स्वातंत्र्याने जनतेला काय दिले?

आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. खुप आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक महोत्सव हा साजरा व्हायला च पाहिजे या मध्ये कुठे ही दुमत नाही. परंतु जो दिवस जो महोत्सव आपण साजरा करतो त्या दिवसाची समिक्षा होने गरजेचे असते. जर आपण समिक्षाच केली नाही तर आपली अधोगती झाली की प्रगती झाली हे आपल्या लक्षात येणार नाही. म्हणून माझे वैयक्तीक असे मत आहे की आपण जे काही करतो त्याची समीक्षा झाली तरच तो दिवस साजरा करण्याचे सार्थक होईल व ज्या गोष्टीची उणीव, कमतरता असेल त्या येणाऱ्या काळामध्ये म्हणजे पुढचा महोत्सव येण्या अगोदर भरून निघणे आवश्यक आहे तरच आपण काय करतो काय करत नाही याची जाणीव होईल. आता आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. पण मला काही प्रश्न पडलेले आहेत त्यापैकी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्वातंत्र्या ने जनतेला काय दिले? आपण स्वातंत्र्य पुर्व काळ बघितला तर ब्रिटीशांची सत्ता येथे होती.

ब्रिटीशांच्या काळामध्ये शिक्षण, नोकरी, आरोग्य व दळणवळणाची साधणे होती. रेल्वे हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मग ब्रिटीशांपासून आपल्याला स्वातंत्र्य का पाहिजे होते? तर ब्रिटीशांचा अन्याय अत्याचार वाढला होता. काही लोक म्हणतील ते परकीय होते म्हणून आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे होते तर हे चुकीचे आहे कारण ब्रिटिश येण्याअगोदर देश काही स्वतंत्र किंवा सार्वभौम नव्हता तेव्हाही परकीय राजवट भारतावर राज्य करत होती. असो तो भाज जरी वेगळा असला तरी मुद्दा समजण्यासाठी उदाहरण देणे आवश्यक असते. ब्रिटीशांनी देशाची लुट केली असे सांगितले जाते. आणि व्यापारासाठी आलेल्या लोकांनी लुट केली असेल हे मान्य करावेच लागेल पण देशाला १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले आणि देशाची लुट थांबली का? ब्रिटीशांनी अनेक करांच्या माध्यमातून देशातील पैसा त्यांच्या कडे वळवला तर स्वांतत्र्या नंतर आम्ही कर मुक्त झालो का? ब्रिटिश काळामध्ये सरकार, सरकार निती यांच्या विरोधात बोलण्याचा लिहण्याचा मत व्यक्त करण्याचा अधिकार होता आज सरकार विरोधात बोलण्याचा लिहण्याचा अधिकार आहे का? भारतीय संविधान लागु असून त्याची अमंलबजावणी होते का? सरकार व त्यांच्या निती , ध्येय धोरण विरोधात बोलले लिहले तर या ठिकाणी त्यांना संपवले जाते. नरेंद्र दाभोलकर, गोंवीद पानसरे, गौरी लंकेश या प्रकरणाचे उदाहरण आहेत. फक्त सत्य बोलणे आणि लिहण्यामुळे त्यांना जिव गमवावा लागला.

आणि विशेष म्हणजे मारेकरी कोण मुख्य सुत्रधार कोण याचा शोध आजही लागला नाही. घटनेने जरी लिहणे बोलणे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले असले तर अलिखित पणे दाभोलकर, पानसरे, गौरी सारख्या लोकांची हत्या करून एक दबाब निर्माण केला आहे म्हणजे कोणी लिहणे बोलणे मत व्यक्त करण्याची हिंमत करणार नाही. उदाहरणे खुप आहेत नमुना म्हणून आपण एक जरी बघितले तरी पंचहत्तर वर्षातील प्रगती आपल्या लक्षात येते. स्वतंत्र भारतामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, ग्रामविकास, जलसंपदा, नगरविकास, क्रिडा अशा प्रत्येक क्षेत्रासाठी हजारो करोडो रूपयांचा निधी असतो, तो आकडाच एवढा असतो की सर्व सामान्य जनतेला आकडा ऐकुणच ते विषय सोडून देतात. तेवढा पैसा असतो हेच त्यांना माहिती नाही. पंचहत्तर वर्षामध्ये दरवर्षी बरोबर निधी दिला गेला आहे. परंतु पंचेहत्तर वर्षात जनतेचा निधी जनतेपर्यंत किती पोहचला हा मात्र संशोधनाचा विषय आहे. ज्यांच्या साठी निधी येतो तेच लोक समस्या ग्रस्त आहेत. साधी पाण्याची समस्या घेऊन आमदार खासदाराकडे जायच तर मान खाली घालून बोलावे लागते. पंचहत्तर वर्षात पिण्यासाठी पाणी पाणी मिळु नये आणि ते मिळत नाही म्हणून जनता प्रतिनीधी ना स्पष्ट सांगु शकत नाहीत. मग नेमके स्वातंत्र्य आहे तरी कोणाला?

या स्वातंत्र्याने आम्हाला काय दिले पुलवामा सारख्या ठिकाणी तिनशे किलो आर डी एक्स येतात आणि आमचे चाळीस जवान शहीद होतात आणि त्या शहीदांच्या नावावर मताची भिक माघावी लागते. सरकारला स्फोट झालेल्या आर डि एक्स चे वजन बरोबर माहिती होते. पण आर डिक्स कोणी आणले हे आजुनही माहिती होत नाही. हिच तर खरी शोकांतिका आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार मूलभूत सुविधा हे स्वातंत्र्य देऊ शकले नाही. ब्रिटीशांच्या प्रयत्नाने सुरू झालेले शिक्षण स्वांतत्र्या नंतर हळूहळू बंद करून शिक्षण, रोजगार बंद करून टाकला व डोक्यामध्ये धार्मिक भावना भरून वेळोवेळी जातीय वाद निर्माण करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. शाळा बंद होत आहेत पण दारुच्या दुकानांना मुख्य रस्त्यावर परवानगी देण्यात येते. शिक्षण रोजगारासाठी पैसा नसतो परंतु हजारो करोडो चे घोटाळे होतात. हजारो करोडो चे घोटाळे करणारे सत्तेत बसतात आणि सत्य बोलणारा लिहणारा किंवा राष्ट्रहीताचे मुद्दे मांडणाऱ्याला बंदुकीची गोळी किंवा कारागृहाची पोळी मिळते. देशामध्ये देश विघातक कृत्य जसे दोन समुहात संघटना करून जिवीत हाणी करणे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा आणि राष्ट्रीय संपत्तीची हानी व्हावी या दृष्टीने केलेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपींना संसदे मध्ये पाठवले जाते. आणि पोटासाठी, समाजासाठी, देशातील सामाजिक समस्ये विषयी आवाज उठवणाऱ्यांना जेल मध्ये जावे लागते. म्हणजे देश जरी स्वातंत्र्य झाला असेल तरी अजूनही माणसाच्या मनात दहशतीचे वातावरण कायम ठेवण्याचे काम स्वातंत्र्यत्तोर काळामध्ये अगदी सहज सुरू आहे. रोजगार, महागाई, आरोग्य यावर बोलणारा तर देशद्रोहीच आहे असे समजून नेत्याचे भक्त लोक त्यांची भक्ती प्रामाणिक पणे करताना दिसत आहेत.

देशाचे संविधान व कायद्या वर बोलणाऱ्या व्यक्तीला एकाच जातीत बंद करून त्याने बोलुच नये कसे वातावरण निर्माण केले जाते. संविधान व हक्क अधिकार मागणाऱ्या ला आरोपीच्या नजरेने बघितले जाते आणि संविधानाचा व कायद्याचा अवमान करणाऱ्यांना राष्ट्रभक्ती चे प्रमाणपत्र दिले जाते. आम्ही स्वातंत्र्य झालो असे म्हणतो पण आमच्या घरात काय शिजावे आणि काय शिजू नये हे सरकार ठरवत असेल तर हे स्वातंत्र्य नेमके कोणाचे आणि कोणासाठी आहे असा प्रश्न आहे. लोकांच्या घरातील चुलीवर काय शिजते हे बघण्याचा कोणालाच अधिकार नसताना घरात गोवंश मांस आहे या संशयावरून तरुणांच्या हत्या करण्यात येतात. परंतु भारतातील गोवंश मांस बाहेर देशात निर्यात करण्यासाठी सरकार मदत करते तेव्हा मात्र देशातील लोकांना काही अडचण नसते, थोडक्यात काय तर विशिष्ट जातीच्या लोकांनी गोवंश मांस घाऊ नये बाकीच्या लोकांनी गोवंश जिवाचा बाजार जरी मांडला तरी चालतो. हे सर्वांना मान्य राहील.
जातीय भेदभाव पंचेहत्तर वर्षानंतर सुद्धां जिवंत दिसतो. याचे किती तरी उदाहरण या देशामध्ये आहेत. याचे उदाहरणे जरी देत बसलो तरी अनेक पुस्तके तयार होतील. खैरलांजी हत्याकांडामध्ये संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात येते आणि एकच व्यक्ती वाचतो पण त्याला मरेपर्यंत न्याय मिळत नाही या कृत्याला नेमके काय म्हणता येईल. पुण्यामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो घरात असतो म्हणून एका स्वंयघोषीत उच्च वर्णीय बायीच्या घरातील स्वंयपाक अपवित्र होतो. बालाजी मंदिरात जातांना छत्रपती शिवरायांचा फोटो किंवा मुर्ती असेल तर प्रवेश मिळत नाहीत. अशा वातावरणात स्वांतत्र्याचा फायदा नेमका आहे कोणाला? महापुरुषांच्या फोटो ची एवढी भिती वाटते तर त्यांचे विचार आणि कार्य केवढे असेल याची प्रचीती येते.

पण महत्त्वाचा मुद्दा आहे पंचेहत्तर वर्षात एवढा भेदभाव आहे तर स्वातंत्र्य नेमके कोण भेदभाव करणारे की भेदभाव ज्यांच्या सोबत होतो ते. येथे सर्व सामान्य लोकांना न्याय मिळत नाही आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधिशांना काम करण्यासाठी अडचणी निर्माण होतात म्हणून रस्त्यावर यावे लागते, न्यायधिश लोहीया यांची हत्या होते हत्येचे मारेकरी सापडत नाहीत येथे न्यायव्यवस्था स्वतंत्र पणे काम करू शकत नसेल तर नेमके स्वातंत्र्य आहे तरी काय आणि कोणासाठी हा प्रश्न सर्वांना पडायला पाहिजे. स्पृश्य अस्पृश्यता, जातीवाद आजही पाळला जातो, खालच्या जातीचा आहे म्हणून घोड्यावर बसु दिले जात नाही, मोठमोठ्या व नामांकित व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिल्या जात नाही. खालच्या जातीतील आहे म्हणून ध्वजारोहण करू दिल्या जात नाही. अस्पृश्य आहे म्हणून स्मशानभूमीत मृतदेह जाळू दिल्या जात नाही हे पंचेहत्तर वर्षाच्या स्वांतत्र्यामध्ये घडलेले आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली लागावे म्हणून वयोवृद्ध धर्मा पाटलांना जिव गमवावा लागतो, शेतकरी विरोधी कायदे परत घेण्यासाठी पंजाब हरियाणा च्या शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागतात, आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून आरोप करण्यात येण्यात. स्वतः च्या कामाचा योग्य मोबदला मिळाला म्हणून एस टी कर्मचाऱ्यांना जिव गमवावे लागतात, तिन तिन महीने संविधानीक आंदोलन करून नोकरी गमवावी लागते, विद्यार्थ्यांना पंचेहत्तर वर्षानंतर ही रोजगारासाठी रस्त्यावर यावे लागते व त्याचे रूपांतर हिंसे मध्ये होऊन विद्यार्थ्यांवर केसेस होऊन त्यांना नोकरी पासून दुर ठेवले जाते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांच्या माठातील तहान लागली म्हणून पाणी पिल्याने आणि खालच्या जातीचा असल्याने तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकल्या ला बेदम मारहाण करून शेवटी त्या चिमुकल्या ला जीवन संपवावे लागते. ते फक्त जाती मुळे. पंचेहत्तर वर्षाचा विचार केला तर हेच घडत आले आहे. म्हणून मग प्रश्न पडतो स्वातंत्र्याने जनतेला काय दिले? जेथे आजही जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुलभूत गरजा दाबुन रोजगार आरोग्या पासून दुर ठेवले जाते. आणि हक्क अधिकारा विषयी कोणी आवाज उठवू नये म्हणुन माणसिक दहशत निर्माण केली जाते. समस्या विसरून जाण्यासाठी प्रश्न न विचारण्यासाठी हर घर सदोष झेंडा देऊन, जाहीर पणे राष्ट्रध्वजाचा अवमान करणारे राष्ट्रप्रेमी व ध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून आवाज उठवणारे देशद्रोही होतात म्हणून डोक्यातून प्रश्न जातच नाही. स्वातंत्र्याने जनतेला काय दिले? प्रश्न असला तरीही अमृत महोत्सवाच्या सदिच्छा.
**************************************
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(मो:-९१३०९७९३००)
**************************************

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED