देवेंद्रजी, अडीच वर्षाची तडफड आणि फडफड आता तरी शांत होणार का ?

35

✒️दत्तकुमार खंडागळे(संपादक वज्रधारी)मो:-9561551006

अखेर अडीच वर्षाचं आघाडी सरकार कोसळलं. उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा व विधान परिषद सदस्यत्वाचा काल राजिनामा दिला. शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्ष फोडला. तो का फोडला ? कसा फोडला ? याची अनेक कारण आहेत. ती महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षातही आली असतील. शिवसेनेच्या पक्षफुटीमुळे अखेर सरकार कोसळले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एकदाचे पायउतार झाले. त्यांना पायउतार करण्यासाठी, त्यांचे सरकार पाडण्यासाठी गेल्या अडीच वर्षात अनेक प्रयोग झाले. आघाडीचे सरकार पडावे यासाठी विरोधी पक्षाने काय काय केले नसेल ? किती खटपटी ? किती लटपटी ? किती लफडी आणि किती भानगडी केल्या ? याची मोजदाद करता येणार नाही. त्यांनी सरकार पाडण्यासाठी काय केलं नाही ? असा प्रश्न योग्य राहिल. सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्षाने नाना खटपटी केल्या. अखेर त्यांच्या धडपडीला यश आले. केंद्रीय सत्ता व त्या ताकदीचा वापर करत शिवसेना फोडली. घरभेद्यांची फौज विरोधकांच्या हाताला लागली आणि उध्दव ठाकरेंचे सरकार पडले. उध्दव ठाकरे राजिनामा देत अखेर सत्तेतून पायउतार झाले.

ते सत्तेतून पायउतार झाले पण जाता जाता जनतेच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान झाले. त्यांचा संयम, त्यांची सभ्यता, त्यांचा साधेपणा, त्यांची नम्रता आणि सुसंस्कृतपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. वर्षा बंगला सोडताना ना त्यांची बायको फडफडली, ना तनतनली, ना शिव्याशाप दिले. ना शिव्या शापांनी बंगल्याच्या भिंती रंगवल्या. वर्षा सोडणा-या या मुख्यमंत्र्याला लोकांनी फुलांचा वर्षाव करत घरापर्यंत नेले. महाराष्ट्राच्या इतिहासात हे भाग्य फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे यांनाच लाभले. गेल्या चार दशकात महाराष्ट्राने अनेक नेते पाहिले पण मुख्यमंत्री म्हणून अशी छबी, असे प्रेम मिळवणारा हा पहिलाच नेता. त्यांचे शत्रूही त्यांच्या प्रेमात पडले आहेत. कट-कारस्थानी मंडळी आणि त्यांच्याकडे मेंदू गहाण टाकलेली पिलावळ सोडून हा मुख्यमंत्री अवघ्या महाराष्ट्राला भावला.

आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शपथ घेतील. मी पुन्हा येईन ! म्हंटल्याप्रमाणे ते आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत त्यांची गँगही शपथविधी करेल. गेली अडीच वर्षे फडणवीस अस्वस्थ होते. आघाडीची सत्ता आली आणि त्यांचा जळफळाट झाला. सरकार पाडण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. अडीच वर्षात फडणवीस निखळपणे हसलेही नाहीत. ते मुख्यमंत्री होतील आणि आघाडी सरकार पडेल याशिवाय विरोधक काहीच बोलले नाहीत. एखादी सवत (नव-याची दुसरी बायको) आपल्या सवतीचा जेवढा तिरस्कार, द्वेष करत नाही तेवढा तिरस्कार या लोकांनी उध्दव ठाकरेंचा व त्यांच्या सरकारचा केला. सरकार पडणार आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार ! या पलिकडे गेल्या अडीच वर्षात विरोधक काहीच बोलले नाहीत. शेवटी शेवटी, चंद्रकांत पाटील, रावसाहेब दानवे, आठवले ही गँग राज्याचा मुख्यमंत्री ‘ब्राम्हण’ व्हायला हवा ! असे जातवाचक बोलू लागली.

हा सगळा प्रकार कमालीचा जळफळाट, तडफड दाखविणारा होता. देवेंद्रजी सत्तेत येण्यासाठी कासाविस झाले होते. पाण्याबाहेर मासा काढल्यावर जसा तडफडतो तसे ते अडीच वर्षे तडफडले आणि फडफडले. या तडफडीतूनच त्यांनी आकांडतांडव केले, किंकाळ्या मारल्या, आरोळ्या ठोकल्या. नाना खटपटी केल्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. केंद्रीय संस्थांना हाताशी धरून सरकार पाडलं आहे.

आता एकदाचे देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील. पण या निमित्ताने प्रश्न हा पडतो की अडीच वर्षाची तडफड आणि फडफड आता तरी शांत होणार का ? देवेंद्रांना शांत झोप लागेल का ? ते शांतपणे राज्याचा कारभार करतील का ? राज्यात विद्वेषाचे वातावरण निर्माण न करता, भक्तांची विषारी मानसिकता मोडून विधायक मानसिकता तयार करतील का ? सत्ता हाताशी आली आहे. विद्वेषाचे राजकारण मातीत घालून केवळ लोक कल्याणाचे काम देवेंद्रजी करतील का ? सामान्य जनता या हलकट राजकारणात होरपळून चालली आहे. सत्तेचा ताज कुणाच्याही डोक्यावर आला तरी तिचे प्रश्न कायम आहेत. गत पाच वर्षात देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. तेव्हा जे प्रश्न प्रलंबीत होते तेच प्रश्न उध्दवजी मुख्यमंत्री झाल्यावरही प्रलंबीत होते. दोन्ही सत्तेत सामान्य माणसांचा तोंडावळा दिसलाच नाही. आता तरी देवेंद्र फडणवीस त्या सामान्य जनतेचे प्रतिबींब राजकारणात उमटवतील का ? हलकट, कारस्थानी व कुरघोडीच्या राजकारणाला तिलांजली देत जनतेच्या हितासाठी काम करतील का ? असे असंख्य प्रश्न या निमित्ताने पडत आहेत.

उध्दवजी काल जनतेला संबोधीत करताना खुप भावले. खवळलेल्या शिवसैनिकांना त्यांनी आडवे येवू नका, त्यांना येवू द्या, त्यांना सत्ता स्थापन करू द्या ! असे आदेश दिले. उध्दवजी सत्तेसाठी चरफडले असते, तडफडले असते तर शिवसैनिकांनी रक्ताचे पाट वाहिले असते. अवघ्या राज्यात हल्लकल्लोळ माजला असता. तेवढी धमक शिवसैनिकांच्यात नक्कीच आहे. म्हणूनतर बंडखोर आमदार राज्य सोडून परागंदा झाले होते. दुस-या राज्यात लपून बसले होते. पण उद्धवजींनी त्या सर्वांना संयमाने रहा, येणा-या आमदारांना आडवे येवू नका. त्यांना त्रास देवू नका असे सांगून आपल्या प्रगल्भतेचा साक्षात्कार घडवला. मनाचा मोठेपणा दाखवत व्यापक राजकारणाचे पाऊल टाकले. कुछलीच तडफड नाही, मळमळ नाही, जळफळाट नाही. आलो तसा निघालो या वृत्तीने ते बाजूला झाले. राजकारण कसं करावं ? याचा वस्तूपाठ घालून दिला. अडीच वर्षाच्या तडफडीनंतर अखेर सत्ता हाताशी आली आहे.

या सत्तेचा जनतेसाठी उपयोग करावा. आडवा-आडवीचे, जिरवाजिरवीचे राजकारण बंद करावे. देवेंद्रजी सत्तेत यायच्या अगोदर खुप प्रभावी वाटायचे त्यांचा अभ्यासूपणा, त्यांचे तेव्हाचे अभ्यासपुर्ण वक्तृत्व आवडायचे. हा माणूस सत्तेत यावा असे वाटायचे. पण ते सत्तेत आले आणि सत्तेच्या खेळात स्वत:लाच हरवून बसले. अहंकाराच्या गर्तेत बुडून गेले. त्यांच्या अवतीभोवती चमच्यांचे, चेले-चपाट्यांचे थवेच्यी थवे गोळा झाले. हाती सत्ता येताच, ताकद येताच देवेद्रांनी स्वकीयांच्याच गळ्याभोवती फास आवळले. खडसे, तावडे, मुंडे यांच्या करियरच्या गाड्या दरीत कशा कोसळतील याची व्यवस्था केली. त्यांना बाद केले. जे स्वकीयांना सोडत नाहीत ते विरोधकांना काय सोडणार ? असा प्रश्न या निमित्ताने पडल्याशिवाय रहात नाही.
नव्याने मुख्यमंत्री झालेल्या देवेंद्रजींना शुभेच्छा. कवी केशवसुतांच्या तुतारी या कवीतेतल्या काही ओळी या निमित्ताने आठवल्या. जुणे जाऊ द्या मरणालागूनी
जाळून किंवा पुरून टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध ऐका काळाच्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी । कवीतेतल्या या ओळीप्रमाणे मागचे झालं गेलं विसरून जनतेच्या आणि महाराष्ट्राच्या भल्याचे काम तुमच्या हातून घडावे याच शुभेच्छा.