संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ: त्यांचा ज्ञानेश्वरी प्रसाद!

[संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पुण्यतिथी विशेष]

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू होत. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली होती. संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव समाधिस्थ झाल्यानंतर संत मुक्ताई अन्नपाणी सकळ त्यागून परलोकवासी झाल्या व पुढे लवकरच संतशिरोमणी निवृत्तीनाथांनीही त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आली आहे. त्यांची पुण्यतिथी ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला असते. त्यानिमित्ताने हा लेख…

संतशिरोमणी निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडीलबंधू आणि गुरु होते. संसारात मन रमेना म्हणून त्यांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. त्या ठिकाणी रामानंद नावाचे सदगुरू रहात होते. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. त्यांच्यापाशी अध्ययन आणि त्यांची सेवा करत ते तेथे राहू लागले. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली. पहिले निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई ती ही होत. त्यांनी आपल्या मुलांना त्या काळच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले. त्यावेळेस विठ्ठलपंत हे पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले. त्या डोंगरावर दाट अरण्य होते. डोंगरात हिंडता-हिंडता एक वाघ धावत आला. त्याला पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली. विठ्ठलपंत बायकोमुलांसह पळाले. ते अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला; पण निवृत्तीनाथ कुठे दिसेनात! पुष्कळ शोध करूनही ते सापडले नाहीत. असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. सर्वांना फार आनंद झाला. ते अधिक तेजस्वी दिसत होते. विठ्ठलपंतांनी विचारले, ”अरे इतके दिवस तू कुठे होतास?” ते म्हणाले, ”बाबा, वाघाला भिऊन पळतांना मी एका गुहेत शिरलो.

त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. त्यांचे नाव गहिनीनाथ होते. त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत, त्यांना तू सुखी कर, असे सांगितले.” नंतर मुलांची मुंजीची वेळ आली. मुंज करण्यासाठी त्यांना घेऊन विठ्ठलपंत आळंदीला आले; पण आळंदीच्या निष्ठूर लोकांनी त्यांना सांगितले, की तुम्ही संन्यासातून परत गृहस्थाश्रम स्वीकारला आहे. तुम्हाला देहान्त प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित्त नाही. ते तुम्ही घ्याल, तरच मुलांच्या मुंजी होतील. हे उत्तर ऐकून विठ्ठलपंत घरी गेले. मुले गाढ झोपेत आहेत, हे पाहून विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी आपल्या घराचा निरोप घेतला. ते थेट प्रयागला गेले आणि त्यांनी गंगेमध्ये जलसमाधी घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर त्यांना आपले आई-वडील घर सोडून गेल्याचे कळले. त्यांच्या डोक्यावरचे छत्रच नाहीसे झाले. सर्व भार संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांवर पडला होता.

संतशिरोमणी निवृत्तीनाथांचे जन्मवर्ष शके १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव, संत मुक्ताई आणि संत निवृत्तिनाथ या चार भावंडांमधे संत निवृत्तिनाथ हे थोरले आणि संत ज्ञानेश्वरांचे गुरू होते. त्यांनी आपल्या तीनही भावंडांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. त्यांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना समजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका- ज्ञानेश्वरी लिहून काढली. संत गहिनीनाथ हे ​संत निवृत्तिनाथांचे गुरू होते. कारण-
“निवृत्तिचे ध्येय कृष्ण हा​चि होय।
ग​यिनीनाथे सोय दाख​विली॥” असे खुद्द त्यांनीच आपल्या एका अभंगात म्हणून ठेविले आहे. सुमारे तीन-चारशे अभंग आ​णि एक ह​रिपाठ एवढी रचना ​निश्चितपणे त्यांची आहे, असे म्हणता येईल. योगपर, अद्वैतपर आ​णि कृष्णभ​क्तिपर असे हे अभंग आहेत.

रसवत्तेच्या दृष्टीने ते काहीसे उणे वाटतात; तथा​पि त्यांची ख्याती आ​णि महत्त्व कवी म्हणून नाही, तर संत ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून आहे. त्यांनी आपले संपूर्ण अध्यात्मधन संत ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश ​दिले. आपण त्या यशापासूनही ​निवृत्त झाले, असे त्यांच्याबद्दल म्हटले जाते. संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे. त्यांनी संतंमंडळींसह केलेल्या अनेक तीर्थांच्या यात्रेतही ते ‌‌‌त्यांच्या सोबतच होते. निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आ​णि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही नाथांनी ​लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. रा.म.आठवले यांनी निवृत्तेश्वरी असा एक ग्रंथ संबोधिला आहे. ज्ञानेश्वरीप्रमाणेच हेही गीतेवरील एक भाष्य आहे. तथापि हा ग्रंथ त्यांचाच आहे, असे अद्याप सिद्ध झालेले नाही. धुळ्याच्या श्रीसमर्थ वाग्देवता मंदिरात सटीक भगवद्‌गीता आणि समाधिबोध अशी दोन हस्तलिखिते नाथांची म्हणून ठेविली आहेत.
संत मुक्ताई या आपल्या भावंडांच्या समाधीनंतर सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी शके १२१८ मधील ज्येष्ठ कृ.त्रयोदशी या दिवशी दि.१७ जून १२९७ रोजी त्र्यंबकेश्‍वर येथे संजीवन समाधी घेतली. समाधीवर इ.स.१८१२ मध्ये दगडी मंदिर उभारण्यात आले. मूळ मंदिरातील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची समाधी व मागे विठ्ठल रखुमाईंच्या मूर्ती आहेत. त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान बनले आहे, हे विशेष!

!! पुरोगामी न्युज नेटवर्क परिवारातर्फे पावन पुण्यतिथी पर्व निमित्त महान संतास कोटी कोटी दंडवत प्रणाम !!

✒️कृगोनि- श्री कृ. गो. निकोडे गुरूजी(संत महापुरूषांचे जीवनचरित्र अभ्यासक)गडचिरोली,मोबा- ७७७५०४१०८६.

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED