनल आणि कमर्शियल मध्ये गुंडाळले गेले, आणि ‘खरेदी- विक्री’चे वाहक बनून त्यांनी अवघ्या जगाला गर्तेत नेले.

याचे उदाहरण आहे रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला. अमेरिका आणि रशियाच्या वर्चस्वावादाला बळी चढला युक्रेन देश. अमेरिकेला आपले एक ध्रुवीय वर्चस्व कायम ठेवायचे आहे. रशियाला त्याचा भूतकाळ पुन्हा मिळवायचा आहे. यात उध्वस्त होत आहे युक्रेन . युक्रेन आपल्या सार्वभौमत्वासाठी लढत आहे. एक स्वतंत्र देश असल्याने त्याला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, जो रशियाला मान्य नाही कारण रशियाला भीती आहे युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याची. युक्रेन दुसरा अफगाणिस्तान बनण्याच्या मार्गावर आहे आणि जग तमाशा पाहत आहे.

विचार करा मानवी हक्कांसाठी नारे देणारी अमेरिका कुठे आहे? अमेरिका म्हणजे तेथील सत्ता नाही, तेथील जनता कुठे आहे? युक्रेनची 15-20 लाख मुले आणि महिला दारोदारी भटकत आहेत. कुठे आहे युरोपचे रेनेसा? रशियाचे लोक कुठे आहेत? रशियातील लोकांच्या मनात सर्वहारा वर्गाची वेदना आहे का? अमेरिकेत, रशियात, युरोपात किंवा जगातल्या कुठल्याच देशात पिता नाही का, आई नाही का, महिला नाही का जे मुलांची आणि स्त्रियांची व्यथा जाणून घेऊ शकतात ?

कुठे आहेत ते शास्त्रज्ञ ? विज्ञानाच्या नावाखाली अणुबॉम्ब बनवणारे, क्षेपणास्त्रे बनवणारे, रणगाडे बनवणारे शास्त्रज्ञ कुठे आहेत? मानवतेची ही विध्वंसक हत्यारे बनवल्याशिवाय त्यांना पोट भरता येत नव्हते का? मनुष्यतेला मारूनच त्यांचे पोट भरते का?

विज्ञान मानवतेला वाचवत नाही. विवेक ज्ञान मानवतेचे रक्षण करते. विवेक ज्ञान रंगकर्माने आलोकित होते. रंगकर्म प्रेक्षकांत विवेक जागृत करते पण तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली सत्तेने विवेकबुद्धी हिरावून घेतली आहे. जगभरातील रंगकर्मींना प्रशिक्षित करून त्यांना बाजारू बनवण्याच्या नावाखाली वेठबिगार बनवले. नाचणाऱ्या गाणाऱ्या शरीरांना दृष्टी शून्य केले. सत्तेने या दृष्टिहीन नाचण्या गाणाऱ्या देहांना जिवंत ठेवण्यासाठी अनुदान, अकादमी सन्मान, फेलोशिपची भीक देऊन त्यांना जनतेपासून अलिप्त केले. सत्ता मोठ्या निपुणतेने मोठ्या मोठ्या थिएटर फेस्टिवलच्या नावाने या नाचण्या गाणाऱ्या शरीरांचे प्रदर्शन भरवते. भारताचे उदाहरण म्हणजे भारंगम, झोनल फेस्टिव्हल इ.

आज जगात चार प्रकारचे थिएटर्स होत आहेत. एक सत्ता-पोषित जो केवळ या दृष्टी शून्य नाचणाऱ्या गाणाऱ्या देहांचे प्रदर्शन भर आहे. दुसरा प्रपोगंडा आहे, ज्यामध्ये डाव्या-उजव्या विचारसरणीच्या प्रचारासाठी/प्रपोगंडासाठी या नाचणाऱ्या गाणाऱ्या शरीरांचा वापर होतो. तिसरे म्हणजे बुद्धिजीवींचे ‘माध्यम’ असण्याचे गृहितक! जे रंगकर्माला केवळ माध्यम भर समजतात. चौथे थिएटर म्हणजे ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’ नाट्य सिद्धांताचे रंगकर्म , जे रंगकर्माला उन्मुक्त मानवी दर्शन मानते. थिएटर हे मानवतेच्या कल्याणाचे तत्वज्ञान आहे जे कोणत्याही सत्तेच्या वर्चस्वाच्या अधीन नाही. जो प्रत्येक सत्तेला आरसा दाखवतो. मग ती कोणतीही सत्ता असो, राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक वा सांस्कृतिक सत्ता सर्वांनाच आरसा दाखवते, ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’ नाटय सिद्धांताचे रंगकर्म!

आज विश्वाला अशाच रंगकर्माची आवश्यकता आहे. अशा रंगकर्मींची आवश्यकता आहे जे रंगकर्माचे मूळ समजून, त्याची दृष्टी आत्मसात करून उन्मुक्त मानवीय विश्व निर्माण करतील. त्यासाठी सत्तेच्या प्रत्येक षड्यंत्राचा चक्रव्यूह भेदावा लागेल. समाजाच्या डीएनएमध्ये घुसलेल्या या विषाणूला मारावे लागेल की ‘उन्मुक्त’ कलाकार सत्तेच्या आश्रयाशिवाय जगू शकत नाही. पोटाची खळगी, प्रसिद्धी, दारू, मद्य, लावण्य यातून बाहेर पडून कला साधक बनायला हवे. हे कुठे ही अशक्य आहे का? कोरा आदर्शवाद आहे? मनुष्य आणि माणुसकी देखील आदर्शवाद आहे, नाहीतर सर्व शरीरं आहेत जी पोट भरतात, स्वतःसारखे शरीर निर्माण करतात आणि जग सोडून जातात.

या लेखाचा लेखक गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे.कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये ‘थिएटर ऑफ रेलेव्हन्स’ नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहेत.

निर्णय तुमचा आहे, उन्मुक्त व्हा किंवा गुलामगिरीत रांगत राहा!

✒️मंजुल भारद्वाज(9029333147)