सतत खोकला, घसा खवखवणं असू शकतात टॉन्सिल्सची लक्षणं; जाणून घ्या घरगुती उपाय

29

टॉन्सिल्स म्हणजे घशात असलेल्या लसिका ग्रंथींचा एक समूह. टॉन्सिल्समुळे श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे रोगकारक संक्रमणापासून संरक्षण होते. परंतु त्यांनाच जेव्हा जंतूंचा प्रादुर्भाव होऊ लागतो, तेव्हा त्यांचे गृहीत कार्य नाहीसे होते आणि प्रतिजैविके देऊन त्यांचेच संरक्षण करण्याची वेळ येते. अन्यथा शरीरावर अपायकारक परिणाम होऊ लागतात.

लक्षणे :

तीव्र टॉन्सिल्सशोथामध्ये एकाएकी थंडी वाजून ताप भरतो.
घसा दुखू लागल्याने गिळण्यास त्रास होतो.
सर्दी, खोकला येतो.
अरुची, अस्वस्थपणा वगैरे लक्षणेही दिसतात.
जबडय़ाच्या हाडामागे अवधानाच्या गाठी (लिम्फ नोड्स) वाढतात.
ग्रसनी टॉन्सिल्स (अ‍ॅडेनॉइड्स) वाढल्याने वा त्यांच्या शोथाने झोपताना श्वास घेण्यास अडथळा येतो. नाक बंद राहिल्याने टाळा वर उचलला जातो. नाक बसते व दात पुढे येऊ लागतात.
श्वासास दरुगधी येऊ लागते.
कान दुखतो वा फुटतो.

असे का होते?

ऋतुबदलानुसार रोगप्रतिकारकशक्ती कमी होते व कफाचे प्रमाण वाढते. त्यातच थंड पदार्थ खाण्यात येतात. त्याचबरोबर संसर्गामुळे टॉन्सिलला सूज येते.

उपाय काय?

कोमट पाण्यात हळदीचे चूर्ण आणि चिमुटभर तुरटी टाकून गुळण्या कराव्यात. तुळस, गवती चहा, आले व काळी मिरी यांचा काढा दिवसातून चार वेळा घ्यावा. हळद, ज्येष्ठमध, काळी मिरी यांच्या चूर्णाचे मधासह चाटण घ्यावे. तुळशीची पाने, लवंग व ज्येष्ठमधाची काडी चघळावी. ताप असल्यास तपासणी करून घ्यावी.

यामुळे काय होते?

जास्तीचा कफ कमी होऊन टॉन्सिलची सूज कमी होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

इतर काळजी काय घ्यावी?

दही, लोणचे यासारखे आंबट पदार्थ, तसेच थंड पदार्थ- शीत पेये घेऊ नयेत.
जेवणात ओली हळद, आले, लसूण यांचा वापर करावा.
कोमट पाणी प्यावे.