पत्रकारांवर होणारे हल्ले न थांबल्यास राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ रस्त्यावर उतरणार – संतोष निकम यांचा इशारा

67

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक(दि.11मे):-निर्भीड पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांवर होणारे हल्ले न थांबल्यास राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघ रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी दिला आहे. पञकार संघ संस्थापक अध्यक्ष संतोष निकम हे शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय पत्रकार मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

राज्यात निर्भीड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांवर वाळू माफिया गौण खनिज माफिया, अवैध व्यावसायिक, भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी, भ्रष्ट लोकप्रतिनिधी व त्यांचे गावगुंड यांच्याकडून पत्रकारांवर व त्यांच्या कुटुंबीयांवर सातत्याने भ्याड हल्ले होत आहे याबाबत दाद मागण्यासाठी संबंधित पोलिस स्टेशनमध्ये पीडित पत्रकार गेल्यास अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी गुन्हेगारांशी सेटिंग करून उलट पत्रकारांवरच खंडणीचे व इतर खोटे गुन्हे दाखल करून प्रकरण दडपण्याचा केविलवाणी प्रयत्न करतात. राज्य शासन व केंद्र सरकारने पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदे केले आहे मात्र त्याची संबंधित अधिकाऱ्यांकडून कडक अंमलबजावणी होत नसल्याने हे कायदे कुचकामी ठरत आहेत.

पत्रकारांच्या अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या जात नाही याबाबत आवाज उठवण्यासाठी राज्यातील पत्रकारांनी पत्रकारांचा बुलंद आवाज म्हणून काम करणार्‍या राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघात सामील व्हावे असे आवाहन संतोष निकम यांनी केले. राष्ट्रीय विश्‍वगामी पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पत्रकार मेळावा हॉटेल साई गोल्ड ईन मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात राज्यातील अनेक संपादक, उपसंपादक व वरीष्ठ पत्रकार उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम तर स्वागत अध्यक्ष जेष्ठ पत्रकार वसंतराव आरोटे हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सचिव रमेश देसाई, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपसचिव सोमनाथ मानकर, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रुपेश वराडे, महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष रेणुका पगारे, महाराष्ट्र राज्य महिला संघ प्रदेश सचिव अश्विनी भालेराव, प्रदेश संघटक प्रफुल्ल मेश्राम, विजय केदारे, विदर्भ अध्यक्ष पद्माकर घायवान, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुकुमार वांजोळे, पदाधिकारी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी खास परिश्रम घेतले ते पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्याम पवार, सिद्धार्थ मेहेरखांब , नंदकिशोर भालारे योगेश बाराथे भाऊसाहेब भालेराव रवींद्र सरोदे मधुकर देठे संतोष वडेकर धनराज राजपूत लक्ष्मण महाले मच्छिंद्र ढगे यांच्यासह नगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी. पत्रकार संघात अनेक पत्रकारांनी प्रवेश केला त्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला.

या मध्ये शिर्डी येथील सिद्धार्थ मेहेरखांब यांची उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, सुकुमार वांजोळे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी, सांगली जिल्हा अध्यक्ष मोहम्मद केडिया, शिक्षक संघ नाशिक जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव नाठे, शिक्षक संघ चांदवड तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब कासव, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचलित समाजकार्य संघामध्ये श्रीरामपूर तालुका अध्यक्ष जसपाल गुड्डू यांची तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय थोरात यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शाल श्रीफळ देऊन त्यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी राज्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.