शाहबाज पाकचे नवे ‘वजीर ए आजम’ ?

71

✒️प्रा डॉ सुधीर अग्रवाल(९५६१५९४३०६)

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत इम्रान यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता. या ठरावाच्या बाजूने १७४ सदस्यांनी मतदान केले असून हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात येत असल्याचे पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी जाहीर केले. दरम्यान, इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले असून विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील हे स्पष्ट झाले आहे. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत.

इम्रान खान आता माजी पंतप्रधान झालेत. विरोधकांच्या पीडीएम आघाडीने त्यांची प्रत्येक चाल उधळवून लावली. इम्रान आपली इभ्रत पार चव्हाट्यावर मांडून आपल्या बनीगाला निवासस्थानी परतलेत. त्यांनी आपल्या साडेतीन वर्षांच्या कारकिर्दीत नवाज व शाहबाज शरीफ यांच्यासह संपूर्ण विरोधकांचा उल्लेख भ्रष्ट, चोर, डाकू व दरोडेखोर म्हणून केला. त्यांच्याशी हस्तांदोलन करणे तर सोडा साधा ‘दुआ-सलाम’ही त्यांनी केला नाही. पण, काळाचे चक्र फिरले अन् त्यांची सत्ता गेली. आता शाहबाज शरीफ पाकचे नवे पंतप्रधान होतील. तर बिलावल भुट्टो यांची उपपंतप्रधानपदी निवड होण्याची शक्यता आहे. तथापि, इम्रान यांच्या चुका दुरुस्त करण्यास मोठा अवधी लागणार आहे.

शाहबाज यांनी पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. या राज्याला पाकचे ह्रदयस्थान म्हटले जाते. जगाच्या कानाकोपऱ्यात नवाज व शाहबाज यांचे संबंध आहेत. भारताशीही त्यांचे चांगले संबंध आहेत. नवाज लंडनमध्ये विजनवासात असताना त्यांनी पक्ष चांगल्या पद्धतीने सांभाळला आहे. नवाज यांच्या अगदी विरुद्ध त्यांचे पाक लष्कराशी सलोख्याचे संबंध आहेत. लष्कराचेही शाहबाज यांना पूर्ण समर्थन आहे.

पाकिस्तानात आजवर कोणत्याही सरकारला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. आता इम्रान खान यांनाही मोठ्या राजकीय नाट्यानंतर सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास ठरावावर मतदान घेण्यात आले. मतदानाआधी सभापती आणि उपसभापतींनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर इम्रान यांचा पक्ष पीटीआयच्या सदस्यांनीही सभागृहातून काढता पाय घेतला. पुढचं कामकाज पॅनल ऑफ चेअरमन अयाज सादिक यांनी चालवलं. अविश्वास ठरावावर मध्यरात्रीनंतर मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. हा ठराव अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी जिंकला. इम्रान यांच्यावर १७४ सदस्यांनी अविश्वास व्यक्त केला व ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सादिक यांनी बहुमताने हा ठराव मंजूर करत असल्याचे जाहीर केले.

अविश्वास ठरावाच्या अग्निपरीक्षेआधीच मैदान सोडणाऱ्या इम्रान यांना आता पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले असून विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानसाठी ही नवी पहाट असल्याचे सांगत यावेळी शरीफ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इम्रान यांच्यावर मोठी कारवाई होईल असे सांगितले जात आहे. मात्र, आम्ही सूडबुद्धीने काम करणार नाही, असे शरीफ यांनी सांगितले. कायद्यापुढे कुणीही मोठं नाही. निरपराधांना जेलमध्ये टाकायचं ही आमची वृत्ती नाही. पण, कुणी गुन्हेगार असेल तर त्याला कायदा शासन करेल, असे सूचक विधानही त्यांनी केले.

दरम्यान, इम्रान हे कामकाज सुरू झाल्यापासून संसदेत फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्यांनी आधीच मैदान सोडल्याचे स्पष्ट झाले होते. ऐन मतदानाच्या वेळी त्यांच्या पक्षानेही सभागृहातून पळ काढला. त्यामुळे विरोधकांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसत होता.

भारतासोबतची शस्त्रसंधी कायम राहील

शाहबाज व नवाज यांचे भारतासोबत चांगले संबंध आहेत. दोन्ही देशांत गत वर्षभरापासून शस्त्रसंधी लागू आहे. आता ती अधिक मजबूत होईल. पाक लष्करप्रमुख कमर बाजवा यांनी काही दिवसांपूर्वीच शस्त्रसंधीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या मते, भारतानेही यावर तयारी दर्शवली तर पाकला त्यावर काहीच हरकत नाही. यामुळे दोन्ही देशांत लवकरच व्यापार-उदीम सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इम्रान यांचा व्यापाराला विरोध होता.