उमरखेड – महागाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या- रामदास आठवले(केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्यमंत्री)

108

🔹यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.26जुलै):-मागील एक महिन्यापासून उमरखेड महागाव मतदारसंघांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर अस्मानी संकटाने घाला घातल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.

त्यामुळे आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांना पत्राद्वारे सूचित केले होते.

त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे उमरखेड महागाव मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सूचित केले आहे.

यापूर्वीही जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांनी पैनगंगा नदीला येत असलेल्या पुरामुळे नदीकाठी वसलेल्या गावांना पुराचा फटका बसू नये याकरिता सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करणे बाबतचे पत्र केंद्रीय मंत्र्यांना पाठवले होते तेव्हा केंद्रीय मंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 9 जुलै रोजी पत्र पाठवून याबाबत ज्ञात केले होते.

एकंदरीत उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील पैनगंगा नदी काठावरील शेतकऱ्यांना दरवर्षी पुराचा मोठा धोका बसून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते पैनगंगा नदी काठावरील जवळपास 50 गावांना या पुराचा फटका बसतो त्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करणे गरजेचे आहे मागील एक महिन्यापासून सतत पाऊस सुरू असून भागातील अनेक नदी नाल्यांना पुरसदृश्य परिस्थिती सतत निर्माण होत आहे.

आठवले यांचे पत्र प्राप्त होताच जिल्हाधिकारी यानी पैनगंगा काठच्या गावाना भेटी दिल्या तसेच तातपूरत्या उपाययोजना ही केल्या.

तसेच मागील एक महिन्यांमध्ये अनेक वेळा एका दिवसामध्ये 65 मिलिमीटर च्या वर पाऊस झाला आहे.

शासन दप्तरी 65 मिलिमीटर च्या वर पाऊस झाल्यास त्याची नोंद अतिवृष्टी मध्ये होते. त्यामुळे शासनाने उमरखेड महागाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आदेश केंद्रीय मंत्री रामदास आठवले यानी जिल्हाधिकारी याना दिले.

आठवले यांनी पुरग्रस्त गावाची व मतदार संघातिल शेतकरयाच्या समस्या कडे विशेष लक्ष दिल्या मुळे सरपंच व ग्रामस्थ यांच्या कडुन आभार मानले जात आहे.