भारनियमन वाढले ; इलेक्ट्रिकल वाहने कशी करणार चार्जिंग..?

30

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.18एप्रिल):-रोजच्या रोज आकाशाला भिडणाऱ्या पेट्रोल, डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. यावर ताेडगा म्‍हणून अनेक जण इलेक्ट्रिक वाहने खरेदीस पसंती देत आहेत. दुसरीकडे अचानक भारनियमनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे अशावेळी ही वाहने चालवणार तरी कशी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भारनियमनामुळे या वाहनांना चार्जिंग करायचे असेल, जनरेटरचा वापर करावा लागत आहे. त्यासाठी डिझेल वापरावे लागत असल्याने खर्च वाढतच आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे पैशांची बचत म्हणून इलेक्ट्रिक वाहने खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र, आता ही वाहने चार्जिंग करण्यासाठी काही ठिकाणी जनरेटर वापरावे लागत आहे. तर डिझेलमुळे या खर्चात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. तालुक्यात २०१९ ते २०२२ पर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहनांची चांगली विक्री झाल्याचे गेवराई येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. रिक्षा, कार, दुचाकी वाहनांच्या विक्रीत वाढ झाली आहे.

त्यामुळे पैशांचीही बचत होणार आहे. परंतु, दिवसेंदिवस वाढत्या भारनियमनामुळे वाहने चार्जिंग करायची कशी? असा प्रश्न आता सतावत आहे. गेवराई शहरात नऊ – नऊ तास महावितरणने ठरवलेल्या वेळापत्रकानुसार वीज खंडित केली जाते. ग्रामीण भागात सध्या भारनियमन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ऐन उन्हाळ्यात भारनियमनामुळे अनेक नागरिक हैराण आहेत. ज्यांची वाहने इलेक्ट्रिक आहेत, त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पर्यायी चार्जिंग करण्यासाठी डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे पेट्रोल एवढाच खर्च येत आहे.

इलेक्ट्रिक दुचाकीमुळे पेट्रोलची बचत होते. शिवाय प्रदूषण होत नाही. कोणत्याही ठिकाणी दुचाकी चार्जिंग करता येते. वाहन अतिशय सुलभ आहे. परंतु, ग्रामीण भागात भारनियमन होऊ लागली आहे. त्यामुळे गाडी कुठे चार्जिंग करावी, असा प्रश्न उभा राहिला आहे.
– ऋषीकेश बारटक्के (रोहितळ)

इलेक्ट्रिक वाहनांची गती मर्यादित आहे. नवीन शिकण्यास देखील हे वाहन सोपे आहे. सध्या गेवराई तालुक्यात चार्जिंग स्टेशन नसले, तरी कुठेही चार्जिंग करता येते. या वाहनाचा आवाजही होत नाही.
– अविनाश माळवदे (गेवराई)